कॉलेजची सहल
“एमबीबीएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा छान गेली होती. जुलैमध्ये, निकाल लागायच्या आधीच सुट्या संपून पुन्हा एकदा कॉलेज सुरू झालं होतं. दुसऱ्या वर्षात आम्हाला पुस्तकी ज्ञानासोबतच पॅक्टिकलचाही अनुभव यावा, यासाठी आमची हॉस्पिटलमध्ये विविध वार्डात पोस्टिंग होत असे. यामध्ये आम्हाला रुग्णांवर उपचार कसे करावेत, हे शिकविलं जायचं. काही दिवसांनी फर्स्ट इअरचा निकाल लागला. मला ७२ टक्के गुण मिळाले. आमच्या होस्टेलमधील ६०-७० मुलांमधून माझा तिसरा किंवा चौथा नंबर आला होता. आमच्या बॅचमधील काही मुलं नापासही झाली होती. नापास झालेले विद्यार्थी आता कॅज्युअल बॅचमध्ये जाणार होते. नापास मुलांमध्ये माझा मित्र अमितही होता. अमित तसा मुळात हुशार होता; पण मोठा अभ्यासक्रम पाहून त्याचा आत्मविश्वास डळमळला. त्यामुळेच तो नापास झाला असावा. अमित खूपच निराश झाला. मी माझ्यापरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याचा आत्मविश्वास वाढून तो चांगल्या गुणांनी पास होत गेला.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात कॉलेजचं वातावरण थोडं सैल होतं. आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडेही लक्ष द्यायला थोडा वेळ मिळू लागला. दुसऱ्या वर्षी पाठ्यक्रमाचा कालावधी दीड वर्षाचा असायचा. त्यामुळे सुरवातीने सहा महिने आम्ही विविध कार्यक्रम, स्पर्धा यामध्ये भाग घ्यायचो. धमाल करायचो. सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्व जबाबदारी दुसऱ्या वर्षांच्या मुलांवरच असायची. त्यावेळी दिल्लीच्या ए.आय.आय.एम.एस. ( AIIMS ) मेडिकल कॉलेजमध्ये होणारा ‘पल्स’ हा इव्हेंट भारतातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा. त्यात सहभागी होण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक असत. प्रवास व निवासासाठी कॉलेजतर्फे सहकार्य केलं जायचं त्यामुळे द्वितीय वर्षाची बरीच मुले दरवर्षी तिथे जायची. कार्यक्रमासोबतच, जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणं, मौजमस्ती करणं हे ओघानं येतच असे.
म्हणून माझे काही मित्र मलाही तिथे येण्याचा आग्रह करू लागले. पण दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचा व राहण्याचा खर्च जरी कॉलेजकडून होणार असला, तरी उवीरेत खर्च बऱ्यापैकी जास्त असल्याने मी तिथे जाण्यास टाळाटाळ करत होतो. आता मी कॉलेजमध्ये चांगलाच रूळलो होतो. शिवाय फर्स्ट इअरला चांगले गुण मिळाल्याने माझा भावही थोडा वधारला होता. त्यामुळे इतर मुले मुलीही माझ्याशी बोलू लागले होते. मलाही त्यांच्याशी बोलण्याचा आत्मविश्वास येऊ लागला होता.
कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतून व जिल्ह्यांतून मुले – मुली येत असत. त्यामुळे काही ठराविक प्रांतांतील मुलांचा आपोआपच एक गट तयार होत असे. आम्ही त्याला रिजन्लायझम म्हणजे प्रांतवाद म्हणायचो. त्याप्रमाणे माझा जास्त संपर्क खान्देशातील मुलांशी अधिक होता. त्या सर्व मुलांनी मला दिल्लीला येण्याचा खूपच आग्रह केला. आमच्या त्या ग्रुपमधे इतर मुलांसोबत श्रीमंत व मारवाडी कुटुंबातील दोन मुलीही होती. त्या दोघीही धुळ्याचे होते. अर्थातच मी त्यांच्याशी कधीच बोललो नव्हतो. एक तर ते फाडफाड इंग्रजी बोलत, नाही तर हिंदीमधून संवाद साधत. माझी त्यांच्याशी ओळख आपण धुळे जिल्ह्याचे आहोत, इथपर्यंतच मर्यादित होती. तसाही मुलींच्या बाबतीत मी थोडा वेंधळाच होतो.
पहिल्या वर्षाला असताना मला नकळतच एक मुलगी मनापासून आवडू लागली होती. तिचा साधेपणा, लांब केस यांनी तर माझ्यावर मोहिनीच घातली. पण हे सर्व एकतर्फीच होतं. तिच्याशी थेट जाऊन बोलण्याचं मात्र धाडस मला झालं नाही. मनात कुठेतरी माझ्या गरिबीचा न्यूनगंड होता. त्यामुळे माझ्यासारख्या मुलावर कोण प्रेम करणार, या एका विचाराने मी तिला माझ्या भावना सांगण्यास घाबरत होतो. पण तिच्यामुळे माझं लक्ष जरा विचलीत झालं होतं, हे मात्र खरं. मी लायब्ररीत असो वा व्हरांडयात, ती समोर असली की मी हळूच इतरांच्या नकळत तिच्याकडे बघत असे. त्या काही क्षणांपुरता मी एक वेगळ्याच दुनियेत राहत असे.
एकदा गप्पांच्या नादात माझ्या मित्रांना मी म्हटलं होतं की, ‘ती मुलगी खूप सुंदर आहे. नाही! ‘तेव्हापासून माझ्या मित्रांनी तिच्यावरून मला चिडवायलाच सुरवात केली. अखेर उगीचच त्यांच्यासमोर मी बोललो, असं मला वाटायला लागलं. अशा भावना कधीही कुणाला सांगायच्या नसतात, पण एकदा बोलून गेल्यानंतर काही इलाजही नसतो. आमच्या जळगावच्या ग्रुपमधे ती सुद्धा येत असल्याने माझे मित्र मला दिल्लीला येण्यासाठी खूपच आग्रह करू लागले. आता मलाही जावंसं वाटायला लागलं. पण दिसत असलेल्या खर्चाने माझं मन खचत होतं. शेवटी न राहवून मी आईला फोन केला. आईने पैसे देण्यास होकार दिल्याने मी दिल्लीला जायची तयारी करू लागलो.
सप्टेंबरमध्ये आम्ही एकूण १२० विद्यार्थी दिल्लीला जायला निघालो. सर्वजण एकाच ट्रेनमध्ये असल्याने संपूर्ण प्रवासात आम्ही खूप मस्ती केली. गाण्याच्या भेंड्या, एकमेकांना चिडवणं, कधी शांतपणे खिडकीबाहेर बघणं, तर कधी एकमेकांबद्दल अधिक जाणून घेणं असं सुरू होतं. आमचा प्रवास सुखरूप झाला. दिल्लीला ए.आय.आय.एम.एस. (AIIMS) मेडिकल कॉलेजच्या शेजारीच एका हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय होती. कार्यक्रमाची सुरवात त्याच दिवशी संध्याकाळी होणार होती. संपूर्ण भारतातून विविध मेडिकल कॉलेजमधील शेकडो विद्यार्थी त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एक – दोन दिवस कार्यक्रमासाठी थांबून आम्ही उर्वरित दिवस उत्तर भारतातील प्रसिद्ध स्थळांना भेट द्यायचं ठरविलं. त्यामध्ये काही तीर्थक्षेत्र, काही प्रेक्षणीय ठिकाणं तर काही हिल स्टेशन बघायला आम्ही उत्सुक होतो. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-47
दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता आम्ही अकरा मुलं व पाच मुली अशा सोळा जणांसाठी दोन गाड्यांची व्यवस्था केली आणि आमची भ्रमंती सुरू झाली. सर्वप्रथम आम्ही हरिद्वारला जायचं ठरविलं. रात्रभर पाऊस पडत होता. पहाटे पाचच्या सुमारास आम्ही हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वार म्हटलं की गंगेत स्नान करणं आलंच. पण रात्रभरचा गारठा व सकाळची थंडी, वरून नदीचं पाणी बर्फासारखे गार, त्यामुळे देवाचं नाव घेतच गंगेत डुबकी मारली आणि गारठलेलं शरीर घेऊन थरथरत पाण्याबाहेर आलो. काही मुलांना हा सर्व अंधश्रद्धेचा भाग वाटत असे. पण खरं तर ती एक भावना असायची. मी मनातल्या मनात गंगेला हात जोडले व म्हणालो, ‘तू जशी सर्वांचे पाप धुतेस व समस्त विश्व निर्मळ करण्याचा प्रयत्न करतेस तसंच मलाही विचारांनी पवित्र कर. माझ्या मन आणि बुद्धीला विकारांच्या घाणीपासून दूर ठेवण्यास मदत कर.’…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
