कधी – कधी भीती वाटायची, की मला हा एवढा मोठा कोर्स पेलवणार की नाही. त्यात शिक्षक जेव्हा आमच्या आधीच्या बॅचमधील अपयशी मुलांच्या गोष्टी सांगत, तेव्हा तर माझा धीर अधिकच खचायचा. मला काही विषय खूप कठीण तर काही विषय खूपच सोपे वाटायचे. पण सोप्या विषयांचाही खूप अभ्यास करावा लागत असे त्यामुळे कठीण विषयांबद्दल तर बोलूच नये. मी अभ्यास चांगला करत असल्यामुळे क्लासमध्ये विचारलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मला ठाऊक असायची. पण माझे इंग्रजी कच्चे असल्याने व माझे उच्चार ग्रामीण असल्याने मला सर्वांसमोर बोलायला लाज वाटायची. म्हणून बऱ्याचदा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही मी शांतच बसत असे.

https://bit.ly/bspmycityshrigonda
एके दिवशी आमच्या गडकरी मॅडमने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका टॉपिकवर प्रश्न विचारला. प्रश्न थोडा कठीणच होता. त्या प्रश्नाचं उत्तर कोणालाच आलं नाही. पण मला ते उत्तर ठाऊक होतं. मी भीतभीतच हात वर केला व तोडक्या – मोडक्या इंग्रजीत त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं. इंग्रजीत नीट बोलता येत नसले, तरी माझ्या उत्तरातील कन्टेन्टस् मॅडमना खूप आवडले. या आधी मी कधीच बोललो नव्हतो, म्हणून शिक्षक मला नीट ओळखत नव्हते. त्या दिवशी मॅडमने मला नाव विचारून चौकशी केली. माझी माहिती सांगितल्यावर, त्या म्हणाल्या की, ‘तुला तर सर्व विषयांची चांगली माहिती दिसते, मग तू वर्गात कधी बोलत का नाहीस? ‘त्यावर मी त्यांना थोडं चाचरतच, मला इंग्रजीची भीती वाटत असल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं. त्यावर गडकरी मॅडम जे बोलल्या, ते मला खूपच महत्त्वाचं वाटतं. त्या म्हणाल्या – “चांगला डॉक्टर होण्याचा आणि इंग्रजीचा काहीही संबंध नाही. तू हुशार मुलगा आहेस. यापुढे तू आत्मविश्वासाने बोलत जा. इंग्रजी काय कुणीही बोलू शकतो, पण त्यामुळे तो चांगला डॉक्टर बनतोच असं नाही. तुझ्यात ती क्षमता आहे. त्यामुळे इंग्रजीचा न्यूनगंड न बाळगता निर्धास्त होऊन बोलत जा. सरावाने तुझी इंग्रजीही चांगली होईल. इतर लोक हसतील, या विचाराने आपण मागे राहिलो, तर कधीच आपली प्रगती होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा तर केवळ एक माध्यम आहे. आणि आपण त्या भाषेचा वापर केवळ यासाठी करतो कारण आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम इंग्रजीत शिकविले जातात. पण लक्षात ठेव आपण इथे भाषा शिकायला नाही, तर वैद्यकीय ज्ञान मिळवायला आलेले आहोत. “मॅडमने दिलेल्या प्रोत्साहनाने माझा आत्मविश्वास एकदम दुणावला. त्या दिवसानंतर मी वर्गात माझ्या ग्रामीण इंग्रजीतच पण आत्मविश्वासाने बोलू लागलो. बाकीची मुलं माझ्या तोडक्या – मोडक्या इंग्रजीवरून माझी खिल्ली उडवायचे, पण मला आता त्याचं विशेष वाईट वाटत नव्हतं. कारण मला आता कळून चुकलं होतं, की माझं ध्येय ‘इंग्रजी’ नसून ‘ज्ञान’ आहे. त्यामुळे मी त्यानंतर कुणाच्या चिडविण्याची पर्वा न करता इंग्रजीत बोलू लागलो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपोआपच मला इंग्रजीत उत्तम बोलता यायला लागलं. आणि याचाच फायदा मला माझ्या यूपीएससीच्या मुलाखतीवेळी झाला. त्या मुलाखतीत मला २१० गुण मिळाले होते. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-46
भिलाटीत मी गंमत म्हणून इंग्रजीत बोलत असे, तेव्हा सर्वजण माझ्याकडे खूप आश्चर्याने बघत. कधी – कधी मलाच माझं पूर्वीचं रूप आठवून हसू यायचं. कारण भिलाटीतील एक भिलाचा मुलगा ज्याला धड मराठीही बोलता येत नसे तो आज न अडखळता इंग्रजीत बोलू शकत होता. आणि हे सर्व शक्य झालं ते केवळ माझ्या शिक्षणाच्या व ज्ञान मिळविण्याच्या जिद्दीमुळे…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
