फकिरा..
तो प्रसंग आठवताच फकिरा पुन्हा बावरला . इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागी होऊन त्यांनी दंगा केला . त्याचबरोबर फकिरा खाली अंग टाकीत पुटपुटला ,
” आली हजेरी !
” तो कान टवकारून सासूंद घेऊ लागला . महारवाड्यातून हे पाटलाचं भेरगं आता इकडे येणार , या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भणभण आरंभली .
तरणाबांड रावसाहेब पाटील हाती कु – हाड घेऊन पुढं दमदार गतीनं चालत होता . गण्या कोळी , जान्या जाधव , एकोबा परीट , दोन रामोशी , एक महार . तात्या मांग आणि आपल्या भावकीतील आठ माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता . चार – पाच कंदील बरोबर जळत चालत होते . जान्याच्या काखेत नंगी तलवार चमकत होती . कैक भाले जिभल्या चाटील होते .
” ए तायनू महारऽऽऽ ‘ अशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली . मग मांगवाड्यातली कुत्री जागी झाली . क्षणात त्यांनी डोकं फिरवल्याप्रमाणं मांगवाडा डोकीवर घेतला . सर्वत्र हलकल्लोळ उसळला आणि त्यातच ‘ ए बहिरू म्हार – ए किशा महारऽऽ ए दाद्याऽऽ ‘ अशा हाका मारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि ‘ हाजरऽऽ ‘ असं त्याला जागोजाग उत्तर मिळत होतं .
कुत्री भुंकत होती . महारवाड्यात नि मांगवाड्यात कुत्री भुंकल्यामुळं गावचीही कुत्री जागी झाली होती आणि सारा गावच कुत्र्यांच्या भुंकण्यानं व्यापला . होता . त्यामुळं उभा गावच जागा झाला होता . आज पंधरा दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता . पेंगुळलेली माणसं पाटलाला मनातल्या मनात इरसाल शिवी हासडून पुन्हा डोळे झाकीत होती ..
थोड्याच वेळानं हजेरी फकिराच्या दारात आली . पाटील खटकन थांबला आणि त्यानं हाक दिली ,
” साधू राणूऽऽ
” जी . हाय मी . ” मांडवात पडल्या पडल्या साधूनं उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला ,
“ फकिरा राणूऽऽऽ ”
” हाजरऽऽऽ ‘ ‘ फकिरानं जबाब दिला ; परंतु पाटलाचं समाधान झालं नाही . त्यानं पुन्हा पहिलीच हाक जोरात दिली .
” फकिरा ऽऽऽ ”
” काय ? ” फकिराही बिथरून आतून ओरडला आणि पाटील एकाएकी चिडला . तो दोन पावलं पुढं सरकून म्हणाला ,
” फकिरा , भाईर येऊन हाजरी दे ! “
मी भाईर येनार न्हाय ! ” फकिराचा आवाज चढला . मांडवात साधू जागा झाला नि उठून बसला . पाटील एकेरीवर का आला याचा तो विचार करीत आहे , तोच पुन्हा एकवार आवाज आला ,
” तुला रोज हतं माझ्या म्होरं येऊनशान हाजरी दिया पायजे ! ”
” न्हाय . मी असाच आतनंच देणार !
” फकिरा अधिकच चिडला आणि पाटील तरकटला . त्याचा तोल सुटला . तो मुठीतील कु – हाडीचा दांडा आवळून , नाक फेंदारून म्हणाला ,
‘ न्हाय ! ती बायकूच्या पुढ्यातली हाजरी चालणार न्हाय . भाईर ये !
” आणि त्याबरोबर धाडकन दार उघडलं नि फकिरा चौकटीत आला . कंदिलाचा लाल – पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला . तो अति उग्र झाला होता . त्याच्या डोळ्यांत जाळ पेटला होता . त्याच्या पीळदार मनगटात रक्ताचा दाब वाढला होता . त्या एकाच शब्दानं तो निर्भान झाला . साधू चटकन उठून उभा राहिला .
दौलतीची झोप झडून गेली . सरूबाई , राधा , राही -सर्वच आश्चर्यानं पाहू लागल्या .
