फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग २७).

फकिरा..

” मला वाटतं , घमांडी वाट चुकला . ” फकिरा म्हणाला .

” मग काय करू म्हनता ! ” सावळानं विचारलं आणि फकिरा म्हणाला , ” वाईच चुचकारून बघा .

” सावळा जाळीबाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणं विचित्र आवाज काढला . तो त्याच आवाज दूर गेला . सर्वजण कानोसा घेऊ लागले . उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळानं आनंदानं उडी मारली .

” -घमा आला !

” त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डुक्कर भेदरून धडपडत कपारीखाली धावलं .

थोड्या वेळानं घमांडी वर आला . त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता . त्याला पाहून फकिराला किंचित आनंदच झाला . हा भिवा शरीरानं मजबूत होता . शिवाय तो सावळाचा पाव्हणा होता . दगा होण्याचा मुळीच संभव ता . आणि आता फकिरालाही एक एक माणूस हवा होता .

बेडसगावकराला पाहून सर्वांना आनंद झाला . घमांडीनं घराकडची खुशाली नि एक हिंमतवान माणूस आणला , याबद्दल सर्वांनी त्याची पाठ थोपटली . मग त्यानं प्रत्येकाच्या घरची खुशाली , निरोप सांगितले आणि तो म्हणाला , ” आठ दिवस झाले , शिगावकर खोत गावात आलाया . रोज रातचं पाटील मांगवाड्यात येऊन घरात शिरून झडती घेतोय . बायकापोरास्नी शिव्या देतोय नि कालच सातारचा दांडगा सायब येऊनशान गेला . फकिरादाजीला धरून देनाराला इनाम दीन , असं म्हनीत व्हता . तवा दौलूआबानं नि राधा आईनं सांगितलंय , की तुमी जपून असा . शिगावचा गनू रामोशी येनार हाय . त्येच्या- “

” त्येला डोंगर चढू देऊ नगा ! खंडू ओरडला , “ खोत त्या गण्याला फितवून हकडं पाठवील नि दगा व्हईल !

” नाईकाचं खरं हाय- ‘ फकिरा म्हणाला , “ आता कुनावरच सरळ इस्वास टाकू नगा . मानूस न् मानूस पारखून घ्या . न्हाय तर आपून सारी एका दमात मरू ! ” मग तो घमांडीकडे वळून म्हणाला , ” बरं , आबानं आनी काय सांगितलं ? ”

” आबानं ? ” घमांडी म्हणाला , ” गन्याला हाजरी लगलीया . तवा त्यो आबाकडं येऊन म्हनीत व्हता , की मला फकिराकडं घालवा- ‘

तायनू गप्प ऐकत होता . तो मध्येच म्हणाला , ” खोटं . आता अशी कैकाला हाजरी लावून सरकार ती मानसं इकडं सोडील , आनी हतं येऊन दगा- ‘

” म्हनून आपून वाईच सावध असू या . ” मुरा म्हणाला .

त्यावेळी दगा होणार , या कल्पनेनं सर्वांची मनं पोळली . आपले वैरी स्वस्थ नसून आपल्या जिवावर उठले आहेत , ते सर्व बाजूंनी आपल्यावर हल्ला करण्याची तरतूद करीत आहेत , याची जाणीव सर्वांना झाली .

” परंतु बेडसगावकरासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं होतं . भिवानं फकिराची ती उग्र मूर्ती जेव्हा पाहिली , तेव्हा तो चकित झाला . एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणारा हा आपल्याच जमातीतला माणूस म्हणून फकिरा त्याला दैवताप्रमाणं भासला आणि तोही जिवावर उदार झाला .

भिवाला पाहून तायनूला सर्वांपेक्षा अधिक आनंद झाला . भिवाच्या दाट करड्या मिश्या सरळ पुढं झेपावत होत्या आणि त्यांनी त्यांचा रुंद जबडा झाकला जात होता . त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीट दिसत . त्यावरच्या करड्या भुवयांनी त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे .

डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता . सावळा , तायनू व भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होती . भिवा चिलमीत निखारा कोंबून , मिश्या आजूबाजूला सारून झुरके मारीत होता .

