फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग ४).

फकिरा..

चालीवर लावला , गाव राणोजीला आडवा निघाला .

परंतु राणोजी त्या गाडीमार्गानं येत नव्हता . त्यानं माळानं येऊन शीव गाठली होती , तरीही खोत मागे फिरला नव्हता . तो अधिकच चिडून पुढं येत होत पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती . ती कधी जवळ भिडत होती , तर कधी मागं राहत होती . माळाचा आरडाओरडा वाढला होता . गज्या माळी राणोजीला भिडून होता , तोच खोत ओरडला ,

” गज्या , भाला फेक , लेका !

” गज्यानं झुकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला . तो वजनदार भाला राणोजीच्या पाठीत खपकन शिरला . त्याच्या बधिर अंगात आधीच कळ मेली होती , ती किंचित वळवळली . तो रक्तानं न्हाला . त्यानं पाठीत भाला घेऊन गज्यावर रोख धरला . खोत पुढं येऊन बाजूला झाला . आणि पुन्हा गज्या माळी जवळ आला . राणोजीनं खसकन वार मारला . पागोटं तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली , उतरली आणि गज्या घोड्याखाली कोसळला .

पडलेला गज्या पाहून खोत चिडला . ओरडू लागला . गाडीवाटेनं निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला ; पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं .

गज्या खाली पडताच बापूनं आपला घोडा राणोजीच्या जवळ नेला आणि मागं उसण घेऊन भाला फेकला . तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला . त्याबरोबर पळून दम उखडलेला गबऱ्या पुढच्या दोन पायावर कोसळून पडला . त्याचं ऊर फुटून तो रक्त ओकू लागला . राणोजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंड पडली . त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्यावर वार झाले . पुन्हा पुन्हा झाले . मग तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला .

खोतानं वाटी शोधली . ती मिळाली नाही . मग राणोजीचं शिर घेऊन तो परत फिरला .

आणि वाटेगावचे लोक तिथं आले . तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला . एक मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला , भडकला . शिगावकरांनी रिवाज मोडला होता .

दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बडवू लागला . राही , राधा एका वावरात लोळू लागल्या . पोरं दीनवाणी होऊन रडू लागली . गाव जमला . लहानथोर रडू लागले . बायांनी राहीबाई निराधा यांना आवरलं .

विष्णुपंत आले . त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला . त्यांचा चेहरा उग्र झाला . सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले – आता पंत काय सांगणार ?

पंत दाटल्या कंठानं म्हणाले ,

” खोतानं अपराध केला आहे . एक मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं आहे . ते परत आल्यावाचून या प्रेताला अग्नी देता येत नाही . आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही . शिर आणीन वा शिर देईन ! ” असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली . काळापांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला . राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला . ” मी शिगाव बेचिराख करीन , नाहीतर वाटेगावला आग लावून मीही जळून मरेन ! चलाऽऽ

” पुन्हा तो मानवलोंढा निघाला . भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता . मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता . तायनू महार भाला परजीत सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता . कु – हाडी लखलखत होत्या . तरवारी झळझळत होत्या . दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता . दुलाजी ढेकणा , नाना डोंगरा , पांडू नांगरा , बळी मांग , आप्पा मांग , सावळा मांग – एकूण एक म्हातारा नि तरणा माळानं पळत होता.

राणोजीचं शिर घेऊन आणू , नाहीतर आपलं शिर देऊ , हा सर्वांचा निर्धार झाला होता . फक्त भैरू रामोश्याचा विचार वेगळा होता . तो म्हणत होता

” एका शिराची किंमत मी पन्नास शिरं घेणार !

” त्यानं गावासाठी शिर दिलं , म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झाला .

ईर्षेचा डोंब झाला होता . वाटेगावचे लोक भान हरपले होते , आपल्या हद्दीत शिरून , नियमाला मोडून बापू खोतानं आगळीक केली होती ; त्याचा सूड घ्यायच्या हेतूनं लहानथोर धावत होते .

त्वेषानं बांध फोडला होता . तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणाणीत होता . मारण्यामरण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बाहू स्फुरण पावत होते . गोफणीचे पागुरे तयार झाले होते . सर्व लोक ओरडत होते :

” शिगाव जाळून बेचिराख करा !

” शिगावात वातावरण भयभीत झालं होतं . जत्रेत उडालेली दाणादाण आवरत आली होती . दंगलीत चुकलेली पोरंबाळं आपापल्या घरी आल्यामुळं आनंद झाला होता ; पण भीती गेली नव्हती . राणोजीच्या एकाच घावात रामज्या लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळे लोहाराची आळी रडत होती . गज्याचं मदं वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून माळ्यांची घरं आक्रोश करीत होती . परगावचे जत्रेकरू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते . जो तो म्हणत होता , … पळा लेका . गव्हासंगं किडा रगडंल . कैक घोंगडी माळाला पडली होती . कैक पायताणांची ताटातूट झाली होती . किती काठ्या , किती कुऱ्हाडी बेवारशी झालेल्या दिसत होत्या .

त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्हाऊन घरी गेला होता . त्याच्या पराक्रमानं बाजीबा खोत खूष होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता : ‘ घाबरू नका . माझ्या बापून जोगणी पळविणाऱ्याचं शिर आणलं . आपली जोगीण गेलेली नाही . या बाहेर . पुन्हा जत्रा भरवू या . चला . आता सर्व काही शांत झालं आहे .

‘ परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं . बाजीबाला मात्र भान नव्हतं . बापू जेव्हा राणोजीचं शिर घेऊन आला , तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं ,

” कोण होता तो ?

” ” राण्या मांग – वाटेगावचा .

” ” कुठं सापडला ?

” माळाला .

” ” आपली किती माणसं दगावली ?

” ” चार हातं नि दोन माळाला .

” ” सहा ? मग जबरा होता , तर !

” ” म्या त्याचं मुंडकं मारून येशीला टांगलं .

” ” शाब्बास ! ” असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता . त्याला चेव आला होता . तो ओरडत होता ,

” आपली जोगणी गेली नाही . बाहेर या !

” तोच रघू मान्या घोडं तकाटीत आला . बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हटलं ,

” वाटेगावची माणसं माळावर आली . लढाईची तयारी हाय त्येंची . माळाला माणूस माईना .

” किती माणूस आहे ? ” ” दाद न्हाय . ” आपली माणसं बाहेर काढा . हत्यारं घ्या . ” बाजीबा ओरडला . ” त्यांना गावात शिरू देऊ नका . गावाबाहेर रोखा .

” एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला , त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता . घोडा येताच बाजीबा झेप घालून वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला : ” बाहेर पडा , वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका , नाही तर गाव बेचिराख होईल !

” शिगावकरांनी प्रसंग जाणला . म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला . ते बाहेर पडले . शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या . कडवी , तडफदार माणसं पुढे निघाली . काहींनी नाकी रोखली . जागोजाग दगडाचे ढीग लावले . गोफणी सज्ज झाल्या . बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली .

हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली . खाचखळगे ओढे , ओघळी , सर्व काही सपाट झालं . वाटेगावचे लोक थांबले . माळावर त्यांनी तळ दिला . विष्णुपंतानं सल्ला दिला , ” सूर्योदयापर्यंत शांत राहा , रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल , सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू , तोपर्यंत शिगावकरांच मत काय आहे , तेही अजमावता येईल . कोणीही चढाईची भाषा करू नका ।

” हे ऐकून लोक शांत झाले . त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं . त्याबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळत गेला . भडकलेली डोकी जरा शांत झाली . राणोजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती दोन प्रेतं पाहून जो त्वेष चढला होता , तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले ; पण अन्यायाची चीड नि लढण्याची धमक कायम होती … ‘ राणोजीच शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ ‘ , अशी भाषा कैक बोलत बसले . ” जर आपण पन्नास शिरं घेऊ , तरच रामूशांची अवलाद ‘ असं भैरू म्हणत होता . ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता . त्या निवडुंगात काय वास करतं , कोण जन्मतं , कोण मरतं , हा कोणाचा मुलगा , हा कोणाचा नातू , याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती , त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी – गावाच्या जत्रेसाठी – स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं . अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं , तसं वाटेगाव झटू लागलं . प्रत्येक माणूस हळहळला , चिडला .

आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता . सारा गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला गेला होता . तिथं काय होणार ? जर लढाई झाली , तर कोण मरणार आणि कोण जगणार ? या एकाच विचारानं गावात जे उरले होते , ते व बायकापोरं विचार करीत होती . सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते .

शिगावची सहा माणसं कामी आली होती , कैक जखमी झाली होती .

परंतु इंग्रजी सत्ता शांत होती . पाहात होती . ती काहीही करू शकत नव्हती .

कारण कोणत्याही धार्मिक बाबीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही , असा राणीचा जाहीरनामा होता . त्या वचनाला ती बांधली गेली होती . जोगणी ही धार्मिक बाब आहे , असं म्हणून सरकार स्वस्थ होतं . शिवाय हे लोक आपापसांत लढून मरत होते , हाही काही थोडाथोडका फायदा नव्हता त्यांचा . शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते . ते सूर्योदयाची वाट पाहत होते . त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती ; रात्र मी म्हणत होती , पावसाचे ढग आकाशात गडगडत होते . अक्राळविक्राळ आकृत्या करून लोंबकळत होते . मध्येच चांदण्या लखलखत होत्या . तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिभल्या चाटीत होती .

निःशब्द शांतता पसरली . निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या. सर्वांच्या

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading