श्रीगोंदा पोलिसांच्या कारवाईत दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अटकेत..

दिनांक २६ मार्च २०२५, श्रीगोंदा:

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आणि सराईत आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपी गणेश शिवाजी काळे (वय ३६, रा. तांदळी दुमाला, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चाकण पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याला पुढील तपासासाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश काळे हा आढळगाव शिवारात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संपत कन्हेरे आणि त्यांच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर गणेश काळे तेथे आल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले.

अटक करण्यात आलेला गणेश काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. चाकण पोलिस स्टेशन गु.र.नं  नुसार भारतीय दंड संहिता कलम ३१०(२) आणि ३११ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईत पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी (कर्जत विभाग) विवेकानंद वाखारे आणि पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने महत्वाची भूमिका बजावली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोलीस नाईक गोकुळ इंगावले, संग्रमा जाधव, तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, संदीप शिरसाठ आणि संदीप राऊत यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या कारवाई आणि श्रीगोंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणखी एका फरार गुन्हेगारास अटक करण्यात यश आले असून, त्यामुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading