मित्राला कसेबसे ‘हो’ म्हणून फोन बंद केला. भारतातले पहिले आयएएस अधिकारी, भारतातील पहिल्या महिला कलेक्टर, महाराष्ट्रातले पहिले आयएएस अधिकारी… युपीएससीच्या अभ्यासादरम्यान वाचलेली ही सर्व नावं डोळ्यांसमोर तरळत होती. आपल्याही नावासोबत भारतीय प्रशासकीय सेवेतील ही सर्वोच्च पदवी असणार की नाही ? आपलं स्वप्न पूर्ण होणार की नाही ? माझ्या कुटुंबाच्या हालअपेष्टा आतातरी संपणार की नाही ? अशा अनेक विचारांनी मनात काहूर उठला होता. धडधडत्या अंतःकरणाने मोबाईलवर युपीएससी ची साईट उघडली.

तेवढ्यात निकाल लागल्याची बातमी ऐकून, माझा गावातला मित्र रवींद्र मला शोधत ताईकडे आला. काहीही न बोलता त्याने विश्वासाने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. ताई दारात बसून उत्सुकतेने मी काय सांगतो, याची वाट बघत होती. मोजता न येणाऱ्या गतीने माझं हृदय धडधडत होतं. आईचं व देवाचं स्मरण करून मी सर्च पोर्टलमध्ये माझा रोल नंबर टाकला. एंटरचं बटन दाबलं व लगेच डोळे मिटून घेतले. तो क्षण आठवला की आजही अंगावर शहारे येतात. त्या एका क्षणात मी काय काय अनुभवलं नव्हतं ? इच्छा, आकांक्षा, स्वप्न, हताशा, अनिश्चितता, हुरहुर, मनाच्या अशा असंख्य अवस्था त्या एका क्षणात एकवटल्या होत्या. मनात असंख्य विचार व डोक्यात अनेक प्रश्न घेऊन मी सावकाश डोळे उघडले.
समोर मोबाईलवर हिरव्या बॅकग्राऊंडमध्ये एक नाव उमटलं होतं – Rank – 709 Name : Rajendra Bharud माझ्या डोळ्यांत अलगद अश्रू तरळले. मन अगदी तळापर्यंत रिकामं झालं. सभोवतालचं जग जणू क्षणभर अदृश्य झालं. डोक्यात आता कसलेही विचार उरले नव्हते. अथांग शांतता… संपूर्ण समाधान… कितीतरी वेळ मी तसाच समाधी लागल्यासारखा बसलो होतो. मी त्या अवस्थेतून जागा झालो, तेव्हा रवींद्र मला आनंदाने आलिंगन देत होता. तो जोरजोराने ओरडत होता “डॉक्टर झाला कलेक्टर ! राजू आयएएस झाला! आपला राजा कलेक्टर झाला ! “ताईने लगेच घरातून साखर आणून माझ्या हातावर ठेवली व मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. एव्हाना आईलाही निकालाची बातमी कळली होती. ती आणि वहिनी लगबगीने शेजारी ताईकडे आल्या.
I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS)
आईने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला व बोटे मोडून माझी दृष्ट काढली. त्या काही क्षणांतील रोमांच मला आजही जगण्याचं बळ देत असतात. आनंदाच्या भरात वहिनी शेजाऱ्यांना मी कलेक्टर झाल्याची बातमी सांगत होती. भाऊलाही कोणीतरी कळवलं होतं. हातातलं काम सोडून तोही तसाच परत आला. त्याने आनंदाने मला कडकडून मिठी मारली. मी आईकडे बघितलं. आई घरात देव्हाऱ्यासमोर देवाची आरती करून देवाला नमस्कार करत होती. मी तसाच आत गेलो आणि आईच्या पायावर डोकं ठेवलं. आईने मला उठवलं व माझा चेहरा हातात घेऊन मला निरखून पाहू लागली. तिच्या डोळ्यात आसवे नव्हती; पण तिच्या नजरेत त्यावेळी जे भाव होते ते शब्दांत सांगणे केवळ अशक्य आहे. मला कळत होतं की, मी आयएएस झालो म्हणजे नेमका काय झालो, हे तिला समजत नव्हतं. पण आपला मुलगा कोणीतरी खूप मोठा माणूस झाला आहे, असं तिला वाटत होतं.
निकालाचा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. दीर्घ उन्हाळ्यानंतर बरसणाऱ्या पहिल्या पावसासारखा तो दिवस माझ्या आयुष्यातला एक मोठा दुष्काळ संपवून गेला. तो दिवस मी माझ्या मनाच्या कप्प्यात एखाद्या खजिन्यासारखा जपून ठेवला आहे. त्या दिवसभरातला क्षण न क्षण आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. निकालाआधीची ती हुरहुर आणि निकालानंतरचा रोमांच. त्या दिवसाची गोष्टच निराळी होती. त्या दिवशी नवोदयमधले माझे मित्र, शिक्षक सर्वांचे फोन आले. कॉलेजमधल्या माझ्या मित्रांनी तर अगदी आकाश ठेंगणं वाटावं एवढं माझं कौतुक केलं. माझ्या मोबाईलला तर त्या संध्याकाळी उसंतच मिळाली नव्हती. तो सारखा वाजत होता. माझ्या निकालाची बातमी अगदी पुण्यापर्यंत गेली. तेथूनही कितीतरी लोकांनी माझं अभिनंदन केलं. अंधार पडत असताना पत्रकारही आलेत.
माझी माहिती व फोटोही घेऊन गेले. स्वप्न आणि सत्य यांमध्ये असणारी सीमारेषा पुसणारे ते क्षण होते. अभिनंदनाचा उत्सव दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. सकाळी उठल्या उठल्या बघतो, तर वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच पानावर माझ्या फोटोसह निकालाची बातमी होती. गावातली प्रतिष्ठित तालेवार मंडळी जी क्वचितच आमच्या वस्तीकडे फिरकत असत, ती स्वतःहून आईचं व माझं अभिनंदन करण्यासाठी घरी आली . धुळ्याचे कलेक्टर, श्री प्रकाश महाजन सर जेव्हा
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या “मी एक स्वप्न पाहिलं” या पुस्तकातून)
