मी अजूनही अधूनमधून हुंदके देत होतो. त्यावेळी मुलांना मधल्या सुटीत सुगडी व दूध दिलं जायचं. माझा रडवेला चेहरा पाहून हेडमास्तरांनी मला जवळ बोलावलं व स्वतःच्या हाताने मला सुगडी खायला दिली. रडून रडून मलाही जोराची भूक लागली होती. दिलेली सर्व सुगडी मी अधाशासारखी फस्त केली. शाळेच्या त्या पहिल्या दिवशीच्या सुगडीची चव आजही माझ्या जीभेवर रेंगाळत असल्यासारखी वाटते. ती सुगडी मला मनापासून आवडली. सुगडीनंतर जेव्हा मला दूध दिलं गेलं. तेव्हा मात्र शाळा आपल्याला वाटते तेवढी वाईट नाही. याची मला जाणीव झाली.

संध्याकाळी सुटीची घंटा वाजल्यानंतर मी माझ्या भिलाटीतल्या मित्रांसोबतच घराकडे निघालो. संपूर्ण रस्त्यात ती मुलं मला चिडवत होती. “नुस्ता पोरीसना मायक रडी रायना राज्या “काही मुलं हूं… हूं… हूं… करत माझ्या रडण्याची नक्कल करत होते. मी मात्र त्यांना पुन: पुन्हा सांगत होतो, की “मी आता रडाव नय आनी रोज शाळमा येसू.” असंच एकमेकांच्या खोड्या काढत आम्ही घरी पोहोचलो. आल्या आल्याच आईने मला जवळ घेऊन सर्वांना विचारलं,” काय करी रायना भाऊयायभर? रडी – बिडीतंराहना नहीना मना भाऊ? ‘यावर सर्व मुलं जोरजोराने हसू लागली. त्यांनी शाळेत घडलेला सर्व किस्सा आईला सांगितला. ते ऐकून आईदेखील हसू लागली. तिला हसताना पाहून मी खजील होऊन एकदम तिच्या कुशीत शिरलो. आईने प्रेमाने माझ्या केसांतून हात फिरवत माझा मुका घेतला व विचारलं, ‘आते रोज जाशी की नई शायामा ? ‘माझ्या डोळ्यांसमोर ती गोड सुगडी व गरम दुधाचे चित्र उभे राहिले. मी जोराने मान हलवत ‘हो’ म्हटलं. त्या रात्री मी ती सुगडी व दूध डोळ्यांत घेऊनच झोपी गेलो. मला शाळेचं वातावरण आवडलं. जिल्हा परिषदेची ती कौलारू शाळा अजूनही माझ्या मनात घर करून आहे. शाळेचे ते भव्य पटांगण. तिथे टाकलेली ती वाळू. तिथेच मी खेळलो, पडलो आणि पुन्हा उठायला शिकलो. शाळेचा परिसर मला आजही खुणावतो. माझ्या शाळेच्या अंगणात बकुळी, सदाफुली, पिंगाणी अशी अनेक झाडं होती. माझी ही शाळा म्हणजे माझ्या आयुष्यातील बदलांची सुरवात होय. शाळेतील आठवणी म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल असा ठेवाच आहे. आजही कधी – कधी मी ते क्षण आठवून भारावून जातो.
एकदा तर गंमतच झाली. दर शनिवारी आमच्या शाळेची जमीन शेणाने सारवली जायची. सारी मुले भिलाटीतून, शेतामधून प्लास्टिक पिशवीत शेण गोळा करून आणत व शाळेची जमीन शेणाने सारवत असत. एका शनिवारी आम्ही सारे जण शेण गोळा करायला वेगवेगळ्या दिशेला पांगलो. त्या दिवशी खूप हिंडूनही शेण काही मिळालं नाही. शेवटी कंटाळून आम्ही सगळेच नदीकाठी जमलो. रिकाम्या हाताने कसं परतायचं? गुरुजी काय म्हणतील? याचा विचार करत असतांनाच एकाने आम्हा सर्वांपुढे, ‘आलोच आहोत, तर रिकाम्या हाताने परत जाण्यापेक्षा नदीत डुंबण्याचा प्रस्ताव ठेवला. तो जणू मनातलंच बोलल्यागत आम्ही अंगावरचे कपडे काढून नदीकाठावर भिरकावले आणि नदीत सूर मारला. इकडे गुरुजी ‘मुलं अजून कशी आली नाहीत ? ‘या काळजीने आम्हाला शोधत – शोधत नदीवर आले. आम्ही डुंबण्यात तल्लीन होतो. सारा प्रकार त्यांनी पाहिला. हळूच काठावरचे आमचे कपडे उचलून ते शाळेत परत निघून गेले. नदीत यथेच्छ खेळून झाल्यावर आम्ही बाहेर येऊन बघतो तर काय ! आमचे कपडे तिथे नव्हतेच. ‘असं उघडं – नागडं शाळेत जायचं तरी कसं ? ‘मग आम्ही तशाच अवस्थेतच घराकडे धूम ठोकली. दुसरे कपडे घालून शाळेत हजर झालो. आता आम्हाला खूप मार पडणार, असं वाटत असतानाच गुरुजी म्हणाले,” मुलानो, तुम्हाला जंगलातून परतायला उशीर झाला, म्हणून आईच्या कोथिंबिर खुडणे, मका सोलणे अशा शेतातील कामात घालवायचो. साप्ताहिक सुटीच्या दिवशी खेळण्याबरोबरच आम्ही काही वेळ काळजाने शोधत आलो. पुन्हा असं करू नकारे बाळांनो ! “त्याबदल्यात आम्हाला शेतमालक ५-७ रुपये मजुरी देई. त्यावेळी पैसे कमविण्याचा विलक्षण आनंद होई.
या पैशांतून वह्या – पुस्तके आणणे, शालेय साहित्य विकत घेणे असा हातभार आम्ही घराला लावत असू. गुरुजींच्या आदरयुक्त भीतीमुळे वाईट सवयींपासून दूर राहिलो. स्वावलंबनाचे स्वतंत्र धडे घेण्याची गरज पडली नाही. आपली आता ऐपत नाही, अशा गोष्टींकडे ढुंकुनही न पाहणे, आपली आर्थिक परिस्थिती पाहून भौतिक गोष्टीत उगाच न गुंतणे, असा आध्यात्मिक विचारही त्यावेळी रुजला. आपल्या आवाक्यातील साधनांनी तसेच विधायक मार्गाने आवश्यक गोष्टी मिळविण्यासाठी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याचे बाळकडू त्यावेळी मिळत गेले. तेच आज जीवनाच्या तत्वज्ञानाचा पाया बनले आहे. त्यावेळी गावात ती एकच शाळा होती. त्यामुळे गावातील श्रीमंत व गरीब सर्व मुलं तिथेच शिकायला येत. शाळेत जायला लागल्यानंतर एक – दोन महिन्यांतच माझी अभ्यासातील गती एकदम वाढली. माझ्या हुशारीमुळे मी सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी झालो. शिवाय त्यांच्या स्नेहासोबतच सुगडीचा गोडवा व गरम दुधाची ऊबही होतीच. त्यामुळे मी आता रोज आनंदाने शाळेत जायला लागलो. सुरवातीला गृहपाठ न केल्याबद्दल एक – दोनदा मला फटके पडले, तेव्हापासून नियमित गृहपाठही करू लागलो.
अभ्यासातली माझी प्रगती दिवसागणिक वाढत होती. आता शिक्षकही आईकडे माझी स्तुती करू लागले.” बाई, तुमना पोऱ्याकडे चांगलं ध्यान द्या. हाऊ पोऱ्या तुमनं नशीब बदली टाकी. ” पुरूजी अशी स्तुती करत तेव्हा आईला फार अभिमान वाटत असे. ती पुन: पुन्हा शिक्षकांना सांगायची की, तुम्ही याला हवी ती शिक्षा करा, पण याला छान शिकवा. आई स्वतः मला कधीच रागवायची नाही. मोठमायनेही कधी मला मारल्याचं आठवत नाही. पण आई माझ्या शिक्षकांना मात्र मला शिक्षा करायला संकोच करू नका, असं सांगायची. यावर माझे शिक्षक तिला नेहमी म्हणायचे की ‘बाई तुझ्या पोराला शिक्षेची नाही, तर चांगल्या शिक्षणाची गरज आहे.’ त्या शाळेतच माझी पहिल्यांदा शाहू वस्तीतील मुलांशी ओळख झाली. गावातल्या प्रतिष्ठित व तालेवार मंडळींच्या वस्तीला भिलाटीतील माणसं शाहू वस्ती म्हणत असत. मी अभ्यासात हुशार असल्यामुळे लवकरच ती ओळख घट्ट मैत्रीत बदलली. शाहू वस्तीतील प्रकाश पाटील हा माझा जीवलग मित्र बनला.
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
