दिनांक १७ एप्रिल, श्रीगोंदा/सातारा:
तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील रहिवाशी व साताऱ्यात शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीराम रणसिंग यांचे १५ दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. ते आपल्यात नाहीत यावर त्यांच्या मित्रांचा अजूनही विश्वास बसत नाही. आपल्या या जिवलग मित्राच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांसाठी “whatsapp“च्या माध्यमांतून केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर आठवडाभरात अडीच लाखांचा निधी उभा राहिला आहे.

श्रीराम शिवाजी रणसिंग (वय ३५) हे शिक्षक आपल्या कर्तृत्वावर विद्यार्थ्यांसह सर्वांचे आवडते झाले होते. मित्र परिवारातही ते तितकेच प्रिय होते. रणसिंग हे गारवडे (ता. पाटण जि. सातारा) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होते.
ते श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील असून, त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. गावाकडे वयोवृद्ध आई-वडील आहेत. दोघांचे वय आता ऐंशीच्या दरम्यान असल्याने त्यांची जबाबदारी रणसिंग यांच्यावरच होती. त्याच बरोबर पत्नी व दोन मुले असा रणसिंग यांचा परिवार आहे. रणसिंग यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रणसिंग २००५ नंतर सेवेत दाखल झाल्यामुळे त्यांना शासनाच्या निवृत्ती योजनेचा लाभ नाही. सानुग्रह अनुदान योजनेसही ते पात्र नाहीत. या कठीण व अडचणीच्या प्रसंगात त्यांचा मित्र परिवार रणसिंग कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावत आला असून, सामाजिक माध्यमांतून त्यांच्या मित्रांकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यास समाजाच्या विविध स्तरांतून प्रतिसाद लाभला. निव्वळ आठवडयातच तब्बल अडीच लाख रुपयांचा निधी उभा राहिला आहे. त्यात शिक्षक, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरांतील लोकांनी मदत केली आहे. ही मदत लवकरच त्यांच्या कुटुंबियांनां सुपूर्द करण्यात येणार आहे.
स्रोत:(ऑनलाईन न्यूज)
(प्रतिकात्मक इमेज चा वापर करण्यात आला आहे.)
