मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड..(IAS).भाग १८.

माझं गाव, माझी वस्ती सामोडे. जगाच्या नकाशात स्थान नसलेलं एक गाव. गावाच्या मधूनच जामखेडी नदी वाहते, तर गावाच्या दक्षिणेला पिंपळनेरकडे पांझरा नदी खळखळत असते. गावात पिण्यासाठी असो वा शेतीसाठी पाण्याची कधीच कमतरता नसे. सामोडे गाव हे जुनागाव, नवागाव, दत्तनगर, कोकणपट्टी, कोईवाडा, इंदिरानगर व पिंपळनेरकडील घोड्यामाळ या सात भागांत विभागलं आहे. गावातील शाहू लोक म्हणजे पाटील, घरटे, शिंदे, भदाने ही मोठी मंडळी जुनागाव, नवागाव व दत्तनगरात राहतात. कोईवाड्यात कोळी, तर कोकणपट्टीत कोकणी लोक आणि आम्ही भिल्ल व अन्य मागासवर्गीय लोक इंदिरानगरात राहत असू.

मोठे शेतकरी, त्यांचे शेतमळे यामुळे सामोडे पूर्ण तालूक्यात प्रसिद्ध आहे. कांदा, मका, मिरची, ऊस, बाजरी, गहू, हरभरा, भुईमूग, भाजीपाला व इतर अनेक पिकांचे येथे चांगले उत्पादन होते. सामोड्यात गणेश चतुर्थी, नवरात्र इत्यादी सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. या कालावधीत संपूर्ण गावात भजन, अभंग, वग यांनी भारलेलं वातावरण मी लहानपणापासून अनुभवलेलं आहे. एकंदर पाहता सामोडे एक जीवंत गाव आहे. या गावाला स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गावात असतात तशा चांगल्या – वाईट गोष्टी व व्यक्ती सामोड्यातही आहेत. मात्र तरीही माझ्यासाठी सामोडे व आमची भिलाटी जगातलं सर्वांत सुंदर असं ठिकाण आहे. ही भिलाटीच खरंतर माझं जग. माझी जादुईनगरी. कृत्रिम डिस्ने वंडर लॅण्डला लाजवणाऱ्या माझ्या आठवणीतील कितीतरी गोष्टी माझं बालपण समृद्ध करणाऱ्या होत्या.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आमच्या भिलाटीच्या पदरात निसर्गाने भरभरून दान टाकले होते. शुद्ध – मोकळी हवा, खळाळत वाहणारी नदी, धाडसाला साद घालणान्या डोंगर – टेकड्या, झाडे, वेली, पशू, पक्षी, मधमाशा, मासे, खेकडे, रानफुलांचा मोहक सुगंध आणि जीवलग मित्र… स्वप्नवत असं सारं काही. तेव्हा भिलाटीचं नागरीकरण न झाल्याने आम्ही सारेच निसर्गाशी एकरूप होऊन जगत असू. नदीवर पोहायला जाणं, मासे पकडणं, खेकडे पकडणं, झाडावर चढणं, डोंगर टेकड्या पालथ्या घालणं, सूरपाट्या खेळणं. बकऱ्या चरायला नेणं, जंगलात भटकणं हा तर आमचा आवडता उद्योग. यातून आमचा शारीरिक तसा मानसिक विकासही होत होता. खळाळत्या झऱ्याच्या खालच्या बाजूस बकऱ्या पाणी पीत; तर वरच्या बाजूस आम्ही त्यांच्यासारखेच गुडघे टेकून पाणी पीत असू.

पण आजच्या जगातील हायजिनच्या दृष्टीने आम्ही कधी त्या पाण्याने आजारी पडल्याचं आठवत नाही. आम्ही इंदिरानगरातील मुलं शाहू वस्तीत जाणे शक्यतो टाळायचो. आमचे मळकट कपडे, वाढलेले केस, ठिगळ लावलेली चड्डी अशा अवतारात आम्हाला त्या स्वच्छ व सधन लोकांच्या वस्तीत जायची लाज वाटायची. भिलाटीत हाणामारी, शिवीगाळ हे रोजचंच असायचं. त्याउलट शाहू वस्तीतील लोक शिस्तबद्ध असायचे. त्यांचं वागणं – बोलणंही पद्धतशीर असायचं. अर्थात या फरकासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. पण तरीही दिसत असलेल्या फरकामुळे आमच्या मनात बराच न्यूनगंड असायचा. आमच्या भिलाटीत मुलं लहानपणापासूनच गुटखा, तंबाखू, दारू अशा व्यसनांच्या आहारी जात. बऱ्याचदा आमच्या भिलाटीला’ सामोड्याची घाण ‘असं संबोधलं जायचं. पण भिलाटीत आम्हाला त्याचं काहीच वाटत नसे. अपमान सहन करणं व मोठ्यांची बोलणी खाणं, हा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच होता. कधी – कधी शाहू वस्तीतील एखादा मालक आमच्या वस्तीत येई, तेव्हा सर्वजण त्याच्याशी फार अदबीनं बोलत.

