दिनांक १८ डिसेंबर २०२५, अहिल्यानगर/नागपूर/श्रीगोंदा:
जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टाच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील चंदन बंधूंनी सिद्ध केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी संयुक्त गट-ब २०२४ परीक्षेच्या निकालात अजय मालन चंदन याची ‘राज्य कर निरीक्षक’ (STI) पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, अजयचे दोन्ही मोठे भाऊ देखील एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.

एकाच कुटुंबातील तीन सख्खे भाऊ स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची ही दुर्मिळ आणि श्रीगोंदा तालुक्यासाठी भूषणावह गोष्ट आहे.
दिलीप मालन चंदन: (मोठे बंधू) २०१० मध्ये पीएसआय पदी निवड. सध्या नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत.
विजय मालन चंदन: (दुसरे बंधू) २०१२ मध्ये पीएसआय पदी निवड. सध्या पुणे शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत.
अजय मालन चंदन: (धाकटा भाऊ) आता राज्य कर निरीक्षक (STI) पदी निवड.
दिलीप आणि विजय हे दोघेही सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याच्या ध्येयाने त्यांनी एमपीएससीचा मार्ग निवडला. आपल्या मोठ्या भावांचा आदर्श समोर ठेवून अजयने पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर केडगाव येथे राहून परीक्षेची तयारी केली आणि यश संपादन केले.
चंदन बंधूंच्या या यशात त्यांच्या आईचा वाटा सर्वात मोठा आहे. आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. “स्पर्धा परीक्षेत सातत्य आणि योग्य नियोजन असेल तर यश नक्की मिळते,” अशी भावना अजयने निवडीनंतर व्यक्त केली.
“तीन सख्खे भाऊ एकाच घरातून अधिकारी होणे ही केवळ आमच्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
