फकिरा.अण्णा भाऊ साठे(भाग ३४).

फकिरा..

जाऊन म्हणाला , ‘ आता मी तुला डोंगरात बांधून घालनार !

” ते पहाटे सातदऱ्यात आले , तेव्हा पहाटेचा वारा अंगाला चटके देत होता आणि चंद्र मावळत होता . वनराजीवर अंधार हळूहळू पसरत होता . पूर्वेला प्रकाशाची प्रखर रेषा स्पष्ट झाली होती आणि त्या रेषेचा छेद करीत एक प्रचंड काळा ढग अचल उभा होता ; परंतु त्या ढगाला चैतन्यमय वारा लोटून दूर करीत होता आणि प्रकाशाची अपरंपार किरणं त्या ढगाखालून भूमंडळापुढं धावत होती . त्या अनंत किरणांच्या समूहानं दक्षिणेला नवाच रंग आला होता . शीड मोडलेल्या तारूप्रमाणं रेशमी ढग वाहत होते . जंगल जागं होतं. पाखरं दक्षिणेचं ते अप्रतिम रूप पाहून दंग झाली होती .

सह्याद्रीचं एक शिखर गगनाला भिडलं होतं आणि त्या शिखरावर एक प्रचंड वटवृक्ष उभा होता . विशाल मस्तकावर शेंडी उभी राहावी , तद्वत तो महावृक्ष दिसत होता आणि त्याच्या अनंत पारंब्यांनी त्या पर्वताला घट्ट धरलं होतं . त्या पारंब्यांच्या मिठीत एका अतिप्राचीन देवळाचे अवशेष विस्कटून पडले होते . त्या देवळाच्या पश्चिमेला भिंतीला लागून उभा कडा होता . त्या कड्यावरून पाहता त्या भिंतीपासून दोन मैल सरळ खाली जमीन दिसत होती . ती बाजू अगदी बेलाग होती पाहणाऱ्याची नजर तरळत होती .

अशा त्या स्थळी फकिराचा तळ पडला होता . त्या देवळात येताच फकिरानं पाटील आणि बापू खोत यांना डांबून टाकलं नि भिंतीकडेनं आपली घोडी बांधून जागोजाग आपली माणसं पहाऱ्यावर ठेवली .

डोंगरावर येताच आता त्या दोघांचं काय करायचं , हा प्रश्न सर्वांपुढं उभा राहिला . जागोजाग टोळकी बसली आणि एकच चर्चा सुरू झाली . आमच्या सर्व दुःखाचं मूळ त्या दोघांत आहे . आता वाटेल ते होवो , आपण यांना सोडायचं नाही . मेलो , तरी त्यांना सोडायचं नाही आणि जर हे सुटले , तर आमचा वंशच नष्ट करतील . ही महाभयंकर माणसं मारूनच टाकली पाहिजेत . पण मारायची कशी ? कसलं मरण यांना द्यावं ? यांचा कडेलोट का करू नये ?

” निराशेच्या कोंडात सापडलेली माणसं गांगरत नाहीत . कारण झुंजणं हा त्यांचा स्वभावच बनलेला असतो . मन हे मूळचंच बेडर नसतं . ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं . जसे पोलाद निखाऱ्यांत कैक क्षण तापून बाहेर येतं नि कणखर होतं , तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती .

” अजून मुरा कसा आला न्हाय ? ” फकिरानं विचारलं .

” चढन अवघड हाय . ” साधू उत्तरला .

” उशीर केला त्येनं . ” यील आता चंद्र उगवल्यावर . ”

” आज कितवी घडी हाय ? ”

‘ आज मध्यान्हीला चंद्र उगवंल !

‘ फकिरा पुढं बोलला नाही . तो पुन्हा विचारमग्न झाला . मुरानं लौकर यावं , सत्तूकडची बातमी कळावी आणि आपण लौकर काय ते निश्चित करून टाकावं , म्हणून उत्सुक होऊन तो मुराची वाट पाहत होता .

सूर्य मावळून पुष्कळ उशीर झाला होता . डोंगरावर कीर झाडीत काळोख मी म्हणत होता . वडाच्या झाडाखाली ते सर्व बसून बोलत होते . सर्वांच लक्ष मुराच्या वाटेकडे लागलं होतं . तो येताच त्यांचं भवितव्य ठरणार होतं .

काल रात्री पकडून आणलेले खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड पडून कानोसा घेत होते . त्यांना हातपाय बांधून तिथं टाकलं होतं . आता आपण जगन नाही , याबद्दल त्यांची खात्री होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळं ते तळमळत होते . दैवानं आपली क्रूर थट्टा का करावी , म्हणून ते दैवाला शिव्या देत होते . हे जन्मभर सतावलेले बेरड आता एकदाच सर्व सूड घेणार ! आता जे होईल , ते सहन करणं यापेक्षा दुसरं काहीच इथं नाही !

असा विचार करीत ते दोघे सासरेजावई कण्हत पडले होते . त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून दोन कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकांपासून दूर ठेवलं होतं . त्यामुळं त्यांना काहीच करता येत नव्हतं . जसजशी रात्र उलटत होती , तसतसे आपण मरणासमीप जात आहोत , असं त्यांना वाटत होतं . रात्री अंधारातच त्यांना आणून त्या देवळात टाकलं होतं . दिवस त्यांनी त्या देवळात पडून काढला होता . बाहेर काय आहे , याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती .

परंतु खोतानं धीर सोडला नव्हता . तो अंधारात जगण्याची धडपड करीत होता . ज्या दगडाशी त्याला बांधला होता , त्यालाच तो हिसके देत बसला होता . बाहेरची हालचाल ऐकू येताच तो गप्प पडून पुन्हा कण्हत होता . सासऱ्याचं कण्हणं ऐकून पाटील शेवटची घडी मोजीत होता . मध्यान्ह रात्र उलटली आणि खोतानं तो दगड ओढला . दगड जमिनीवर पडला , तर आवाज होईल म्हणून त्यानं चटकन त्या पडत्या दगडाखाली पाठ दिली आणि मग हळूहळू त्याला ओढीत तो पाटलाजवळ आला . तो आपल्या दातांनी पाटलाच्या वाद्या कातरू लागला . उंदराप्रमाणे त्याचे हात सोडू लागला . जलद – अतिजलद तो कार्य करू लागला . मृत्यू पण आपल्यापासून दूर जात आहे , असं त्याला वाटू लागलं आणि शेवटी त्यानं पाटलाचे हात मुक्त करूनच निःश्वास घेतला . आपलं तोंड त्याच्या नाकाजवळ नेऊन तो म्हणाला ,

” हं , आटपा . माझे हात सोडा , लौकर … !

” चंद्र डोंगर चढू आला होता . सर्वत्र चांदणं पडलं होतं . वडाची प्रचंड” सावली मावळतीला लांबच्या लांब पसरल्यामुळे देवळालगतचा तो कडा त्या -सावलीनं झाकला होता आणि त्या सावलीत ते दोघे एकमेकाला मुक्त करीत होते .

पाटील सरळ होऊन खोताला सोडवू लागला आणि एकदम घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला . एकदम घाबरून बाहेरचा कानोसा घेत खोत म्हणाला ,

” ह्यो कोन आला असावा ? “

” येऊ दे . आपुन कसं निघायचं ? ” रावसाहेब पाटील कुजबुजला आणि खोत म्हणाला ,

” चंद्र वर आलाय . मागच्या मागं अंधारात चलू या !

‘ मुराला पाहून त्या सर्वांना आनंद झाला . फकिरानं त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडील बातमी ऐकायला उत्सुक होऊन मुराभोवती कडं करून बसले . हळू आवाजात मुरा म्हणाला ,

” कबीरा , चौगुला नि पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूनं कोंडलाय . टक्कूरं खाजवाय त्येला फुरसद न्हाय . छावनीकडं सरकन्यासाठी त्यो धडपडतोय ; पण काइ जमेना . तवा गोंधळ्यानं मला निरोप दिला , की तुम्ही चला . पवाराला हुलकावनी देऊन मी छावनीवर हल्ला करतो . तुम्ही तयार असा- ”

” पन कवा ? ” फकिरानं विचारलं आणि मुरा म्हणाला ,

” त्येच तर नक्की न्हाय ! “

” मग आता त्यो इच्यार सोडा ! ‘ ‘ फकिरा निराश होऊन म्हणाला , ‘ आता आम्हांला हजर झालं पायजे-

” रात्री पंतांची भेट , सर्व लोकांची धरपकड नि खोत , पाटील यांना आपण केलेली अटक हे सर्व मुराला सांगून फकिरा म्हणाला ,

” सरकारचा हुकूम हाय , की आम्ही मानसांनी छावनीवर हजर व्हावं , तरच आमची अटक झालेली बायका – पोरं मोकळी व्हतील ! “

” दहाजनं ? ” मुरा म्हणाला , ” कोन कोन ? ”

‘ फकिरा म्हणाला , ” मी फकिरा , मुरा , बळी , हरी , पिरा , सावळा , तायनू , भिवा , खंडू आणि दहावा घोंचीकर बळी ! पन बळीला अटक झाली- ”

” काय ? बळीला अटक ? ‘ मुराला धक्का बसला आणि फकिरा म्हणाला , ‘ आता कामाला लागा . सकाळी आपून छावनीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काय त्यो निकाला लावा . चला ! ”

पाटील नि खोत यांचं नाव निघताच सर्व उठले आणि देवळात गेले , परंतु ते दोघेही तिथं नव्हते . ते दोघे पळून गेल्याचं लक्षात येताच सर्वांना धक्का बसला . सावळा ओरडला .

” दाजी , त्ये पळालं की “

” पळतील कसं ? ” फकिरा म्हणाला , ” म्होरं आम्ही हाय , मागं वाट

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading