इगतपुरी, ठाणे असा प्रवास करत सकाळी सहा वाजता मुंबईनगरीत पोहोचलो. मला फक्त अॅॅडमीनिशण घ्यायचे असल्यामुळे आमच्याजवळ विशेष समान नव्हतं. मी मुंबईला पहिल्यांदाच आलो होतो. त्या महानगरीत उतरल्याबरोबर इमारती, सुसाट धावणारी वाहने यावरच भिरभिरत होती. शेजारीच युनिफॉर्ममधील सैनिक शिस्तीत उभे असावेत, तशा काळ्या – पिवळ्या टॅक्सींची रांग लागली होती. एवढ्या सकाळीही एवढी रहदारी होती, की खरोखरच हे शहर झोपत नाही की काय? असा विचार माझ्या मनात आला. माझ्याकडे पाहून नाना मला म्हणाले,’ आता तुलाही या गर्दीची सवय करून घ्यावी लागेल. कारण आता पुढची पाच – सहा वर्षे इथेच काढायची आहेत. म्हणून आजच सर्व नीट पाहून घे.

“थोड्या वेळाने ६७ नंबरची बस आली. आम्हाला के.ई.एम. रुग्णालयात जायचं होतं. मी पटकन बसमध्ये चढून खिडकीजवळची जागा पकडली. दर पाच मिनिटांनी बस कुठल्या ना कुठल्या स्टॉपवर थांबत होती. पण माझं सर्व लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती, सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स याकडेच होतं. रस्त्यात मला शाळा व कॉलेजेस दिसली. मुंबईची रक्तवाहिनी म्हटली जाणारी लोकलही शेजारूनच धावत होती. वरून जाणाऱ्या ओव्हरब्रिजकडे मी मान वळवून – वळवून बघत होतो. एवढं मोठं व एवढं जीवंत शहर मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. बसमधून उतरल्यावर चौफेर माणसांचे प्रचंड लोंढेच्या लोंढेच दिसत होते. प्रत्येकजण आपल्याच गडबडीत होता. एवढी गर्दी असूनही अगदी एकाकी असल्यासारखे ते दिसत होते.
मी टेलिफोन बूथमधून भुसावळच्या ‘नवोदय मध्ये शिकलेल्या उमेश चौधरीला फोन केला. सरांच्या ओळखीमुळे प्रवेश प्रक्रियेसाठी मदत करण्यास तो आनंदाने तयार झाला. किंग एड्वर्ड मेमोरिअल (केईएम) हॉस्पिटलच्या प्रांगणातच असलेलं शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय संपूर्णपणे भारतीय लोकांद्वारे स्थापलेलं भारतातलं पहिलं होतं. कॉलेजची स्थापना १९२६ मध्ये झाली असल्याचं उमेशदादाने सांगितलं. केईएममध्ये दररोज ५००० पेक्षा जास्त रुग्ण ओपीडीसाठी येतात, हे ऐकून तर मी थक्कच झालो. हॉस्पिटलचा परिसर अतिशय भव्यदिव्य होता. तिथे एक जुनी तीनमजली इमारत होती, तर एक नवीन आणि उंचचउंच अशी सतरा मजली इमारत होती. याशिवाय स्टुडंट्स होस्टेल, अॅकॅडमिक ब्लॉक, लायब्ररी व इतर अनेक छोट्या – मोठ्या इमारती होत्या. माझ्यासारख्या लहान गावातील मुलाला गांगरून टाकणारे ते सर्व वातावरण होते. माझ्या आयुष्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आता तिथूनच सुरू होणार होता. उमेशदादाने नानांसोबत जाऊन माझ्या अॅडमिशन फीचा चोवीस हजार रुपयांचा डी. डी. काढून आणला. अकरा वाजता आम्ही कार्यालयात गेलो, तर तिथे आधीच बरेच पालक आपल्या मुलांसोबत आलेले दिसले. कार्यालयात बरीच गर्दी होती. अॅडमिशन फॉर्म कसा व कुठे भरायचा, हे उमेशदादाने समजावून सांगितलं आणि तो अभ्यासासाठी निघून गेला.
यावेळी माझ्या स्वाभिमानाला धक्का लावणारी आणखी एक घटना घडली. त्याचं झालं असं, की मी भरलेला फॉर्म जमा करायला म्हणून गेलो. तिथे असलेल्या मॅडमने फॉर्म चुकलेला असल्याचं सांगितलं. आता मला नवीन फॉर्म भरून द्यावा लागणार होता. त्यामुळे फॉर्म भरताना आणखी चूक होऊ नये म्हणून मी मॅडमना फॉर्ममध्ये काय चुकलं, याविषयी सांगण्याची विनंती केली. त्यावर त्या मॅडम माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहू लागल्या. त्यांनी माझ्या कागदपत्रांतील एस.टी. कॅटेगिरीकडे एकवार पाहिलं व नंतर उपहासाने मला म्हणाल्या, की ‘ फॉर्म कसा भरायचा हेही ठाऊक नसेल, तर ‘ एमबीबीएस’चा कोर्स तरी कसा करणार? मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना म्हणालो, “मॅडम मी फक्त तुम्हाला एक अडचण विचारली, तर तुम्ही माझी लायकी काढून टाकली. कोर्स कसा पूर्ण करायचा, ते माझं मी पाहीन, तुम्ही फक्त मला फॉर्म कुठे चुकला ते सांगा. माझ्या उत्तराने त्या अधिकच भडकल्या व बोलल्या, की” आरक्षणाच्या जोरावर तुमच्यासारखे लोक डॉक्टर बनायला येतात आणि मग नापास होऊन घरी बसतात. फॉर्म कसा भरायचा तेही कळत नाही, वर तोंड करून मला प्रत्युत्तर देतोस. “मला काय बोलावं, हेच सुचत नव्हतं. झालेल्या अपमानाने मी नुसता तिथल्या तिथे थरथरत होतो. मला त्या बाईला ओरडून सांगावसं वाटत होतं, की मी कुठल्याही आरक्षणाच्या बळावर नव्हे; तर माझ्या गुणवत्तेच्या बळावर इथपर्यंत आलो आहे. आणि माझा गुन्हा फक्त एवढाच आहे, की मी आदिवासी समाजात जन्माला आलो? i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-42
मी लगेच तिथून बाहेर पडलो. एका बाकावर बसून विचार करू लागलो. औरंगाबाद शहराच्या घाटी मेडिकल कॉलेजनंतर सलग दुसऱ्यांदा माझ्याबाबतीत असं घडलं होतं. “नवोदय मध्ये असताना त्या ग्रामीण भागातील…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
