अखेर संत शेख महंमद बाबा यात्रेत विनापरवाना पाळणे उभारणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.. आंदोलनाला यश..

दिनांक २६ मार्च २०२५ श्रीगोंदा:

श्री संत शेख महंमद महाराज यात्रेनिमित्त श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले गार्डनसमोर, पार्वतीनगर आणि पारगाव रोड परिसरात परवानगीविना मनोरंजनाची साधने (पाळणे) उभारल्याप्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेत रचना सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या सौरभ पुंडलीक कनोजे (वय २५) यांनी ही तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आज दाखल केली.

१० व ११ मार्च २०२५ मध्ये श्रीगोंदा शहरातील नगरपरिषद हद्दीमध्ये श्री संत शेख महंमद महाराज यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थानिक इसम १) संतोष पांडुरंग खेतमाळीस, २) सुनिल लक्ष्मण काळे, ३) विशाल गौतम घोडके, ४) संदीप दिलीप उमाप, ५) रमेश बबन मखरे, ६) बापू बाबा माने (सर्व रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी महात्मा फुले गार्डनसमोर तसेच पार्वतीनगर आणि पारगाव रोड परिसरातील गट नं. ९०६, ९०७, ९०८ मधील प्लॉटधारकांची परवानगी घेऊन विविध मनोरंजनात्मक साधने (पाळणे) उभारली होती.

यामध्ये रहाट पाळणा, आकाश पाळणा, ब्रेकडान्स, ड्रॅगन ट्रेन, क्रॉस व्हिला, नावडी, सुनामी टॉवर आणि लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे पाळणे यांचा समावेश होता. सदर साधनांसाठी त्यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेकडे नाहरकत परवानगीसाठी अर्ज केले होते. परंतु, नगरपरिषदेने मानवी सुरक्षिततेचा विचार करून आणि जागेवरील अनधिकृत संरचनेचा उल्लेख करत सदर परवानगी नाकारली होती. तसेच, संबंधित प्लॉटधारकांना अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीसही पाठवण्यात आली होती.

सदर नोटीसला उत्तर न देता व नगरपरिषदेची परवानगी न घेता ७ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत वरील सहा व्यक्तींनी गट नं. ९०६, ९०७, ९०८ मधील प्लॉटवर मनोरंजनात्मक पाळणे उभारून ती नागरिकांसाठी खुली केली. त्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादी सौरभ कनोजे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय मनोरंजनाची साधने उभारणे हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार बेकायदेशीर प्रकार आहे. तसेच, यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याने सदर व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पुढील तपासादरम्यान दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते आहे.

या कारवाईसाठी बहुजन समाज पार्टी आणि ऑल इंडिया पॅंथर सेना अहिल्यानगर चे पदाधिकारी अमर घोडके, नितीन जावळे, भीमराव घोडके, अंबादास घोडके, सत्यवान शिंदे, संजय रणसिंग, अनिल शिंदे सुनील शिंदे सह पदाधिकारी यांनी वारंवार आंदोलन केले होते. शेवटी आज श्रीगोंदा नगरपालिकेतील मुख्याधिकारी भगत मॅडम यांच्या कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर नमूद फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

स्रोत:(पोलीस फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading