दिनांक ३ सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे या दोघांनी श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर लढवून जिंकलेली आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षात प्रवेश करून, श्रीगोंदा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार आ. बबनराव भिकाजी पाचपुते यांचा प्रचार त्यांनी केलेला आहे. त्यानंतर राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे काम सुरू केलेले आहे.
एकंदरीत श्री. व सौ. पोटे हे काँग्रेस, भाजपा आणि पुन्हा काँग्रेस मध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्या वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम (३) (१) (अ) प्रमाणे अपात्र ठरवावे आणि अर्हतेच्या तारखेपासून सहा वर्षापर्यंत त्यांना अध्यक्ष तसेच नगरसेवक राहण्यात व होण्यास अनर्ह ठरवावे. असा अर्ज टिळक भोस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला होता. त्याची सुनावणी दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आलेली आहे. अशी माहिती अर्जदार आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या माहितीनुसार भोस यांनी नमूद केले आहे की, सौ. शुभांगी पोटे आणि मनोहर पोटे हे वारंवार पक्ष बदलून पक्षांतर बंदीच्या कायद्याची पायमल्ली करीत आहेत. म्हणून, मी स्वतः व ॲड. ऋषिकेश गायकवाड, सतीश बोरुडे आणि अख्तर शेख अशा चौघांनी त्यांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केलेला आहे. या दाव्यात श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीपासून आतापर्यंतच्या त्यांच्या वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीचे पुरावेही आम्ही सादर केलेले आहेत. अशा वारंवार पक्ष बदलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यापूर्वी अनर्ह केल्याचे दाखलेही आम्ही आमच्या अर्जामध्ये नमूद केलेले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष शुभांगी पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांना कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र ठरविण्याची मागणी केल्याचे टिळक भोस यांनी माध्यमांना सांगितले आहे.
(नमूद प्रकरणी प्रतिवादी मनोहर पोटे यांना माहितीस्तव संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.)
स्रोत:(टिळक भोस यांनी दिलेली माहिती व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडील नोटीस)
