धनगरवाड्यातून थेट IPS पर्यंत!’ — मेंढपाळाचं पोरगं बनलं IPS ऑफिसर: बिरदेव डोणे यांची यशोगाथा..

लेख: संकलन: पत्रकार समाधान महाराज नाडकर..

यूपीएससी परीक्षेत यश मिळवणं हे आजही लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहानशा यम नावाच्या गावाजवळ, धनगरवाड्यातून उठून एक तेजस्वी तारा उजळला आहे—बिरदेव सिद्धाप्पा डोणे! साध्या मेंढपाळाच्या पोराने आपल्या जिद्द, मेहनत आणि स्वप्नांच्या जोरावर थेट UPSC परीक्षेत ५५१ वा क्रमांक पटकावत आयपीएस पदाला गवसणी घातली आहे.

बिरदेव यांचं बालपण हे मेंढ्यांच्या कळपामागे फिरण्यात गेलं. वडील मेंढपाळ, घरात शिक्षणाचं वावगं वातावरण, पुस्तकांची टंचाई आणि वीजेचा अभाव. पण या सर्व अडचणींवर मात करत, त्यांनी मनात एक ठाम निर्धार केला—”आपलं आयुष्य बदलायचंय!” सरकारी शाळेत शिकत असतानाच अभ्यासाची गोडी लागली आणि तीच प्रेरणा पुढं वाटचाल करत राहिली.

कोचिंगसाठी मोठ्या शहरात जाण्याची सोय नव्हती, त्यामुळे जे काही साधन उपलब्ध होतं, त्याचा पूर्ण उपयोग करून बिरदेव यांनी आपली तयारी सुरू ठेवली. वडिलांसोबत उन्हातान्हात फिरताना, गुरे राखताना त्यांनी आपल्या मनात UPSC चा संकल्प घट्ट धरून ठेवला. कुठेही खचून न जाता, सतत मेहनत घेत राहिले. आणि अखेर २०२५ मध्ये, त्यांनी UPSC परीक्षेत ५५१ वी रँक मिळवत ‘IPS अधिकारी’ होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं.

निकाल जाहीर झाला, तेव्हा बिरदेव हे बेळगावजवळ मेंढ्या चारत होते. मित्राचा फोन आला – “बिरदेव, तू IPS झालास!” त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि चेहऱ्यावर अनमोल हास्य. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण धनगरवाडा जल्लोषात न्हालून निघाला. पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान शब्दात मांडता येणं शक्य नाही.

बिरदेव डोणे यांची ही कहाणी केवळ एक यशोगाथा नाही, ती एका पिढीला प्रेरणा देणारी आहे. त्यांनी सिद्ध केलं की परिस्थिती कधीच यशाच्या आड येत नाही, जर तुमचं स्वप्न मोठं असेल आणि त्यासाठी मेहनतीला कमी नसेल.

“परिस्थिती तुमची नसेल, पण विचार तुमचे असतात. आणि तेच विचार तुम्हाला यशाकडे घेऊन जातात,” हे त्यांनी आपल्या जीवनातून जगाला दाखवून दिलं.

आज त्यांच्या यशाचं किरण धनगरवाड्याच्या शेळ्या-मेंढ्यांच्या गाभाऱ्यातून झिरपत, संपूर्ण महाराष्ट्रात झळकतंय. ही गोष्ट प्रत्येक युवकाने मनात साठवून ठेवावी – हार मानू नका, परिस्थितीवर मात करा, कारण आपलं भविष्य आपल्याच हातात असतं!

स्रोत:(पत्रकार समाधान महाराज नाडकर यांनी संकलन केलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading