शाळा : एक प्रकाशवाट
दारू काढून विकण्याचं आईचं काम सुरूच होतं. त्याशिवाय ती अनेकदा शेतावरही मजुरीने कामाला जात असे. तिच्या सतत कामात व्यस्त राहण्यामुळे तिला मुलांकडे पुरेसं लक्ष देणं शक्य होत नव्हतं. अशातच भाऊबद्दल त्याच्या शाळेतून सतत तक्रारी यायला लागल्या. तो तिसरीत गेला होता, पण त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं. शाळेतील शिक्षक आईला सांगत की, तुमचा मुलगा मधूनच शाळेतून पळून जातो, अभ्यास करत नाही, गावातील मुलांसोबत उडाणटप्पूपणा करतो, अशावेळी आईला खूप वाईट वाटायचं. तिला मनापासून वाटे, की आपल्या मुलानं छान अभ्यास करावा, शिकून मोठं व्हावं. पण आजुबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांवर व्हायचाच. अशा वेळी मग जे घडतंय, ते केवळ पाहण्यावाचून आईकडे दुसरा पर्याय नसे. एकदा तर शाळा सोडून भाऊला नदीवर मासे पकडत असताना बघून मावशीने त्याला खूप मारलं होतं. पण तरीही त्याचे लक्ष अभ्यासात नव्हतं. शेवटी गावात राहून तो काही सुधारणार नाही, हे बघून आईने त्याला शेजारच्याच गावाच्या एका आश्रमशाळेत दाखल केलं. पण आश्रमशाळेत प्रवेश घ्यायचा असेल, तर पहिल्या वर्गापासूनच प्रवेश घ्यावा लागतो, असा नियम असल्यामुळे भाऊला परत पहिल्या वर्गात प्रवेश घ्यावा लागला. त्यामुळे माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असूनही आम्ही दोघंही त्यावेळी एकाच वर्गात होतो.

लहान असताना मी खूप हट्टी होतो. शाळेत गेल्यानंतर माझा हट्टीपणा कमी होईल, असं बयाने आईला सूचवलं. म्हणून आईने माझं नाव शाळेत टाकायचं ठरवलं. वय थोडं कमी असल्याने मुख्याध्यापक मला शाळेत दाखल करून घ्यायला नकार देत होते. आईने त्यांची बरीच विनवणी केल्यानंतर अखेर त्यांनी मला प्रवेश दिला व माझ्यासाठी पाटी, पेन्सील, बाराखडीचे पुस्तक विकत घ्यायला सांगून मला शाळेच्या गणवेषात शाळेत घेऊन यायला आईला सांगितलं. आतापर्यंत मी आईला सोडून एकटा भिलाटीबाहेर कधीच गेलो नव्हतो. आणि आता अचानक मला रोज एकट्याला शाळेत जावं लागणार होतं. शाळेत सर्वांशी नीट वागायचं, गुरुजी सांगतील तसं करायचं, नाहीतर गुरुजी मारतील वगैरे आई मला सांगायची. तिचं बोलणं ऐकून मी रडकुंडीलाच येत असे. त्यात माझी ताई पुन्हा मला चिडवायची, की आता घरात चालणारे तुझे लाड बंद आणि शाळेत गुरुजींचा मार सुरू. मग मात्र मी हंबरडाच फोडत असे. मी रडायला लागलो, की आई ताईला बळेबळेच रागवत मला आपल्या कुशीत ओढून घेत असे. मी मात्र ‘तुला सोडून कुठेही जाणार नाही’, असं म्हणून जोरजोराने हुंदके देत आईला घट्ट धरून ठेवत असे.

आठवडे बाजाराच्या दिवशी आई पांढरा सदरा, खाकी चड्डी, पाटी, पेन्सील व बाराखडीची वही घेऊन आली. शाळेचं सामान पाहून मी पुन्हा रडायला सुरवात करणार हे तिला ठाऊक होतं. म्हणून माझ्यासाठी डाळ्या – मुरमुऱ्याचा खाऊही आणला. तो दिवस आठवल, की मला आजही हसायला येतं. मी एकीकडे आईने आणलेला खाऊ खात होतो व दुसरीकडे ढसाढसा रडतही होतो. पण मला शाळेत जावंच लागणार होतं. शाळेचा पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतो. मी सकाळपासूनच रड रड रडत होतो. त्या दिवशी आईने माझ्या अंगात शाळेचा गणवेष चढवला. बाजारातून सामान आणायला वापरतात तशा नायलॉनच्या पिशवीत माझी पाटी, पेन्सिल व पुस्तक टाकून ती माझ्या खांद्याला अडकवली व स्वतःच माझ्यासोबत शाळेकडे निघाली. रस्त्यातही माझं रडणं सुरूच होतं. जेव्हा आम्ही लवणाजवळ आलो तेव्हा मी जोराने आईचा हात झटकला व मोठमायच्या घराकडे धावत सुटलो. मोठमायकडे जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात सापडणं होतं, हे त्यावेळी माझ्या बालमनाला समजलं नाही. मोठमाय म्हणजे महाकाली होती. तिने सरळ मला खांद्यावर घेतलं आणि आईला सोबत घेऊन मला थेट शाळेत नेऊन आपटलं.
त्या दोघी मला हेडमास्तरांकडे घेऊन गेल्या. मास्तरांनी माझा हात घट्ट पकडला व आई आणि मावशीला घरी जायला सांगितलं. त्यांना जाताना पाहून मी अधिकच जोराने रडू लागलो. पण मास्तरांनी माझा हात घट्ट धरून ठेवला असल्यामुळे मला काही करता येत नव्हतं. एका शिक्षिकेने आई व मोठमायला “काळजी करू नका, पहिल्या दिवशी बरीच मुलं अशीच रडतात”, असं म्हटलं व त्यांना निर्धास्त घरी जायला सांगितलं. त्या गेल्यानंतरही मास्तरांनी माझा हात सोडला नाही. मी तिथंच लोळू लागलो. माझे डोळे व नाक दोन्ही वाहत होते. काही वेळाने मास्तरांनी पहिल्या वर्गाच्या शिक्षकांना बोलावलं व मला त्यांच्या स्वाधीन केलं. मी अजूनही जमिनीवर लोळतच होतो. आमच्या वर्गशिक्षकांनी याचवर्षी शाळेत दाखल झालेल्या आमच्या भिल्ल वस्तीतल्याच काही मुलांना तिथं बोलावलं. सुऱ्या, माध्या, मोत्या, काया अशी ती माझ्या ओळखीचीच मुलं होती. पण त्यांना बघूनही माझं रडणं थांबलं नाही. तेव्हा त्यांनी सरळ मला चार बाजूंनी हात व पाय धरून उचललं आणि वर्गात नेऊ लागले. आमच्या भिलाटीत मी कधीकधी बकऱ्याचा बळी नेताना बघत असे. मला माझी अवस्था त्यावेळी त्या बकऱ्यासारखीच वाटत होती. मागून हातात छडी घेऊन येणारे पगारे गुरुजी मला हातात सुरी घेऊन येणाऱ्या खाटीकासारखेच दिसत होते. शाळेत मास्तर फक्त मुलांना मार देण्याचंच काम करतात, हे माझ्या मनावर पक्क बिंबलं होतं. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS). Part 13.)
त्या पोरांनी मला उचलून वर्गात आणलं. एवढा मोठा वर्ग पाहून मी आणखी धास्तावलो. पण मला चारही बाजूंनी मुलांनी पकडून ठेवलं असल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो. माझी वरात घेऊन गुरुजी वर्गात आल्याबरोबर सर्व मुले’ एकसाथ नमस्ते ‘म्हणत उठून उभी राहिली आणि माझ्याकडे बघून खळखळून हसू लागली. उचलून धरणाऱ्या पोरांनी मला कोपऱ्यात भिलाटीतील पोरं बसली होती तिथं नेऊन ठेवलं व माझ्या चारही बाजूंना कोंडाळे करून ते बसले. मी अजूनही रडत आहे हे बघून गुरुजी माझ्याजवळ आले व आपल्या हातातल्या छडीने खाडकन् माझ्या दंडावर एक ठेवून दिली.’ आता पुन्हा रडलास तर बघ ‘गुरुजी डोळे मोठे करून माझ्यावर ओरडत होते. माझं रडणं थांबलं पण….
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.!या पुतकातुन)
