का ?’, असं म्हणून त्याने माझा कान जोरात पिळला. पण थोड्या अंतरावर त्याने मला गाडीवरून उतरवून दिलं. जाता – जाता आणखी दोन – चार शिव्या झोडल्या. मी रडत – रडत घराकडे निघून गेलो. हा प्रसंग आठवताना आज मोठी गंमत वाटते. कारण मी कलेक्टर झाल्यावर माझ्या सत्काराच्या कार्यक्रमात हेच पाटील माझ्याविषयी भरभरून बोलताना म्हणाले“ मी राजूला लहानपणापासून ओळखतो. तेव्हापासूनच मला वाटायचं, की हा मुलगा पुढे काही तरी करून दाखवेल. मोठा माणूस बनेल व आपल्या गावाचं नाव रोशन करेल. ‘पाटील माझं जाहीर कौतुक करत असताना मला मात्र त्यांनी आंब्याच्या झाडाखाली चापट मारताना ऐकवलेलं भाषण आठवत होतं.

माझ्या मित्रांनी मला खूप जपलं. माझा जन्म मासे पकडणं, मध गोळा करणं, रोजंदारीवर काम करण्यासाठी झाला नाही, असंच त्यांना वाटायचं. मला कुणीच झाडावर चढू देत नसत. जणू त्या सर्वांनाच माझी काळजी होती. मला वाईट सवयी न लागण्याचं एक कारण म्हणजे माझे मित्रसुद्धा होते. ते सर्व प्रकारची व्यसनं करायचे; पण जेव्हा केव्हा त्यांना तंबाखू किंवा दारू प्यायची असे त्यावेळी ते माझ्यापासून लांब जाऊन पीत असत. त्यांनी जर असं केलं नसतं, तर कदाचित एखाद्या मोहाच्या क्षणी मी सुद्धा त्या व्यसनांना बळी पडलो असतो. पण माझी मूळ प्रवृत्ती व मित्रांचा सहयोग यामुळे मला कधीच वाईट सवय लागली नाही.
यात आईचाही खूप मोठा वाटा होता. ती नेहमी मला सांगायची, की माणसाने वाईट काम करू नये. गर्व करू नये. एवढा दहा तोंडांचा रावण, पण त्याचाही गर्व गळून पडला. मग आपल्यासारख्यांचं काय? ती मला नेहमी इतरांशी नम्रपणे वागायला सांगत असे. ती म्हणायची, की जेवढे आपण नम्र व परोपकारी राहू तेवढी आपल्यावर भगवंताची कृपा राहील.
तिची एक गोष्ट मात्र मला नेहमी लक्षात राहील. ती म्हणायची“ गरीबबी भाकरीच खास आणि श्रीमंतजी भाकरीच खास. जास्त पैसा कमाईसन कोठे पाठले बांधी ली जासूत. म्हणून आपलाकडतून मदत व्हयी तेवढी करानी. तेमाज खरा आनंद शे. “जेव्हा – जेव्हा मला आईचे हे बोल आठवतात, तेव्हा – तेव्हा माझी खात्री जेवढीबी गरीबले पटते की जीवनाचं तत्त्वज्ञान हे पुस्तकांतून शिकविलं जाऊ शकत नाही. ते केवळ जगण्यातूनच देता येऊ शकतं. (I had a dream! Dr. Rajendra Bharud.. (IAS). Part 20)
मी आय.ए.एस. झाल्यावर आमच्या शाळेचे माजी प्राचार्य देवरे सर एका कार्यक्रमात म्हणाले होते, ‘कमलाबाई व तिचा मुलगा राजेंद्र म्हणजे चिखलातले कमळच जणू. चिखलात राहूनही आपलं सौंदर्य व पावित्र्य जपणाऱ्या कमळासारखं त्यांनी या आपलं वेगळेपण जपलं आहे. खरं तर हे सर्व ऐकताना खूप अवघडल्यासारखं झालं आणि मनातल्या मनात आनंदही होत होता. इतरांना आवडते तशी मलाही प्रशंसा आवडते. पण यावेळी मला आनंद होत होता तो आईकरीता. आईने मला माणूसकीचा धडा फार छान शिकवला. माझ्यावर असलेल्या तिच्या विश्वासाला जागत मी यापुढे अज्ञानात खितपत पडलेल्या समाजासाठी स्वतःला वाहून घ्यायचं ठरवलं आहे.
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
