पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईसाठी बहुजन समता पार्टी व दलित महासंघाचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण..

दिनांक ९ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:

बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट व त्यांच्या कुटुंबियावर तलवारी, काठ्या व लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी बहुजन समता पार्टी व दलित महासंघाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज आमरण उपोषण केले.

हा हल्ला नवनाथ आबू दिवटे व त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी अद्याप संबंधित आरोपींवर योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

या उपोषणामध्ये बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, पीडित प्रियांका सकट, जेष्ठ नेते नामदेव चांदणे, तसेच जिल्ह्यातील विविध नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला. उपोषणामुळे प्रकरणाची दखल घेत, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची चौकशी करण्याचे व उर्वरित आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिले. तसेच, तपास अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे सक्त आदेश दिले. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

उपोषणामध्ये बहुजन समता पार्टीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष विजय दणाने, दलित महासंघाचे प्र. अध्यक्ष काशिनाथ सुलाखे, सरपंच मीनाक्षी सकट यांच्यासह अहिल्यानगर, सातारा, सांगली, नाशिक येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले.

स्रोत:(आंदोलनं)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading