ते मला सुरू केले. बाजरीचं पीठ गरम करून जखमेवर बांधलं. त्यानेही काही आराम पडला नाही, तेव्हा बेशरमचे पान तेलात गरम करून ते जखमेवर बांधले व नंतर जखम फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. एकीकडे आईचे उपचार सुरू असायचे त दुसरीकडे माझं रडणं. पण जखम काही ठीक व्हायचं नाव घेत नव्हती. ती पायात वरपर्यंत पसरत होती. आईलाही आता काय करावं, सूचत नव्हतं. रडताना पाहून तिचे डोळे भरून येत. ती मनातल्या मनात साईबाबाचा धावा करत असे. “साईबाबा मन्या पोऱ्यानं आजार मना व्हयी जावोत. पन मना पोयले सुखी ठेव. “ती सर्व देवांचा धावा करत होती, पण मला डॉक्टरकडे नेलं पाहिजे, हे काही तिला सूचत नव्हतं. शेवटी घरी दारू पिण्यासाठी आलेल्या एका माणसाने माझी जखम बघितली आणि तातडीने डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला आईला दिला. “वो बाई, असे डोये लाईसन नको बसो. सोनाना माईक आंडोरना पाय सडी चालना तरीबी तुम्ही आय – माये उपचार बंद नही करी राह्यनात. जल्दी डॉक्टरकडे ली जाय आन् दवा – पानी कर त्येले “त्याच संध्याकाळी आई व मोठमाय मला पिंपळनेरच्या एका एमबीबीएस डॉक्टरकडे घेऊन गेल्या.

माझा पाय फार ठणकत होता. पाय थोडा जरी हलला, तर संपूर्ण शरीरात वेदनेचा जाळ उठत होता. पण मी रडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. तिथल्या डॉक्टरने जेव्हा माझी जखम तपासली तेव्हा तो आईवर खूप रागावला. “बाई, एवढे दिवस का तुम्ही झोपा काढत होत्या ? जखम पूर्ण पायात पसरली आहे. तुमच्या पोराचा जीव वाचवायचा असेल, तर त्याचा पाय कापावा लागेल. उद्या शहरातून एक सर्जन येणार आहेत. आज घरी जाऊन नीट विचार करा व ठरवा की मुलाचा जीव वाचवायचा की नाही. पोरगा अपंग होईल, पण त्याचा जीव तर वाचेल. “या धक्क्याने तर आईची वाचाच बंद झाली. मोठमाय तिथेच ढसाढसा रडायला लागली. कसेबसे आम्ही घरी आलो. शेजाऱ्या – पाजाऱ्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सर्वजण आईची समजूत काढू लागले. दुसऱ्या दिवशी आईचा पाय घराबाहेर पडतच नव्हता. ती माझ्याकडे बघायची आणि रडायची. कितीतरी वेळ असंच चाललं होतं. शेवटी सर्वांनी तिला समजावलं व दवाखान्यात जायला भाग पाडलं.

जवळ असलेले काही व उधार मागून आणलेले काही पैसे आईने सोबत घेतले. यावेळी मावसाही सोबत आले होते. त्यांनी मला उचलून कडेवर घेतले. दवाखान्याजवळ येताच आईचे पाय पुन्हा मंदावले. पण मावशीने धीर देत तिला बळेच दवाखान्यात ओढले. मला अंगात तापही होता. अर्धातास वाट पाहायला सांगून नर्स आत निघून गेली. आम्ही सर्वजण बाहेर असलेल्या एका बाकावर बसलो. मला तो प्रसंग आजही आठवतो. मी मध्येच एकदम थंडी वाजून जोराने थरथरत होतो. मला खूपच अशक्तपणा आला होता. आईने मला मांडीवर घेतले होते. ती केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. आपल्या मुलाचा पाय कापावा लागणार व आपला मुलगा कायमचा अपंग होणार या कल्पनेनेच ती माऊली हादरली होती. ती वारंवार माझे मुके घेत होती. प्रेमाने कुरवाळत होती. भेदरलेल्या नजरेने ती कधी माझ्याकडे तर कधी समोर ज्या दरवाज्यातून डॉक्टर येणार होते.(I had a dream! Dr. Rajendra Bharud IAS Part 11)
त्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांत आसवे दाटली होती. १५-२० मिनिटे झाली असतील. तेवढ्यात एक म्हातारीबाई दवाखान्यात आली व आमच्या शेजारीच बाकावर बसली. माझी अशी अवस्था बघून थोड्या वेळाने माझी हनुवटी धरून ती आईला म्हणाली, “हाऊ सोन्यासारखा पोरगा तुमना शे ?” आजीबाईचे कौतुकाचे शब्द ऐकून आई अधिकच रडवेली झाली. रडत रडतच तिने माझा पाय कापण्यासाठी तिथे आणल्याचं आजीबाईला सांगितलं. आईचं बोलणं ऐकून आजीबाईला फार वाईट वाटलं. अचानक काहीतरी आठवल्यासारखं होऊन ती आईला म्हणाली “आसाबी तुम्ही तुमना पोयना पाय कापनारस शेतस, मंग शेवटना इलाज समजीसन तठेबी जाइया. “तिनं आईला जवळच्या विठ्ठल मंदिरातील पुजाऱ्याला अशा सडलेल्या जखमा बऱ्या करण्याचा अनुभव असल्याचं सांगितलं. आणि पाय कापण्यापूर्वी मला मंदिरात घेऊन जाण्याचा आग्रह धरला. अशा वेळी माणसाला थोडीशी आशाही पुरेशी असते. तशीही आईची देवावर फार श्रद्धा होती. तीच श्रद्धा एकवटून ती विठ्ठलाच्या मंदिरात आली. तिने पायरीवरूनच विठ्ठलाला हात जोडून नमस्कार केला. माझे दोन्ही हात धरून मलाही नमस्कार करायला लावला. मोठमाय व मोठेबाबा देवासमोर हात जोडून
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन )
