ए.डी.सी.सी. बँकेची पठाणी कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी.अन्यथा आमरण उपोषण करणार :- टिळक भोस.

दिनांक २८ मार्च,श्रीगोंदा:

सध्या अहमदनगर जिल्ह्यासह राज्य व देशात कलम १४४ संचारबंदी लागू असताना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालक मंडळाच्या शुक्रवार दि २७ मार्च २०२० च्या बैठकीत ३१ मार्च २०२० पर्यंतच्या थकीत कर्जांची तातडीने वसुली करण्यात यावी असे पत्र काढले आहे. देश कोरोना विषाणूच्या संकटातून जात असताना सहकारी सोसायटी सचिव व शेतकरी यांच्या जीविताला धोका पोहचेल अशा प्रकारचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याने, त्यांचावर कायदेशीर गुन्हे दाखल करून बेकायदेशीर कर्ज वसुली थांबवण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य, मा.ना. अजितदादा पवार, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र,मा.ना.बाळासो पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र, मा ना अनिल देशमुख सो, गृहमंत्री महाराष्ट्र यांना दिलेल्या निवेदनामार्फत केली आहे.

याविषयी माहिती देताना भोस यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सर्व तालुका विकास अधिकारी, शाखाधिकारी, इन्स्पेक्टर, सचिव, सेवा सोसायटी यांनी २०१९ – २० मध्ये वाटप केलेल्या थकीत अल्पमुदत पीककर्जाची वसुली करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे. तसेच जा क्र- प्रसोनेल ५५४८ नुसार जिल्ह्यातील सर्व शाखा २८ व २९ मार्च रोजी चालू ठेवण्यात याव्यात असा आदेश वसुलीसाठी काढला आहे. बँकेचे हे कृत्य अमानवी असून,नुकतेच केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून पुढील ३ महिने कोणत्याच कर्जाची वसुली करू नये,अशी घोषणा केली आहे. मात्र,अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र,कर्ज वसुलीवर ठाम आहे.

नुकत्याच महाराष्ट्र सरकारने “महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजने”अंतर्गत शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ केले आहेत.यामध्ये बँकेची सर्वात जास्त वसुली झालेली असताना सुद्धा बँक चुकीच्या वेळी कर्ज वसुली करत आहे. तरी ए.डी.सी.सी. बँकेची ही पठाणी कर्ज वसुली तातडीने थांबवण्यात यावी. तसेच बँकेने राज्य व केंद्र सरकारचा १४४ संचारबंदीचा सार्वत्रिक भंग होईल अशा प्रकारचे पत्रक काढले, त्या प्रकरणी बँक संचालक व अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊन सर्व संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अन्यथा संचारबंदी काळात मी घरीच आमरण उपोषण सुरु करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading