आम्ही हरिद्वारच्या विविध मंदिरांना भेटी देऊ लागलो. काही जण भक्तिभावाने हात जोडत होते, तर काही जण विस्मयचकीत होऊन ती प्राचीन शिल्पकला बघत होते. तिथल्या वातावरणात फार प्रसन्नता वाटत होती. मी त्या आध्यात्मिक वातावरणात स्वत:ला ईश्वराशी एकरूप करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्यापैकी काहीजण फोटो काढण्यात गुंतले होते. फिरून – फिरून थकवा आल्याने आम्ही मंदिरांना पायी भेट देण्याऐवजी रोपवे, ज्याला आपण ‘उड़नखटोला’ असं म्हणतो, त्याने प्रवास केला. रोपवेमध्ये बसल्यानंतर उंचावरून दिसणारे दृश्य इतके सुंदर होते, की आम्ही काही न बोलता केवळ ते दृश्यच बघत बसलो होतो.

माझ्या पुढील आयुष्यात मला माझे गुरू भेटल्यावर त्यांच्यासोबत फिरताना आपण देवी – देवतांची पूजा का करतो? त्यांची प्रार्थना का व कशी करावी? असे बरेच प्रश्न त्यांना विचारत असे. यावर ते म्हणत, आपली श्रद्धा व प्रार्थना ही देवाला काही मागण्यासाठी नसून आभार व्यक्त करण्यासाठी व भगवंतावर प्रेम करण्यासाठी असते त्यावेळी अशा विविध गोष्टी मला कळाल्या. पण हरिद्वारच्या त्या वातावरणात मी केवळ मनातल्या श्रद्धेला प्रतिसाद देत, देवी – देवतांपुढे नतमस्तक होत होतो. दुपार – पर्यंत आमचं दर्शन घेऊन झालेलं होतं. आम्ही सर्वांनी आपापल्या घरी नेण्यासाठी गंगेचे पाणी बाटलीत भरून घेतलं व पुढच्या प्रवासाची म्हणजे ऋषिकेशची तयारी सुरू केली. ऋषिकेशला पोहोचल्यावर आम्ही गंगेच्या किनारी आमच्या गाड्या पार्क केल्या व लगेच समोरच्या नदीपात्रात उतरलो. गंगेच्या त्या विशाल व संथ वाहणाऱ्या नदीकडे पाहून मनाला एक प्रकारची गंभीरता प्राप्त होत होती. त्या नदीपात्राकडे पाहताना माझ्या मनात शेकडो विचार येत होते. आजपर्यंत लाखो लोक, ऋषी – मुनी, राजे, महाराजे यांनी त्या नदीपात्रात निर्मळतेचं दर्शन घेतलं असावं. तिच्या अविरत सेवेसमोर नतमस्तक होत हात जोडले असावेत. हा विचार मनात येताच नकळत माझेही हात भक्तिभावाने जोडले गेले.
नंतर त्रिवेणी घाटावरील विष्णू, शंकराचे मंदिर, राम – लक्ष्मण झुला बघितला. रात्रभर प्रवास करून आम्ही मसुरीला पोहोचलो. दोन दिवसांपासून झोप नीट झालेली नव्हती. म्हणून तिथे पोहोचल्यावर एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. दुपारी ताजेतवाने होऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो. मसुरीची सुंदरता पाहिल्याक्षणीच मनात भरते. निसर्गाने तिथे मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेली आहे. त्या सुंदर वातावरणात भारतीय सेनेने तयार केलेल्या शासकीय बागेत आम्ही फिरायला निघालो. या संपूर्ण प्रवासात माझे मित्र मला त्या मुलीच्या नावाने वेळोवेळी चिडवत होते. मला मात्र तिला कळलं तर तिच्या मनात आपली वाईट प्रतिमा निर्माण होईल, याची धास्ती वाटत होती. म्हणून मला चिडविणाऱ्या परेश व जावेदला समजावण्याचा मी प्रयत्न केला, की” “एखादी मुलगी मला आवडते, याचा अर्थ तिनेही मला पसंत करायलाच हवं, असा नाही. तिला कदाचित आणखी कोणी आवडत असेल किंवा या सर्व गोष्टींमध्ये तिला इंट्रेस्टच नसेल. त्यामुळे तुम्ही मला तिच्या नावानं चिडविणं बंद करा. यावर ते मला म्हणाले, “तू एकदा तिला तुझ्या भावना बोलून तर दाखव. त्यानंतरही जर तिने नकार दिला, तर आम्ही तुला चिडविणं बंद करू. ”योग्य वेळ आल्यावर मी तिच्यापुढे माझ्या भावना व्यक्त करायचं मान्य करून तो विषय तिथेच आटोपला व पुढे निघून गेलो. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-48
योगायोगाने नेमक्या त्याच दिवशी हॉटेलकडे परत येताना ती माझ्याजवळ आली व मला म्हणाली, “कसं वाटतंय मसुरीला? “तिच्या अशा वागण्याने मी खरं तर खूप नर्व्हस झालो होतो, पण वरवर हसण्याचा प्रयत्न करत’ मस्त वाटतंय एवढंच बोललो आणि दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात परेश व जावेदही तिथे आले. आम्हा दोघांना एकत्र पाहून ते मिश्किलपणे हसायला लागले. यावेळी मात्र मी पुरता खजील झालो. आता मी मनातल्या मनात ठरविलं, की जे होईल ते होईल, पण तिच्याशी आपण मनातलं लवकर बोललं पाहिजे. आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता नैनिताल. नैनिताल हे तलावांसाठी सुप्रसिद्ध असलेलं उत्तराखंडातील एक हिलस्टेशन आहे. तिथे दोन दिवस मुक्काम करायचं आम्ही ठरवलं होतं. तिथली माणसं, तिथलं निसर्गसौंदर्य बघून मी मोहरून गेलो. आम्ही तिथल्या तलावामध्ये बोटिंग करायचं ठरवलं, तेव्हा मित्रांनी मुद्दाम मला व तिला एकाच बोटीत बसवलं आणि स्वत: दुसऱ्या बोटीत बसले व जोरजोराने प्रेमगीत गाऊ लागले. मला तर लाजेनं तिथेच त्या पाण्यात उडी मारावीशी वाटत होती. पण ती मात्र माझ्या मित्रांकडे पाहून हसत होती.
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
