तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

दिनांक २८ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:

दारू पिण्यावरून हटकल्याच्या रागातून गोसावीवाडी (ता. श्रीगोंदा) येथील एका तरुणावर लोखंडी गजाने आणि पाईपने भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी प्रतीक बबन लष्करे (वय ३८) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४) रात्री ८:२० च्या सुमारास फिर्यादी प्रतीक लष्करे हे मांडवगण येथून औषधे घेऊन घरी परतत होते. ‘हॉटेल निवांत’ समोर भाजी घेण्यासाठी ते थांबले असता, पाठीमागून आलेल्या श्रीमंत अशोक घोडके आणि दत्ता अशोक घोडके (दोघे रा. गोसावीवाडी) यांनी दोन अनोळखी साथीदारांसह त्यांना गाठले.

“आम्हाला दारू पिऊ नको म्हणणारा तू कोण?” असा जाब विचारत श्रीमंत घोडके याने प्रतीक यांच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला.

हल्ला इतका भीषण होता की, प्रतीक खाली कोसळल्यानंतरही दत्ता घोडके याने लोखंडी पाईपने त्यांच्या छातीवर, बरगडीवर आणि हातावर बेदम मारहाण केली.

यावेळी आरोपींनी लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतीक यांना “पुन्हा नादी लागला तर चाकूने खुपसून मारून टाकू,” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या प्रतीक लष्करे यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, पीडित तरुणाने पत्रकार आणि माध्यमांशी संवाद साधून पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणातील आरोपींवर कडक कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. श्रीगोंदा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading