दिनांक २६ मार्च २०२५, श्रीगोंदा, अहिल्यानगर..:
श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक सचिन पांडुरंग खताळ (वय ३८) यांना ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही यशस्वी सापळा कारवाई केली.

तक्रारदार हे वकील असून, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी स्वतः आणि इतर २७ लोकांनी मिळून गट क्रमांक ११७१ मधील २८ आर जमीन विकत घेतली होती. त्यानंतर आज (२६ मार्च २०२५) त्यांनी आपल्या पार्टनरच्या अविभाज्य हिश्श्यापैकी १ आर क्षेत्र विक्रीचा दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दिला.
त्यावेळी दुय्यम निबंधक खताळ यांनी दस्त नोंदविण्यासाठी ५००० रुपये लाचेची मागणी केली. याशिवाय, याच प्रकरणात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेल्या दस्ताची नोंदणी करण्यासाठीही १०,००० रुपयांची मागणी त्यांनी केली होती.

तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर खात्री करण्यासाठी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यात दुय्यम निबंधक खताळ यांनी तक्रारदारास “तुमच्या हिशोबाने द्या” असे म्हणत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचून खताळ यांना ५००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.

या प्रकरणी आरोपी सचिन पांडुरंग खताळ यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Advertise..
