दिनांक १० डिसेंबर २०२५, पुणे/श्रीगोंदा:
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कासारी फाटा (ता. शिरूर) येथे काल, मंगळवारी (ता. ९) रात्रीच्या सुमारास झालेल्या एका विचित्र अपघातात पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा येथून फुले घेऊन निघालेल्या पिकअपला कंटेनरने धडक दिली.
या अपघातात चंद्रकला संदीप मुळे (वय ६५, रा. केज, जि. बीड) या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर किया कारमधील जयवंत रानुजी भाकरे, विजया जयवंत भाकरे आणि रामदास देवराम भाकरे हे तिघे जखमी झाले आहेत.
पिकअपला पाठीमागून वेगात येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यानंतर कंटेनरने पुढे आणखी एका कारला, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेला आणि दोन दुचाकींना धडक देत थेट एका चहाच्या टपरीत घुसून हा विचित्र अपघात झाला.

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील तेजस विलास पंदरकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कंटेनर चालक सरफराज बशीरभाई नरसलीया (रा. राजकोट, गुजरात) हा नशेत आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने हा अपघात घडला. त्याच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या चौकात वारंवार अपघात होत असल्याने येथे कायमस्वरूपी पोलीस नेमणे, गतिरोधकांची उंची वाढवणे आणि इशारा दिवे बसवण्याची मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