कामातल्या दिरंगाईबद्दल किंवा एखाद्या चुकीबद्दल मालकाने आमच्या वस्तीत येऊन मजुरांना शिव्या देणं, तर अगदी सामान्य गोष्ट होती. इंदिरानगरात तीन गल्ल्या व मधोमध एक हनुमानाचं मंदिर आहे. मी लहान असताना एकाने मधल्या गल्लीत किराणा मालाचे दुकान थाटले होते. संपूर्ण इंदिरानगरात ते एकमेव दुकान होते. इंदिरानगरातील वरच्या वस्तीच्या लोकांच्या मानाने आम्हा भिलाटीतील लोकांना सर्वात शेवटी व दोनचार शिव्या खाल्ल्यानंतरच सामान मिळत असे. त्यामुळे दुकानात जायला मी नेहमी घाबरायचो. तिथली माणसं मला बऱ्याचदा “ए भिड्या – नाड्या ‘किंवा’ ए मिलट्या ‘असं संबोधत असत. कधी – कधी मला खूप रागही येई, पण त्या दुकानात जाण्यावाचून गत्यंतरही नसे. भिलाटीत मला अनेक मित्र होते , पण माझा सर्वांत आवडता मित्र म्हणजे शेजारून वाहणारी नदी. माझा दिवसातला कितीतरी वेळ त्या नदीच्या कुशीतच जाई. मित्रांसोबत पोहणं, मासे व खेकडे पकडणं, कधी – कधी काठावर वाळूमधे क्रिकेट खेळणं, ताईसोबत नदीतीरावर शेण थापटायला जाणं, शेणाच्या गोवऱ्या बनवणं अशी कितीतरी कामं आम्ही तिथंच करत असू. शिवाय आई कपडे धुवायला जाई, तेव्हा मीही तिच्याबरोबर नदीवर जात असे. त्या नदीचा मला लळाच लागला होता. तिचा धावता प्रवाह मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, असं उगीचच वाटत असे.

भिलाटीतील लोकांचं जीवन बरचसं त्या नदीवरच अवलंबून होतं. धुणी भांडी, गुरांची स्वच्छता, मासे पकडणं आणि भट्टी उभारून दारू पाडणं ही सर्व कामं त्या नदीच्या मदतीनेच होत असत. आधुनिकतेचे वारे आता आमच्या भिलाटीतही शिरले आहेत. आमच्या भिलाटीत भिल्ल बायकांचा एक विशेष पोशाख होता. त्याला ‘खांडवे’ म्हणत असत. एका लुकड्याला फाडून त्याचे दोन भाग करायचे. लुगड्याचा हा फाडलेला तुकडा म्हणजेच खांडवे . आता मात्र असा पोशाख खूप कमी बायका करतात. भिलाटीच्या वरच्या भागात एक बंधारा आहे. त्या ठिकाणी आमची सर्व वस्ती शौचास जात असे . आता गावात संडास बांधले गेले. त्यामुळे तिकडे सहसा कुणी फिरकत नाही. मात्र लहान असताना सर्व वस्तीची प्रभातफेरी रोज त्या बंधाऱ्याकडेच निघत असे. मी लहान असताना इंदिरानगरात पदवीपर्यंत तर सोडाच, पण दहावीपर्यंत शिक्षण झालेलंही कोणीच नव्हतं. भिलाटीची अवस्था तर त्याहूनही वाईट होती. मोठी माणसं व्यसनांच्या आहारी गेलेली. त्यांच्याकडून मुलांना काही संस्कार मिळणे अशक्यच. कुठलाही वचक आणि संस्कार नसलेली ती अजाण मुलं मग आठ – दहा वर्षांची असतानाच जुगार, दारू, चिलीम यांच्या आहारी जात. त्यांनी असं करू नये, असं त्यांच्या आई बापांनाही वाटत नसे.

घराला आधार म्हणून ही मुलं लहान वयातच शाळेत न जाता शेतात कामाला जात. पंधरा सोळा वर्षांचे होत असताना त्यांचं लग्नही होई व पुढे पूर्ण आयुष्य दारिद्याच्या त्याच भयानक अंधारात जाई. मी ‘नवोदय मध्ये शिकत असतानाच माझ्या बऱ्याच मित्रांचं लग्न झालेलं होतं. मला थोडी समज आली तेव्हा अनेक पालकांना भेटून शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचा मी प्रयत्न करत असे. त्यावेळी काही पालक तर स्पष्ट म्हणायचे “शाळा शिकीसन पोयले कोठे नोकरी लागाऊ शे ? घर राही तं पैसा तरी कमाई. मात्र काही पालक ऐकायचे. आपल्या मुलांना शाळेतही पाठवायचे. आजूबाजूच्या वातावरणात वाढलेलं ते पोर कसंबसं दहावी पास होत असे व नंतर शिक्षण बंद. आपला मुलगा लिहायला वाचायला शिकला, हेच आई – बाबासाठी मोठे भूषण असे. इतरांप्रमाणेच माझ्या मामा, काका व आत्यांची पोरंसुद्धा कधीच शाळेत गेली नाहीत. ही पोरं मग लहान वयातच लग्न वगैरे उरकून कामाच्या शोधात गुजरातकडे वगैर निघून जात.

माझ्या काही मित्रांनी तर मुलींना पळवून आणून लग्न केलं होतं. पण आज त्यांची अवस्था मी बघतो तेव्हा फार वाईट वाटतं. या सर्व लोकांचा खरा शत्रू गरिबी होती असं नव्हे , तर अज्ञान होतं, असं मला वाटतं. शिक्षणाचं बोट पकडूनच या चिखलातून बाहेर पडता येऊ शकतं. मात्र शिक्षणाने पुढे केलेला हात वेळीच पकडायचं सौजन्य दाखवायला हवं. समाजातील आर्थिक विषमता मला पुस्तक हाती पडायच्या खूप आधीच दिसू लागली. आमच्याच गावात आर्थिक परिस्थितीत जमीन – अस्मानचा फरक असलेले दोन वर्ग होते. आजही आहेत. भिलाटीत मी भिल्ल मित्रांसोबतच राहत असे, त्याचे मुख्य कारण म्हणजे इतर समाज आमच्याकडे कायम उपेक्षेच्याच नजरेने पाहत असे. त्यांच्याकडे न जाण्याचे दुसरे कारण म्हणजे मलाही कसला तरी न्यूनगंड जाणवायचा. शाळेत माझे काही फार जीवलग मित्र होते. ते सर्व चांगल्या घरचे होते. बऱ्याचदा ते मला आपल्या घरी जेवायला बोलावत. पण काही मित्रांच्या आई – वडिलांनी दिलेली वागणूक अनुभवल्यानंतर मी त्यांच्या घरी जाणे टाळायला लागलो. (I had a dream ! Dr. Rajendra Bharud.. (IAS). Part 18.)

आज मी डॉक्टर आहे, आय.ए.एस. झालो. पण आजही मोठ्या लोकांच्या घरी जाताना मला एकदडपण जाणवतं. मी आय.ए.एस.ची परीक्षा पास झाल्यानंतर अनेकांनी मला आपल्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं मी मात्र त्यांना नम्रपणे नकारच दिला. कारण मला वाटायचं की मी त्यांच्या घरी गेल्यावर माझी लहान असताना झालेली उपेक्षा उफाळून बाहेर येईल. ती एकतर मला अधिकच आक्रमक करेल किंवा कमजोर तरी करेल. मोठ्या लोकांच्या उलट मी भिलाटीतील कोणाच्याही घरी केव्हाही जाऊन जेवू शकतो. एखाद्याच्या ताटातील खाऊ शकतो. त्यांच्याकडे मागताना मला कसलाही संकोच वाटत नाही. कारण त्यांच्या देण्यात उपकाराची भावना नसते. असलाच तर तिथे परत – परत यायला लावणारा जिव्हाळाच असतो. मला नेहमी वाटतं की हे भिल्ल जरी शिक्षणाने, संपत्तीने किंवा मग तथाकथित सभ्य…

स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading