मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड..(IAS).भाग १९

वर्तनाने इतरांच्या मागे असतील. मात्र त्यांच्या मनाचा साधेपणा इतरांकडे अभावानेच असतो. मी कलेक्टर झाल्यानंतरही माझ्याशी पूर्वीसारखेच वागणाऱ्या या लोकांच्या मनात माझ्याबद्दल कसलीही असूया नाही. माझे भिल्ल मित्र मला अजूनही भावासारखेच वागवतात व त्यांचे आई – वडील आजही माझ्यावर स्वतःच्या मुलासारखेच प्रेम करतात. लहानपणी मिळालेल्या अपमानकारक वागणुकीमुळे, मी’ नवोदय मध्ये जाऊ लागल्यानंतरही क्वचितच गावातील मोठ्या लोकांच्या वस्तीत जात असे. माझे बरेच शाहू मित्र मला भेटायला भिलाटीत येत असत. मात्र त्यांच्या वस्तीत जाण्याचे धाडस म्हणा किंवा इच्छा मला कधीच झाली नाही. याचा अर्थ माझ्या मनात श्रीमंतांविषयी घृणा वगैरे आहे, असं नाही. त्यांच्यातही अनेकजण फार प्रेमळ व नम्र असत. श्रीमंत असणं हा काही गुन्हा नाही. मात्र श्रीमंतीचा माज असणं, हा सामाजिक गुन्हाच आहे. आणि अशा लोकांबद्दल माझ्या मनात खरोखरच घृणा आहे. शिक्षणाने मला माझ्या स्वाभिमानाची ओळख करून दिली होती. त्यामुळे माझ्या स्वाभिमानाला डिवचणाऱ्या लोकांपासून मी लांब राहण्याचा प्रयत्न करतो. ज्या भिल्ल समाजात माझा जन्म झाला. जिथे मी लहानाचा मोठा झालो. त्या भिल्ल समाजाविषयी माझ्या मनात फार लोभ आहे. ही माणसं अशिक्षित आहेत पण असंवेदनशील नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मी त्यांच्यामध्ये वाढलो, पण या समाजात रूढ असलेल्या वाईट सवयी मला कधीच लागल्या नाहीत . त्या सर्व वाईट गोष्टींविषयी कसलंही आकर्षण निर्माण झालं नाही. कसलं तरी एक अदृश्य आवरण होतं, जे मला प्रत्येक वाईट गोष्टीपासून दूर ठेवत होतं. मी शिक्षणात बराच पुढे गेलो, पण भिल्ल समाजातील काही चांगलं व्यावहारिक कौशल्य मला प्राप्त करता आलं नाही. इतर भिल्ल मुलांसारखं गलूम चालवणं, गच्चे खेळणं, खेकडे व मासे पकडणं किंवा पक्षी मारणं मला कधीच जमलं नाही. मला आठवतं, आमच्या इंदिरानगरच्या भिलाटीतील माझे सगळे मित्र मासे पकडायला नदीवर जात असत. मासे पकडणं हा आवडता छंद होता आणि गरजसुद्धा. त्यांच्याबरोबर मीही जात असे.

पावसाळ्यात ओल्या, भुसभुशीत मातीतून गांडूळ निघायचे. दोऱ्याला बांधून गांडूळ पाण्यात सोडायचा आणि त्याच्या आमिषाला बळी पडून मासा वर आला, की तो कौशल्याने पकडायचा, असं ते तंत्र होतं. माझ्या मित्रांना सहजतेने मासे पकडतांना बघून मला मात्र खूप कौतुक वाटायचं. कारण प्रयत्न करूनही मला मासे पकडता येत नसत. हे बघून माझ्या एका मित्राने मला सांगितलं “राज्या, थांब. मीच तुले मासा पकडी देस. तू फक्त गोया कर”. पण गंमत अशी, की मित्राने पकडून दिलेले मासेसुद्धा मला नीट सांभाळता येत नसत. माझ्या हातातून टुनकन् उडी मारून ते परत पाण्यामध्ये जात असत. बया मला उद्देशून नेहमीच म्हणायची ” या पोयले एक मासा पकडता येत नही , खेकड्याबी पकडता येत नही . हाऊ पोऱ्या काहीच कामना नही, तेना बायको – पोरासनं पोट कसं काय भरी? शिकीसन एखादा ‘कलार्क बनना तं बरं शे, नहीतं हाऊ घरनास्नभी पोट भरावूनही. “त्यावर माझे मित्र खळखळून हसायचे. आम्ही कधी – कधी जंगलात मध वगैरे काढायला जात असू. कैऱ्या तोडायला जाणं, हा आम्हा सर्व मित्रांचा आवडता छंद. भिलाटीच्या जवळच एका पाटलाचं शेत होतं. त्या शेताच्या बांधावर आंब्याचं मोठं झाड होतं. (I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS). Part 19)

एक दिवस पाटील शेतात नाही, याची खात्री करून सर्व मित्र कैऱ्या तोडायला झाडावर चढले. या फांदीवरून त्या फांदीवर जाणाऱ्या माझ्या मित्रांना पाहताना मला गंमत वाटायची. मी मात्र त्याबाबत एकदम कच्चा खिलाडी होतो. मला काही झाडावर चढून कैऱ्या तोडणं जमत नसे. त्यामुळे माझ्याकडे नेहमीचं ठरलेलं काम होतं, ते म्हणजे त्यांनी तोडून खाली फेकलेल्या कैऱ्या गोळा करणं. मी प्रत्येक काम अगदी मन लावून करत असे. त्यामुळे कैऱ्या गोळा करण्यात दंग असताना शेतमालक मोटारसायकलवरून केव्हा आला ते मला कळलंच नाही. मागून हळूच येऊन त्याने माझ्या दंडाला घट्ट धरलं आणि मोठ्यानं शिवी हासडत गालावर जोरदार चापट मारली. कानात मुंग्यांचं वारूळ उठलं. आगपेटीशिवाय जाळ काढणे म्हणजे काय याचा अर्थ मला तेव्हाच समजला. माझे मित्र झाडावरच फांद्यांमध्ये लपून बसले होते. त्यामुळे माझ्याव्यतिरिक्त तिथे कोणी असल्याचं पाटलाच्या लक्षातदेखील आलं नाही. त्याने मला निर्दयीपणे ओढत – फरपटत गाडीपर्यंत नेलं आणि ‘चाल, तुना मायकडेच’, असं म्हणून मला गाडीवर बसवलं आणि भिलाटीचा रस्ता धरला. वाटेत तो मला मोठ्यानं शिव्या हासडत होता. हायी तुना बापना वावर शे का ? कामं करानी बोंब पडस. या झाडेस्ले काय तुना बाप पानी टाकाले येस…

क्रमशः
स्रोत(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading