मनुष्याला माणूस म्हणून जगायला शिकवते ती शाळा. देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासात मोलाची भूमिका शाळा बजावते. शिक्षण महर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेच्या एकूण ७८४ शाखा असून त्यातीलच एक फांदी श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे रुजली.
५ हजार लोकसंख्या असलेलं घोगरगाव. या गावामध्ये १९६१ साली श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी आठवी ते दहावीपर्यंत ३८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज ५७ वर्षांचा कालखंड लोटल्यानंतर जवळपास १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९८३ साली ज्युनिअर कॉलेज ५ विद्यार्थी संख्येपासून सुरु होऊन आज कला व विज्ञान शाखेत दोनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक अडचणींतून वाट काढत आज विद्यालयाची भव्य दिव्य इमारत दिमाखात उभी आहे. संभाजी बोरुडे, सहादू भोस, संभाजी शेटे, गुलाबभाई शेख यांच्यासारख्या अनेकांनी शाखेची पायाभरणी केली. नामदारभाई शेख यांनी गुलाब भाई शेख यांच्या स्मरणार्थ शाळेला २ एकर जागा उपलब्ध करून दिली .
विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य एस.के. ढुस, पर्यवेक्षक ए.आर.थोरात यांच्यासह एकूण ४१ रयत सेवक या ठिकाणी अध्यापनाचे काम निष्ठेने पार पाडत आहेत. घोगरगाव पंचक्रोशीतील मांदळी, चिंचोली रमजान, कोंभळी, खांडवी, रुईखेल, बांगर्डे, बनपिंपरी, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटेसांगवी या गावातील चिमुकल्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे कार्य ही शाळा करते.
रयत गुरुकुल प्रकल्प हा प्रकल्प ऐच्छिक असून लोकसहभागातून राबविलेला सहशालेय उपक्रम आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून हा प्रकल्प विद्यालयात सुरु करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत ५ वी ते १० वी अखेर एकूण ३८६ विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्पोकन इंग्लिश, क्षेत्रभेट व सहल, प्रश्नमंजुषा स्पर्धा, व्याख्यानमाला, बाह्य तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आहार व आरोग्य मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, भित्तीपत्रके, विज्ञान खेळणी व उपकरणे, ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा या सारखे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी राबविले जातात . याशिवाय बाल आनंद मेळावा, गुरूपौर्णिमा, हिंदी दिन, शिक्षक दिन, वाचन प्रेरणा दिन, योग दिन, थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी, राष्ट्रीय सण, वृक्षारोपण व हरित सेना, पालखी सोहळा, कर्मवीर जयंती सोहळा यासारखे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात . शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य – दिव्य साजरा केला जातो . हरित सेनेच्या माध्यमातून विविध फुलझाडांनी युक्त असा शाळेचा रम्य व मनोहरी परिसर पाहता क्षणीच नजरेत भरतो. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था, मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे, भव्य क्रीडांगण अशा सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. शिक्षण संस्था अंतर्गत मे २०१६ साली जलयुक्त शिवार योजनेसाठी रयत सेवक दुष्काळ निधीच्या रकमेतून घोगरगाव येथील चौकी नदीवरील बंधा – याचे खोलीकरण व रुंदीकरण केले.
स्कॉलरशिप, नवोदय, रयत प्रज्ञा शोध, रयत ऑलीं म्पियाड, एन.एन.एम.एस., एन.टी.एस.एलिमेंटरी तसेच इंटरमिजिएट प्रकारच्या बाह्य स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन विद्यालयात प्रभावीपणे केले जाते. अप्रगत विद्यार्थी मार्गदर्शन, दत्तक पालक योजना, साप्ताहिक व विशेष सराव चाचणी या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पारदर्शक मूल्यमापन केले जाते. गुरूकूल वर्गांसाठी डीजीटल क्लासरूम्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत चमकले आहेत. कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत उत्तर विभागाचा पहिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार पवार करण बाबासाहेब यास मिळाला आहे. २०१३-१४ आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार एस.के.दूस यांना तर २०१४-१५ उत्कृष्ठ रयतसेवक पुरस्कार एस.ए.पुंडे यांना प्राप्त झाला आहे. २०१५-२०१६ चा श्रीगोंदा तालुका आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने जी.ई. वारूळे यांना गौरविण्यात आले आहे. विद्यालयाची उत्कृष्टाकडे वाटचाल पाहून रयत शिक्षण संस्थेने सन २०१६-२०१७ साली माजी केंद्रीय कृषिमंत्री, रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक आदर्श विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही विद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. १९६१ साली मंदिरात भरणारी शाळा माजी मुख्याध्यापक एस.जे. कसोटे यांच्या काळात ७ वर्गखोल्या बांधल्या. त्यानंतर टी.पी. कन्हेरकर यांनी पश्चिमेकडील २ मजली १० वर्गखोल्यांची इमारत बांधली. विद्यमान प्राचार्य ढुस यांनी पश्चिमेकडील इमारत तिसरा मजला, पूर्व पश्चिम तीन मजली इमारत अशा एकूण १८ सुसज्ज वर्गखोल्या बांधून पूर्ण केल्या.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्था साताराचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची प्रगतीचा आलेख उंचावत आहे. स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तुकाराम पाटील उगले, नामदार भाई शेख तसेच विद्यमान सरपंच बाळासाहेब उगले, उपसरपंच सुरेशराव तरटे, माजी सरपंच डॉ.दिलीपराव भोस डॉ.सुधीर गुंजाळ, डॉ.शिवराज धामणे, माजी न्यायाधीश नारायणराव भोस, सुधीर शेटे, सुभाष बोरूडे व इतर माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या विकासकामात स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून योगदान दिले आहे. त्यामध्ये शिरीष जाधव व अभियंता भोसले, माजी उपप्राचार्य सुभाषराव उगले यांच्याशिवाय दहावीच्या १९९६ विद्यार्थांच्या वतीने भरीव स्वरुपात मदत करुन, शाळेशी असलेले ऋणानुबंधाचे नाते जपले आहे. माजी विद्यार्थी सुनील पांडुरंग वाळके (शिक्षण निरीक्षक), गंगाधर पाराजी दाते (वित्त व लेखाधिकारी), अंबादास पोथीराम देवकाते, सुभाषराव वाळके यांचीही साथ लाभत आहे .
शब्दांकन : आमीन शेख, संपादक, श्रीगोंदा सिटीझन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय व शैक्षणिक गुणवत्तेचे कामकाज व भौतिक सुविधांचे कामकाज पूर्णत्वास नेले. सर्व वर्ग डिजिटल करून गुरुकुल समवेत इतर मुलांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरातील विद्यार्थ्याच्या तुलनेत तूसभरही कमी असता कामा नये, एवढीच सर्व सेवकांची तळमळ आहे.एस.के.ढूस, प्राचार्य
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित केलेल्या वेळेची आहे.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
