एवढा वेळ एकाच बोटीत असूनही मी तिच्याशी बोलणे तर सोडाच दोन क्षणांसाठी तिच्या डोळ्यांतही बघू शकलो नाही. तिथून बाहेर पडल्यावर सर्व मित्र मला डरपोक म्हणूनच चिडवायला लागले. माझं हृदय मात्र अजूनही जोराने धडधडत होतं. नंतर आम्ही नैनितालची अनेक ठिकाणं पाहिली. तिथलं प्राणिसंग्रहालय तर मला खूपच आवडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जवळचेच दोन तलाव बघायचं ठरविलं. तिथेही माझ्या मित्रांनी तिच्या व माझ्यासाठी स्वतंत्र बसण्याची आधीच सोय करून ठेवली होती. तिथून आम्ही भीमतालला गेलो. तलावात बोटिंग करताना आम्ही दोघं पुन्हा एकाच बोटीत बसलो.

आता मी मनातल्या मनात देवाचा धावा करत हळूहळू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. ती पॅडलची बोट असल्याने आम्ही पॅडल मारत इकडच्या तिकडच्या गप्पा करू लागलो. आणि काही वेळाने सगळी हिंमत एकत्र गोळा करून मी हळूच तिला विचारलं, “तुझ्या लग्नाविषयी घरच्यांचं काय मत आहे? म्हणजे ते प्रेमविवाहाला पसंती देतील की पारंपरिक विवाहाला. “माझ्या या बोलण्यावर ती थोडा वेळ माझ्याकडे बघतच राहिली व नंतर बोलली, “मी अरेंज मॅरेजच करणार आहे. आणि तेसुद्धा घरच्यांच्या संमतीनेच. त्यामुळे प्रेम वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही. “मला मुर्खाला एका मुलीला प्रपोज कसं करावं, हे सुद्धा कळत नव्हतं. प्रपोज करताना थेट लग्नाचा विषय काढणारा मी पहिलाच प्रेमवीर असेल. तिच्याशी ओळख वाढवून, मैत्री करून हळूहळू विषय पुढे नेण्याऐवजी मी थेट लग्नाचीच मागणी घालत होतो. तिचं उत्तर ऐकून मला थोडं वाईट वाटलं, पण दुसरीकडे माझ्या मनावरचा ताण आता उतरला होता. खरं तर आज मी सांगू शकत नाही, की ते खरोखरच प्रेम होतं की मग क्षणिक आकर्षण! खूप जास्त सहवास वाढला की एकमेकांविषयी नकळतच आकर्षण निर्माण होतं.
माझं ते प्रेमही कदाचित तसंच असावं. कारण त्यानंतर मला खूप वाईट वगैरे कधीच वाटलं नाही. उलट मी रोजच्या मानसिक तणावातून मुक्त झालो होतो. त्या मुलीशी त्या प्रसंगानंतरही माझी छान मैत्री होती. पण त्यानंतर मात्र आपली कुणी खास मैत्रिण असावी, असंही मला कधीच वाटलं नाही. त्यामुळेच मी माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर केंद्रित करू शकलो. माझ्या मित्रांना जेव्हा मी आमच्या दोघांमध्ये झालेले संभाषण ऐकविले तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. त्यांनी म्हटलं, की तुझं काही खरं नाही लेका, तू आयुष्यात कधी कोणती पोरगी पटवू शकणार नाही, असं म्हणून ते सर्वजण खळखळून हसायला लागले. मीही त्यांच्या हसण्यात सामील झालो. माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची प्रेमकथा अशी संपुष्टात आली. पण त्या प्रसंगानंतर मात्र आता मी ग्रुपमधे मोकळेपणाने वावरू लागलो.
नैनितालनंतर आम्ही आग्रा येथे गेलो. ताजमहाल बधितला. पुढे फत्तेपूर सिक्री, बुलंद दरवाजा, शाहजहानचा किल्ला, मीना बाजार असं खूप काही बघितलं. आमच्या या यात्रेचा शेवटचा टप्पा होता मथुरा. मथुरेला आम्ही खूप फिरलो. पुराणाप्रमाणे ज्या ठिकाणी कंसाच्या तुरूंगात भगवान कृष्णाचा जन्म झाला ते ठिकाणही आम्ही पाहिलं. तिथल्या मंदिरात भगवान कृष्णाची ती मनमोहक मूर्ती पाहताना माझे हात नकळतच त्या लीलाधरापुढे जोडले गेले. माझे बरेच मित्र म्हणत होते, की इथे प्रत्येक मंदिरात तीच मूर्ती व तेच भगवान कृष्ण आहेत. त्यामुळे आता आपण परत दिल्लीला जाऊ व एक दिवस आराम करू. पण मी त्यांना समजावले की ही भगवान श्रीकृष्णाची पवित्र भूमी आहे. इथे केवळ भगवान कृष्णाच्या मूर्तीच बघायला मिळतात असे नाही, तर त्यांचा सहवासही आपल्याला लाभतो. आपण या आध्यात्मिक प्रसादाचा श्रद्धापूर्वक स्वीकार केला पाहिजे. माझ्या आग्रहामुळे बाकीचे मित्र तिथे थांबायला तयार झाले.