मध्यान्ह रात्र उलटली होती . वाऱ्याला जाग आली होती . आणि तो कपारीनं बेभान पळत होता , घमांडी आल्यामुळे आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं . ते जाळीजाळीत घोरत होते . गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारच्या जाळीत फकिरा जागाच होता . त्याला झोप येत नव्हती . किती तरी उशीर पडून तो कंटाळला नि चटकन जाळीबाहेर आला . वाऱ्याच्या झोतानं त्याला बरं वाटलं . तो मग शांतपणे जाळाजवळ गेला . त्याला पाहताच भिवानं म्हटलं , “ या की , बसा ! “

” हं- बोला , कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात ? ” फकिरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला ,

” बेडसगावात सरकारी खजिना हाय . तवा सारं गाव अंमलदारनी उठवून काढलाय . त्यात आम्हां गरीबांवर ही हाजरी . डोस्कं हालवाय फुरसती न्हाय

” खजिना ? ” फकिरा गंभीर होऊन म्हणाला , ” खजिना तिथं कसा ? “

‘ त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो . ‘ ‘ भिवानं सांगितलं आणि फकिरा डोळे आकुंचित करीत म्हणाला ,

“ खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो ? “

” पहारा कशाचा ? ” भिवा म्हणाला , ” इनमीन चार मुंडकी -कवा तरी येऊन जात्यात . आनी एक बामन हाय , तो एकटाच त्याची राखन करीत असतो . “

” म्हंजी खजिना कोन फोडील , असं सरकारला वाटत न्हाय ? ” फकिरानं आश्चर्य व्यक्त केलं .

” कोन फोडनार ? ” भिवा म्हणाला , ” ह्या सरकारला कुनाचं भ्या वाटत न्हाय , म्हून तर त्यो खजिना बामनाच्या वाड्यात ठिवलाय . रक्कम तुंबली , की मग “” ती कोल्हापूरला जाती . त्यावेळी मातर सातआठ मानसं बंदुका घेऊनशान येत्यात … “

खजिन्यात किती रक्कत असती ? ” फकिरानं प्रश्न केला .

” किती असती , कोन जानं ! ” भिवा उद्गारला आणि फकिराच्या डोकीत तो खजिना खळखळू लागला . तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारली .

मुरा , बळी , साधू हे तिज्ञे धडपडून उठले आणि धावले . त्यांना जवळ घेऊन फकिरा म्हणाला , ” बेडसगावात इंग्रजांचा खजिना तुंबलाय- ‘ ‘ असं म्हणून त्यानं पूर्वेकडं नजर टाकली .

आकाश लाल होत होतं . अनंत रंगांचा सडा सांडला होता . मखमली गालिचाच्या पायघड्या तुडवीत नवा रवि भूतलावर पदार्पण करीत होता . त्याची ती नयनरम्य शोभा पाहून फांदीफांदीवर बसलेली पाखरं आपल्या मंजुळ शब्दांत एकमेकांना सांगत होती- शेष वेचितां अठरा घटका । पूर्व दिशेने क्षाळले मुखा । कुंकुम रेखिले त्या तिलका । अरुणोदय बोलिजे ।

” मग काय करू या म्हनता , दाजी ? ” त्या तिघांनी प्रश्न केला आणि फकिरा बेडसगावच्या दिशेने पाहत धीरगंभीरपणे म्हणाला , “ चला , तयारी करा ! त्यो खजिना मारू या . वाटेत वाघ उठला , असं सायबाला वाटलं पाहिजे . लाव म्हनावं हाजरी नि कर हतं राज …

” मग कवाची तयारी करू या ? ” साधू म्हणाला .

” लौकर चला ! बेडसगावच्या त्या बामनाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडलीय – ‘ ‘ फकिरा आवाज चढवीत म्हणाला , “ तिला मोकळी करा ! हो . पन आदी मला आईला , बाबाला , थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे . पर तुम्ही मानसांची जुळनी करा ! शंभर मानसं कडवी घ्या नि चला-

” हे सारं भिवानं ऐकलं होतं . तो पुढं येऊन म्हणाला , “ पर बामनाकडं बंदूक हाय . आनी बंदूकीपुढं बळ बेकार व्हतं . भलताच मार हाय , म्हनं- ”

” माझं बळ तोफेपुढे बेकार व्हनार न्हाय ! ‘ ‘ फकिरा तीव्र स्वरात म्हणाला , ” बंदूक ? असू दे बंदूक ! किती गोळ्या उडवील ती ? एक एक मानूस दहादहा गोळ्या खाऊ या ! मेलेलं मेंढरू अग्नीला भीत न्हाय . उद्या मरायचं , त्ये आज मरू या ! पन जरा मानसावानी नि हिंमतीनं ! पंत म्हनीत , एक राजा हतं झाला . त्येचं नाव मी इसरलो . त्यो राजा म्हनत व्हता , शेळी हूनशान शंभर वर्स जगन्यापरास वाघ हूनशान एक दिस जगावं . आनी त्येच खरं हाय . वाघच होऊ या नि वाघासारखं मरू या ! चला . जमवा मानसं नि चला ! हो . पन आदी मी वाईच घराकडे जाऊन आईला भेटून येतू !

” फकिरा , साधू , मुरा , बळी बोलत असतानाच पूर्वेला रविनारायण शांतपणे वर आला . जणू तोही फकिराचं बोलणं ऐकून भारावला होता . लाल किरणांनीभूमंडळ खच्चून भरलं . सह्याद्रीवर त्या किरणांनी वर्षाव सुरू केला . वनराजी पिवळ्या किरणांनी शोभायमान केली . लहान लहान रानफुलं वाऱ्याच्या स्पर्शानं मस्तक डोलावून सूर्याला नमस्कार करू लागली . डोंगरी दुनिया जागी होऊन कार्यक्षम झाली .

फकिराची माणसं आंघोळी करून आली . कोण देवाचं नाव घेत जाळीत बसले , कोण धोतरं वाळवीत यूर्यनमस्कार करू लागले . मुरा , बळी , साधू बेडसगावच्या खजिन्यावर विचार करीत आपल्या तयारीला लागले .

‘ बेडसगावचा खजिना ‘ या एकाच शब्दानं त्या डोंगरात जाळी न् जाळी कुजबुजत होती . प्रत्येक जाळीत खजिन्याची चर्चा चालू झाली आणि ‘ खजिना खजिना ‘ करीतच तो दिवस मावळतीला गेला .

फकिरा घराकडे जाण्याची घाई करू लागाल . घमांडीनं येऊन गबऱ्यावर खोगीर घातलं आणि तो म्हणाला , “ दाजी ! एकटं जाऊ नगा ! रावसाहेब पाटलानं आपली मानसं पाळतीवर ठिवल्याती . ”

” बरं . मी सावळूनानाल घेऊन जातू . ‘ ‘ फकिरा म्हणाला , ” मी सावध हाय . तुम्ही मातर हतं जागत बसा . सावळूनाना नि तायनूआबा , हेस्नी म्हनावं चला.

सूर्य डोंगराच्या पलीकडे हळूहळू उतरत मावळतीला गेला आणि फकिरा गबऱ्याला घेऊन डोंगर उतरत उगवतीकडे निघाला . दोघेही आपापल्या घरी निघाले होते . मात्र सूर्य एकटाच होता आणि फकिराबरोबर सावळा नि तायनू हे काळासारखे चालत होते .

डोंगरातून गावदरीला येईपर्यंत सर्वत्र सामसूम झाली होती . रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती . सर्व पांदी निर्जन भासत होत्या . गावात एखादा माणूस बोलत होता . ते रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं . फकिरा , सावळा , तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले . कारण फकिरापुढं दुसरा एक पेच पडला होता . तो म्हणजे गबऱ्याचा . गबऱ्या गावात गेला , की खेकाळून सर्व गाव जागा करील . लोक गबऱ्याचा तो आवाज ओळखणार . सर्व संकटात साहाय्यकर्ता म्हणून जिवापेक्षाही प्रिय असणारा गबऱ्या आज फकिराला एकाएकी संकटाप्रमाणे भासू लागला . तो विचार करीत आहे , तोच सावळा म्हणाला , ” कशाचा इचार करताय ? ”

” गबऱ्याचा . “

” म्हंजी कसं ? ” तायनूनं विचारलं .

” म्हंजी दारात गेल्यागेल्या आमी आल्याची वर्दी खेकाळून देनार नि …

‘ फकिरा पुढं बोलणार , तोच तायनू मध्येच म्हणाला , ” खरं हाय . आता असं करू या -तुम्ही नि सावळा निघा . मी गबऱ्याला घेऊन हातं थांबतो- “

” आनी तुम्ही घराकडं कवा जानार ? ‘ ‘ फकिरा चमकून म्हणाला .

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading