दिनांक २६ मार्च २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा अवघ्या २४ तासांत छडा लावत ३४,००० रुपये रोख रकमेसह मोटारसायकल जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दि. २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते ७:१५ या दरम्यान श्रीगोंदा शहरातील हनुमान ट्रेडर्स, श्रीगोंदा येथे चोरीचा प्रकार घडला. फिर्यादी अतुल रायचंद मेथा (रा. रविवारी पेठ, तेली गल्ली, श्रीगोंदा) यांच्या दुकानातून अज्ञात व्यक्तीने संमतीशिवाय ७०,००० रुपये रोख लबाडीच्या इराद्याने चोरून नेले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ०२९४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी सापळा रचून आरोपी श्रीपाद उर्फ कमलेश सुरेश लोखंडे (वय ३३, रा. म्हातारपिंप्री, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली ३४,००० रुपये रोख आणि गुन्हा करताना वापरलेली ८०,००० रुपये किंमतीची डिलक्स मोटारसायकल जप्त केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री. विवेकानंद वाखारे आणि श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. श्री. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलिस नाईक गोकुळ इंगावले, पोलिस हवालदार संदीप शिरसाठ, पोलिस हवालदार संदीप राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. तसेच पुढील तपास पोलिस नाईक संग्राम जाधव आणि पोलिस हवालदार संदीप आजबे करत आहेत.

श्रीगोंदा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले असून पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे. श्रीगोंदा शहरातील सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सतर्क असून अशा घटनांवर तात्काळ कारवाई केली जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
