उभे होते. शेजारीच कपाळावर चंदनाचा टिळा लावून, हातात तुळशी माळ घेऊन भगवंताचा जप करत पुजारी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठे सात्त्विक भात होते. खरोखर परमेश्वराचे सान्निध्य लाभलेले ते सत्पुरुष वाटत होते. आईने त्यांना नमस्कार केला व तिथं येण्याचं कारण सांगितलं” महाराज, काय भी करा पन म्हना पोयले चांगलं करी टाका.” आई काकुळतीने पुजाऱ्यांना विनंती करत होती. पुजाऱ्यांनी आम्हाला गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यास सांगितलं.

विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही पुजाऱ्याजवळ येऊन बसलो. पुजारीबाबांनी माझा जखमी पाय आपल्या मांडीवर घेतला. माझ्या पायाला अत्यंत दुर्गंधी सुटली होती. त्यांनी सुरवातीला संपूर्ण पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली. नंतर जवळ असलेल्या कसल्यातरी जडीबुटीचा लेप माझ्या जखमेवर लावला व तो अर्ध्या तासासाठी तसाच ठेवला. अर्ध्या तासानंतर तो सर्व लेप पुसून काढला. मला प्रचंड वेदना होत होत्या. पुजाऱ्यानं आईकडे बघत मला घट्ट धरून ठेवायला सागितलं व आपल्या पिशवीतून एक सुई काढली व माझ्या पायावरची जखम जिथं जास्त पिवळी दिसत होती तिथं सुई टोचली. सुई टोचताच आतला पू घळघळ बाहेर पडू लागला.
काही वेळाने पुजाऱ्यांनी आईला माझे डोळे झाकायला सांगितले. माझं डोकं आईच्या मांडीवर होतं. आईने एका हाताने माझे डोळे झाकले व मोठमायने माझे दोन्ही हात घट्ट धरले. मावसाने माझे पाय पकडले होते. आता पुजाऱ्याने आपल्या हाताला कसलं तरी तेल चोळलं व जोराने माझ्या गुडघ्यापासून खाली दाबत माझ्या जखमेतला पू काढायला सुरवात केली. त्या वेदना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या. त्या असह्य वेदनेनं तडफडत मी मोठमोठ्यानं ओरडू लागलो. ओक्साबोक्शी रडू लागलो. सर्वांनी मला घट्ट धरून ठेवलं होतं. पण तिथे वेदनेनं रडणारा मी एकटाच नव्हतो. माझ्यासोबत आईच्या डोळ्यातूनही आसवं वाहत होती. माझ्या वेदना बघून तिच्या हृदयाला पीळ पडत होता, पण तरीही तिने माझ्या डोळ्यावरचा आपला हात काढला नाही. पुजारी संपूर्ण आत्मियतेनं माझ्या जखमेवर उपचार करत त्यावेळच्या वेदना आठवून आजही माझ्या अंगावर काटा येतो.

पुढे एम.बी.बी.एस.चं शिक्षण घेताना, इटनीशप करतांना मीही बऱ्याचदा अशा पाय सडलेल्या व वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णांची सेवा केली, तेव्हा त्यांच्या वेदनेची सह – अनुभूती मला होत होती. त्यामुळे आत्मियतेने मी त्यांच्यावर उपचार केले.. होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही किळस किंवा त्रासिक भाव नव्हता. आपण स्वतः दुःख भोगल्याशिवाय आपल्याला इतरांच्या दुःखाची कल्पना येत नाही. मी मात्र माझा हा अनुभव कधीही विसरू शकलो नाही. त्या वेळी मी खूप लहान होतो, पण त्या वेदनांची तीव्रता आजही माझ्या मनात घर करून आहे. हा उपचार जवळपास पंधरा – वीस मिनिटे चालला. तेवढ्या वेळात पुजाऱ्याने माझ्या जखमेतला जवळजवळ संपूर्ण पू बाहेर काढला होता. मी अजूनही वेदनेने विव्हळत होतो. आईने आता मला घट्ट छातीशी धरलं होतं. पुजाऱ्यांनी परत माझ्या जखमेवर एक लेप लावला व त्यावर स्वच्छ पांढऱ्या कपड्याचा एक तुकडा बांधला. त्यांनी आईच्या हातात एक औषध दिलं व ते विड्याच्या पानात मला तीन दिवस द्यायला सांगितलं.
आईला धीर देत ते म्हणाले “तुमना पोऱ्यावर कायम भगवान नी कुरपा राहीन. मना हातमा काही जादू – बिदू नही शे, फक्त भगवंतना आशीर्वादमुळे तुमना पोऱ्यावर उपचार कयात. आते काही कायजी करू नका, चार – पाच दिन मजार पोऱ्या खेवाले लागी जाई “आईने ऑपरेशनसाठी आणलेले ५१ रुपये त्यांना देऊ केले, पण त्यांनी केवळ ११ रुपये घेऊन बाकीचे पैसे आईला परत केले. आम्ही सर्वांनी परत एकदा विठ्ठलाला व पुजारी बाबांना नमस्कार करून घराकडे परत फिरलो. पुजाऱ्याने दिलेले औषध पुढचे तीन दिवस आईने मला नियमितपणे दिलं. आणि खरोखरच माझी जखम पूर्ण कोरडी झाली व चारच दिवसांत मी परत आधीसारखा खेळू लागलो. तिने मनातल्या मनात देवाचे व त्या पुजारीबाबांचे असंख्य वेळा आभार मानले. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS). Part 12.)
पुढे कितीतरी महिने ती मला बाजाराच्या दिवशी न चुकता पिंपळनेरला नेत असे व नियमितपणे विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवायला लावत असे. माझ्या पायावर अजूनही त्या जखमेच्या ठिकाणी एक मोठा व्रण आहे. मावशी आजही म्हणत असते, की केवळ विठ्ठलाची कृपा म्हणूनच तू अपंग होता – होता वाचलास. आईसाठी मात्र हा खूप मोठा धडा होता. त्यानंतर कधीही कोणाची प्रकृती बिघडली, तर आई न चुकता थेट दवाखान्याची वाट धरत असे. त्यानंतर कधीही तिने मंत्र – तंत्रावर विश्वास ठेवला नाही. शेवटी माणसं अनुभवातूनच शिकतात हेच खरं. “
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.!या पुस्तकातुन)
