दिनांक २७ मार्च २०२५ श्रीगोंदा, अहिल्यानगर:
श्रीगोंदा तालुक्यातील भूमिपुत्र श्री. वैभव घालमे (ICAS) यांची भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संचालक (Director) या अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. २५ मार्च रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

वैभव घालमे हे २०११ बॅचचे भारतीय वित्त व लेखा सेवा (ICAS) अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी वित्त मंत्रालय, श्रम मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पेन्शन विभाग या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. गृह मंत्रालयात कार्यरत असताना त्यांनी वार्षिक अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन आणि वितरण प्रभावीपणे सांभाळले. तसेच, त्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांचे वित्तीय सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.

श्री. वैभव घालमे यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय, खडतर आणि प्रेरणादायी आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या घालमे यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. “माझा मुलगा अधिकारी व्हावा” ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती आणि याच प्रेरणेतून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली.

दिल्लीतील तयारीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या मातोश्री किराणा दुकान चालवून शिक्षणाचा खर्च भागवू लागल्या. तसेच, त्यांचे मामा यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली. दिल्लीत त्यांनी एका छोट्याशा खोलीत मित्रांसोबत राहून अभ्यास केला. जागेअभावी त्यांनी आपल्या मित्रांसोबत ८ तासांच्या शिफ्टमध्ये टेबल-खुर्ची वापरून अभ्यास केला. क्लास आणि घर यामध्ये १५ किमी अंतर असल्याने त्यांनी जुन्या भंगार दुकानातून सायकल खरेदी करून प्रवास सुरू ठेवला.
२००९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC च्या थेट मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. मात्र, मुलाखतीच्या अवघ्या एका महिन्याआधी त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांना पुरेशी तयारी करता आली नाही. या दुःखातून सावरत त्यांच्या मातोश्रींनी त्यांना पुन्हा उभारी घेण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दिल्लीला परत जाऊन जिद्दीने अभ्यास केला आणि UPSC परीक्षेत यश मिळवत भारतीय वित्त व लेखा सेवेत (ICAS) अधिकारी म्हणून निवड झाली.

श्री. घालमे यांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड होती. त्यांनी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये यश संपादन केले. नवोदय विद्यालयात निवड झाल्यानंतर त्यांनी इयत्ता १०वी पर्यंत सतत प्रथम क्रमांक मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.
घालमे परिवार शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. त्यांचे मोठे बंधू डॉ. शिवप्रसाद घालमे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत, तर डॉ. शिवप्रसाद घालमे यांच्या पत्नी वकील असून श्रीगोंदा कोर्टात कार्यरत आहेत.
घालमे परिवार शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. त्यांचे मोठे बंधू डॉ. शिवप्रसाद घालमे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत, तर डॉ. शिवप्रसाद घालमे यांच्या पत्नी वकील असून श्रीगोंदा कोर्टात कार्यरत आहेत.

श्रीगोंद्याच्या तरुणांसाठी वैभव घालमे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. “माझ्या शैक्षणिक यशामागे वैभव यांची प्रेरणा आहे,” असे त्यांचे मोठे बंधू डॉ. शिवप्रसाद आवर्जून सांगतात. वैभव घालमे यांना ग्रामीण भागातील तरुणांच्या समस्यांची जाणीव असल्याने ते गावी आल्यानंतर नेहमी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
श्रीगोंद्याच्या मातीतून केंद्र सरकारच्या मंत्रालयात उच्च पदावर पोहोचलेल्या श्री. वैभव घालमे यांचा प्रवास संघर्ष, मेहनत आणि जिद्दीचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांच्या या यशामुळे श्रीगोंदा तालुका आणि जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
स्रोत:(शिवाजी पोटे)
