त्याचे वडील जुन्या गावातील एका शाळेत शिक्षक होते. त्यांच्याकडे खूप शेतीही होती. त्यांच्या शेतात आमच्या भिलाटीतील अनेक लोक काम करायला जात. कधी – कधी आई व मावशीही त्यांच्याकडे काम करायला जात असे. पण आम्ही दोघंही अजून लहान असल्यामुळे गरीबी – श्रीमंतीचे भेद अजून आम्हाला कळले नव्हते. प्रकाश आणि माझ्या मैत्रीत गरीब – श्रीमंत, उच्च – नीच, स्पृश्य अस्पृश्य असे भेद कधीच आले नाहीत. आज मोठे झाल्यानंतरही आमची मैत्री अजूनही तेवढीच निर्मळ आहे.
शाळेत माझे इतरही अनेक मित्र होते. त्यांनीही माझ्याशी कधीच अंतर राखलं नाही. मात्र कधी – कधी जेव्हा मी त्यांच्या घरी जात असे, तेव्हा मी भिलाटीतील एक भिल्ल आहे. हे ऐकून तिथल्या नजरांमध्ये मला आश्चर्यासोबतच थोडासा तिरस्कारही दिसायचा. त्यामुळे मी शाहू वस्तीतील मित्रांच्या घरी जाणे टाळू लागलो. फक्त प्रकाशचे वडील क्वचित आमच्या घरी दारू प्यायला यायचे व माझ्याशी प्रेमाने वागायचे. त्यामुळे त्यांच्याशी एक जवळीकता निर्माण झाली होती. शाहूवस्तीत प्रकाशचे एकच घर असे होते जिथे मला कधीच परकेपणा जाणवला नाही. त्यांनीही मला कधी मी खालच्या जातीचा वगैरे आहे याची जाणीव होऊ दिली नाही.
शाळेमध्ये दुपारच्या सुटीत आम्ही सर्व मित्र एकत्र बसून जेवण करायचो. एका तेलाचे डाग लागलेल्या रूमालामध्ये आई मला भाकरी व चटणी बांधून द्यायची. आम्ही सर्व मित्र एका झाडाच्या सावलीत बसून जेवण करत असू. आम्हा भिलाटीतील पोरांच्या डब्यात केवळ भाकरी व चटणीच असायची. पण शाहू वस्तीतील मुलांच्या डब्यात मात्र रोज काही ना काही नवे व चवदार पदार्थ असायचे. पण त्यावेळी हा फरक कोणाच्याही लक्षात यायचा नाही. आम्ही सर्वजण कुठलाही भेदभाव न ठेवता एकमेकांच्या डब्यांवर तुटून पडत असू. आम्हाला जेवढे त्यांचे वेगवेगळे पदार्थ आवडायचे तसेच त्यांनाही आमची भाकरी व झणझणीत चटणी आवडायची. त्यांच्या घरच्यांना हे कळले असते, तर त्यांना चांगले वेताचे फटके बसून आम्हा भिल्लांच्या पोरांपासून लांब राहायची समज मिळाली असती. पण या सर्व गोष्टी घरी सांगितल्या पाहिजेत, असं मात्र कोणालाही वाटलं नाही. त्यामुळे आमचं सर्वांचं मस्त चाललं होतं.

आजही ते दिवस आठवले की चेहरा आनंदाने खुलतो. आणि वाईटही वाटतं, की आज प्रयत्न करूनही ती निरागसता परत मिळवू शकत नाही. ते दिवसच मुळी मंतरलेले होते. त्या संपूर्ण वातावरणातच एक जादू होती. माझ्याकडे एकच गणवेष होता. आई तो रोज संध्याकाळी नदीवर धुवत असे. पण रोज तोच तो सदरा वापरून तोही आता मळकट झाला होता. खाकी चड्डी तेवढी मुळातच मळकट असल्याने खाकीच दिसायची. पायात चप्पल असण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या उभ्या खानदानात कुणी पायात वहाण चढविली नव्हती. आणि अशी अवस्था असणारा काही मी एकटाच नव्हतो. काही मुलांची अवस्था तर माझ्याहूनही वाईट होती. पण त्यांना त्याची जाणीवच नव्हती आणि त्यामुळे दुःखही नव्हतं.
मी मात्र शाहू वस्तीतील बऱ्याच मित्रांसोबत राहत असल्यामुळे हा फरक कधी – कधी मला अस्वस्थ करत असे. खेळताना पॅन्टचं बटण तुटणं तर रोजचंच असायचं. बटण तुटलेलं असलं की आई माझ्या कंबरेला असलेल्या करदोड्यात पॅन्ट अडकवून मला शाळेत पाठवत असे. त्यामुळं कंबरेला करदोडा केवळ पॅन्ट अडकवण्यासाठीच बांधतात, असंच मला सुरवातीला वाटायचं, हे सांगून खरं वाटणार नाही. शाहूवस्तीतील मित्रांचे कपडे बघून कमीपणाची भावना निर्माण व्हायची. मन खट्टू व्हायचं. मात्र माझ्यासारखीच करदोड्यात पॅन्ट अडकवलेली भिलाटीतील मुलं दिसली की, मग मला थोडं बरं वाटायचं. त्यांनाही माझ्याकडे पाहून वर्गातील सर्वांत हुशार मुलगाही आपल्यासारखाच फाटका आहे, म्हणून हायसं वाटत असेल. सुखापेक्षा दुःखातच माणसं एकमेकांच्या अधिक जवळ येतात.
पहिल्या वर्गात असताना झालेली आमची परीक्षा मला आठवते. त्या पाढे म्हणून परिक्षेत मी पहिला आलो होतो. आम्हाला बाराखडी लिहिणे, दाखवणे, एक – दोन अंकी बेरीज व वजाबाकी करणे यासारख्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या. पाढे तर मला सर्वच्या सर्व तोंडपाठ होते. मी घरी असताना, गुरूजी वर्गात म्हणत तसे पाढे एकटाच जोराजोराने म्हणत असे. त्याचाच तो परिणाम असावा. शिवाय दारू प्यायला येणारी मंडळीही रोज मला काही ना काही वाचून किंवा म्हणून दाखवायला सांगत असे. त्याचाही मला फायदा झाला. त्या लोकांना आनंद मिळायचा व मला परिक्षेत गुण. कोणी विचारल्याबरोबर जेव्हा मी पटापट पाढे म्हणत असे तेव्हा आई कौतुकाने माझ्याकडे पाहायची. पहिल्या वर्गात मी पहिल्या क्रमांकाने पास झाल्याचे सांगण्यासाठी जेव्हा गुरुजी स्वतः आमच्या घरी आले तेव्हा तर तिचा ऊर अभिमानाने दाटून आला. भरल्या डोळ्यांनीच तिने गुरुजींना धन्यवाद दिले. ते परत गेल्यावर आई मला छातीशी धरून म्हणाली, “देवनी जर कृपा राह्यनी ते मना भी पोऱ्या एक दिन मोठा माणूस बनी.
आता मी नियमित शाळेत जाऊ लागलो होतो. शाळेच्या वातावरणात मी चांगलाच रमलो होतो. खरं तर मला शाळेत गेल्यावाचून करमतच नसे. रविवारचा मला फार कंटाळा यायचा. मध्येच कधी सुटी आली तर मी वैतागायचो. शाळा म्हणजेच आम्हा मुलांचा खरा विरंगुळा होता. आम्ही सर्वजण अर्धा तास आधीच शाळेत जात असू. शाळेतील झाडांवर चढणे, लपंडाव खेळणे, फुलं गोळा करणे, पिंगाणी बनवून त्यातून आवाज काढणे, हा आमचा दिनक्रमच होता. दर शनिवारी आम्हाला संपूर्ण वर्ग शेणाने सारवावा लागायचा. सकाळीच शेण गोळा करून वर्ग सारवताना आम्ही खूप धम्माल करायचो. आमच्या शाळेत मुलांचे व मुलींचे वर्ग वेगवेगळे होते. शाळेत नेहमीच काहीना काही स्पर्धा होत असत. कविता म्हणणे, गणित सोडविणे अशा विविध स्पर्धा व्हायच्या. मुलं व मुली स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी जीवाचे रान करत.
सर्व स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे व बऱ्याचदा जिंकतही असे. स्पर्धा कुठलीही असो मुलं आपला प्रतिनिधी म्हणून मलाच पुढे करत. एकदा आमच्या शाळेत केंद्रप्रमुख शाळेची तपासणी करण्यासाठी आले. आमच्या वर्गात आल्यावर त्यांनी विविध प्रश्न विचारले. अनेक प्रश्नांची मी उत्तरे दिली. शेवटी त्यांनी फळ्यावर १०” असे लिहिले व सर्वांना त्याचे दशांश…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