आम्ही तिथली अनेक मंदिरं पाहिली. पुण्यक्षेत्र हरिद्वारपासून सुरू झालेली आमची यात्रा श्रीकृष्णाच्या पवित्र भूमीत येऊन पूर्ण झाली होती. या सहलीनंतर माझं मन थोडं शांत झालं होतं. आता आम्ही कॉलेजमधील सांस्कृतिक कामांचं नियोजन करायला सुरवात केली. सर्वांनी विविध स्पर्धांमध्ये भागही घेतला. त्यावेळी मुकेश पाटील या माझ्या बॅचमेंटच्या लिडरशीपमध्ये ‘अद्वैत’ या नाटकाचं आयोजन केलं गेलं. माझ्या बऱ्याच मित्रांनी त्यात भागही घेतला. मलाही त्या नाटकात भाग घ्यायचा होता, पण तोपर्यंत पात्रांची निवड झालेली होती. मला संधी न मिळाल्याने मी थोडा हिरमुसलो होतो. आपल्या अभिनय कौशल्याचं लोकांनी कौतुक करावं, असं मला मनापासून वाटत होतं. ‘अद्वैत’मध्ये काम करता आलं नाही, तरी बॅकस्टेजची खूप कामं मी केली. पडदे, वेशभूषेचं साहित्य यापासून ते परीक्षकांची व्यवस्था करणं, ही जबाबदारी मी आनंदाने पार पाडली. अशा पद्धतीने अभ्यासासोबतच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत माझं वैद्यकीय शिक्षण सुरू होतं.
तिसऱ्या व शेवटच्या वर्षात एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून माझी कॉलेजमध्ये ओळख निर्माण झाली होती. मी माझा जास्तीत – जास्त वेळ लायब्ररीमध्ये घालवत असे. कॉलेजमधील माझी सर्वात आवडती जागा म्हणजे लायब्ररी. मी होस्टेलमध्ये नसलो, तर माझे मित्र मला लायब्ररीतच शोधत येत असत. कारण मला एका गोष्टीची सतत जाणीव असायची, की माझ्याकडे केवळ एकच मौल्यवान गोष्ट आहे, ती म्हणजे वेळ. त्यामुळे वेळेचा वापर मी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करत असे. निरर्थक गप्पा करण्यात मी अजिबात वेळ दवडत नसे. त्यामुळे एकाग्रता वाढायला मला खूप मदत झाली. त्याच काळात मी ‘इस्कॉन च्या संपर्कात आलो. जीवनात आध्यात्मिक उर्जेचा संचार व्हावा, या उद्देशाने माझे आध्यात्मिक गुरू श्री नंददुलाल प्रभू आम्हाला विविध धार्मिक स्थळी नेत. या यात्रेची मी दरवर्षी उत्सुकतेने वाट बघत असे. गुरुजी नेहमी म्हणायचे, की भगवंताची तर सर्वच भक्ती करतात, पण जे भक्तांवर जीव लावतात तेच भगवंतास जास्त प्रिय असतात’. कॉलेजमध्ये मला शरीराचे आजार दूर करण्याचं शिक्षण मिळत होतं, आणि इथे मला आत्म्याचे विकार दूर करण्याची शक्ती प्राप्त होत होती. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-49
शेवटच्या वर्षात सर्वांनी झपाटल्यासारखा अभ्यास करायला सुरवात केली होती. काही विद्यार्थी तर झोप येऊ नये म्हणून औषधंसुद्धा घेत असत. चहा, कॉफी, सिगारेट अशा विविध व्यसनांचा आधार घेत काही जण दिवस – रात्र जागून अभ्यास करत पण मला स्वत:ला हा मार्ग अतिशय अयोग्य वाटतो. श्रद्धेने आणि स्वत:वर विश्वास ठेवून मी खूप अभ्यास केला आणि ‘एमबीबीएस’च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. ‘डॉक्टर व्हायचं जे स्वप्न मी बघितलं होतं, ते साकार करण्यासाठी मी माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करत मी झपाटून अभ्यास केला. डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न आता मला साद घालत अगदी थोड्याच अंतरावर उभं होतं…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