फकिरा चौकटीत येऊन पाटलावर नजर रोखून हळूच म्हणाला , ‘ काय म्हनलास ? “
” भाईर येऊन हाजरी ! ” पाटील उद्गारला .
” आनि काय म्हनलास ? ” फकिरा जोरानं ओरडला . त्याबरोबर पाटलानं वळून पाहिलं आणि फकिराची खणखणीत चपराक त्याच्या डाव्या गालफडात खाडकन वाजली . तडाख्यात त्याचं पागोटं दूर उडालं नि त्याचा तोल जाऊन तो कोलमडला ; पण लगेच स्वतःला सावरून त्यानं कु – हाड फिरवून हाणली ; परंतु त्यावेळी फकिरा तिथं नव्हता . तो तलवारीकडे धावला होता . त्यामुळं पाटलाची कु – हाड चौकटीत जाऊन रुतली .
तलवारीकडे निघालेल्या फकिराला राधानं अडवला . दौलती आडवा झाला . सरूनं हात धरला . फकिराच्या हातात ती तलवार आली , तर कत्तल होईल , याची त्यांना कल्पना होती . त्या सर्वांनी फकिराला देव्हाऱ्याकडं जाऊ दिला नाही . आईच आडवी आली आहे , हे लक्षात घेऊन फकिरा परत फिरला . तो सरळ जाऊन पाटलावर विजेप्रमाणं कोसळला . पहिल्या झडपेत त्यानं पाटलाला खाली ओढला . एखाद्या मांजरानं उंदीर चेलमडावा , तसा पाटील उलथापालथा झाला . एक जोराची लाथ बसून पाटलाला हूक भरली . तो दोन्ही पाय सरळ पुढं पसरून हातानं पोट धरून कण्हू लागला आणि बरोबरीच्या लोकांकडे केविलवाण्या नजरेनं पाहू लागला . उशिरानं पाटील बोलला ,
” आरं , मेलू की रंऽऽ “
दौलतीनं बाहेर येऊन फकिराला धरलं . राधा पुढं आली . त्या दोघांनी त्याला मिठी मारली . तोच जान्या तलवार घेऊन पुढे आला . त्याच्या पाठीत साधूने काठी हाणली , त्यासरशी हातातील तलवार टाकून जान्या अंधारात पडला . फकिरानं3 वाकून चटकन ती तलवार उचलली .
‘ नगा मारू , पाटील हाय त्यो पांढरीचा . ” साधू म्हणाला .
इतक्यात पाटील उठला आणि त्यानं गावाकडं तोंड करून दोन्ही हातांनी भयंकर अशी बोंब ठोकायला सुरुवात केली . क्षणात सारा गाव जागा झाला . मांगांनी हत्यारं काढली . महार धावले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंढा मांगवाड्याकडं येऊ लागला .
काय झालं , कोण बोंब ठोकीत आहे , हे कुणालाच कळत नव्हतं .
तो प्रसंग खरोखर बाका होता . क्षणभरच फकिरा गांगरला ; पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला ,
” साधू , तयार ऱ्हा !
थोड्याच वेळात सारा गाव मांगवाड्यात एकत्र झाला . दौलती मांगाच्या दारात गर्दी झाली .
फकिरानं कंबर बांधून तलवार घेतली होती . सावळा , मुरा , बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते . महारांनी टापरी बांधल्या .
तायनू महार मोठ्यानं ओरडला . “
आरं , कोन बोंबलतंय ह्ये ? “
जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं , की रावसाहेब पाटील बोंबलतोय .
मग सर्वच लोक पाटलाकडं वळले . कुणी विचारू लागले .
” पाटील , काय भानगड हाय ?
” तोपर्यंत रावसाहेब पाटलाची भावकीही त्या गर्दीत आली होती . पाटील आपली माणसं न्याहाळीत म्हणाला ,
” मला मांगानं लाता मारल्या . मला फकिरानं मारलं !
” मांगानं मारलं , हे ऐकताच कैकांची डोकी बधिर झत्तली . मांगानं – नि पाटलाला मारावं , हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली . पाच पंचवीस माणसांनी लगेच कु – हाडी ठोकल्या आणि ‘ कुटं हाय त्यो फकिरा ? ‘ अशी आरोळी ठोकली . त्याबरोबर गंभीर शांतता पसरली .
सावळा करड्या सुरात म्हणाला ,
” फकिरा हाकडं हाय ! कुनाला मरायचं असंल , त्येनं हाकडं यावं ! ”
आता मोठी मारामारी होणार , या भीतीनं कैक एकदम पळू लागले . त्या पळापळीत कैक निवडुंगात शिरून अडकून पडले . निवडुंगाच्या कोंडात जर मांगांनी माग केला , तर काय घ्या , या भीतीनं गावकरी चरकले आणि हां हां म्हणता एकूण एक माणूस गावाकडे पळत सुटला . दंगल पळत पळत पुन्हा चावडीवर एकत्र आली .
तिकडे चावडीवर गाव जमला नि इकडे मांगवाड्यात सर्व मांग एकत्र झाले .
एकाएकी हे संकट कसं उद्भवलं ? संकट केव्हा केव्हा चालून येतं , तसंचघडलं . फकिरा खिन्न झाला . पाटलानं ही कुरापत काढली . आता लौकरच गाव नि सरकार एक होणार . त्यात खोत तेल ओतून आग भडकवणार .
या सर्व गोष्टींचा विचार करीत मांग फकिराच्या दारात बसले होते , तोच विष्णुपंत कंदीत घेऊन आले , त्यांना पाहताच फकिराच्या डोळ्यांत पाणी आलं . त्यानं पंतांचे पाय धरले . ‘
ऊठ , काय घडलं , ते मला सांग ! ‘ ‘ पंत शांतपणे म्हणाले .
” आगळीक पाटलानं केली – ‘ फकिरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढे म्हणाला , ” त्येनंच मुद्दाम वाढवलं हो .
” हो . तो वाढविणारच होता . ‘ पंत उपलाणी हसत म्हणाले .
सावळानं पागोटं काढून पुढं ठेवीत प्रश्न केला ,
” आमास्नी कुनी धनी हाय का न्हाय ? ह्ये असं कुनीबी यावं नि आमास्नी मारावं ! “
” त्याचं असं आहे- ‘ ‘ पंत समजावणीच्या सुरात म्हणाले , “ ह्या किल्ल्या शिगावातून फिरत आहेत . मात्र विंचू मारताना महादेवालाच दणका बसला आहे . गाव दुखावला आहे . तेव्हा …
” ” मग आम्ही आता काय करावं ? ” फकिरानं मध्येच विचारलं .
तेव्हा पंत म्हणाले ,
‘ आता गाव चढाई करील . सरकारची सारी चक्र फिरू लागतील . पाटलावर हात टाकला , एवढं निमित्त पुढं करून सरकार , पाटील , गाव नि खोत – सर्वच तुम्हांवर तुटून पडतील !
” ” मग ह्यातनं वाट कंची ? ” दौलतीनं मध्येच विचारलं .
” आता गाव सोडा ! ‘ ‘ पंत गंभीर आवाजात म्हणाले , ” संकटाला बगल देणं कधी फायद्याचं होतं . शिवाय जे जे आज हजेरीला पात्र आहेत , त्यांच्यावर खोताची करडी कमान आहे .
” ” मलाबी तसंच वाटतंय . ‘ ‘ फकिरा म्हणाला , ” मी आत्ताच शीव सोडून जातो ! … “
” तसंच कर ! ” पंत म्हणाले , ” मी नंतर ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्याला जाऊन जमेल तेवढी रदबदलही करीन ; परंतु जर तोपर्यंत गाव तुम्हावर तर लढू नका ! चलतो मी … ” असं म्हणून पंत उठले .
पंताला घालवीत सर्व मांग मुख्य मार्गापर्यंत आले आणि जेव्हा पंतांनी निरोप घेण्यासाठी मागं वळून पाहिलं , तेव्हा सर्व मांगांनी त्यांना लवून मुजरा केला . पंत डोळे विस्फारून म्हणाले ,
“ जा , दुबळे होऊ नका ! हेही दिवस जातील . दिवस घर बांधून राहत नाही ! ” ‘ असं म्हणून तो गावाकडे निघाले .
त्या बिकट काळोखात त्यांचा कंदील हाताच्या झोक्यानं मागंपुढं हेलकावे आला ,
क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)
