वातावरणाचं दडपण मुळीच जाणवत नव्हतं. संपूर्ण विश्वासाने व निर्धास्तपणे ते बोलत होते. तशी बोलण्याची फार भीती मलाही वाटत नसे. पण इंग्रजी हा आधीपासूनच माझा वीक पॉइंट होता. इंग्रजीत बोलायचं म्हटलं, की काय बोलावं, हेच सुचत नसे. आणि आता इथे शिक्षकांशीच नाही, तर विद्यार्थ्यांशीही इंग्रजीतून बोलावं लागणार, असं दिसत होतं. नुसत्या विचारानेच मी अस्वस्थ होत होतो. माझा आत्मविश्वास डगमगू लागला. या कॉलेजमध्ये आपला निभाव कसा लागेल, हाच प्रश्न वारंवार माझ्या मनात बोचत होता.

दुसऱ्या दिवशी आवश्यक ते साहित्य घेऊन आम्हाला शवविच्छेदनगृहात येण्यास सांगितलं गेलं. शरीर विच्छेदनाला आम्ही ‘अॅनॉटॉमी डिसेक्शन’, असं म्हणत असू. साध्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीराची चिरफाड. त्यासाठी आम्हाला स्क्लॅपल, सिसर म्हणजे कैची, ग्लोव्हज् आणि इतर काही साहित्याची गरज पडत असे. बाजूच्याच एका मेडिकल स्टेशनरी स्टोअरमधून ते सर्व साहित्य आम्ही घेतलं आणि डिसेक्शन हॉलमध्ये आलो. तिथे एक मानवी मृतदेह ठेवला होता. आम्हाला त्या ठिकाणी मानवी देहाच्या आतल्या अवयवांची माहिती देण्यात आली. मी याआधी कधीही मृतदेह पाहिलेला नव्हता. खरं सांगायचं, तर त्यामुळे मी थोडा घाबरलो होतो. लहानपणी ऐकलेल्या भूत – प्रेतांच्या गोष्टी माझ्या डोक्यात येऊ लागल्या. तिथल्या वातावरणात एक वेगळाच वास पसरला होता. मला त्या ठिकाणी गुदमरल्यासारखं होत होतं. शिवाय त्या मृत शरीराजवळ उभं राहण्याचं सुद्धा धाडस होत नव्हतं. काही वेळाने सरांनी हातात ग्लोव्हज् चढविले व स्क्लॅपलने त्या मृतदेहाच्या छातीवर चिरा मारायला सुरवात केली. आम्ही सर्वजण डोळे विस्फारून ते पाहत होतो. आमच्यापैकी कोणीही याआधी ही प्रक्रिया पाहिलेली नव्हती. सर्वांच्या हृदयाची धडधड वाढली होती. मला त्या प्रकाराची खूप किळस येत होती. पण डॉक्टर व्हायचं म्हणजे मानवी देह समजून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, हे उमजत होतं.
सरांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितली आणि आम्हाला त्याच हॉलमधील एका दुसऱ्या मृतदेहाचं निरीक्षण करायला पाठवलं. मृतदेहाला मेडिकल सायन्समध्ये कॅडेव्हर असं म्हणतात. अमोल, अमित आणि मी आम्ही तिघेही अन्य पंधरा मुलांसोबत एकाच ग्रुपमध्ये होतो. आम्ही त्या कॅडेव्हरजवळ जाऊन उभे राहिलो खरे, पण माझं हृदय वेगाने धडधडत होतं. त्यामुळे स्क्लॅपलने मृतदेहावर चिरा मारायची मात्र हिम्मत होत नव्हती. मी लहानपणी कोंबडं – बकरं कापताना बघायचो त्यामुळे रक्त पाहायची मला सवय होती, पण मानवी देह कापण्याच्या नुसत्या विचारानेच मला कापरं भरलं होतं. आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहत थरथरत्या हातांनी स्क्लॅपल उचललं व त्याच धारदार टोक कॅडेव्हरच्या छातीवर ठेवून, डोळे मिटूनच चिरा मारल्या. त्या दृश्याने काही विद्यार्थिनी व विद्यार्थी चक्कर येऊन खाली कोसळले. अश्या तऱ्हेंने अॅनॉटॉमीचं आयुष्यातील पहिलं प्रैक्टिकल सेशन आम्ही संपवलं.
काही महिन्यांनंतर मी सरावाने सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने करू लागलो. त्यावेळी आम्हाला मानवी हाडांचा व शरीराचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून एक बोनसेट म्हणजे मानवी देहाचा सांगाडा मिळालेला होता. अभ्यासासाठी तो आम्ही होस्टेलमध्ये नेला होता. मी जिथे झोपायचो तिथेच तो मानवी सांगाडासुद्धा माझ्याशेजारी झोपल्यासारखा कायम पडलेला असायचा. माझ्या आईने मला त्या अवस्थेत पाहिलं असतं, तर तिला चक्करच आली असती.
सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचे क्लासेस व पॅक्टिकल सुरू असायचे. तशी तिथे रॅगिंग विशेष चालत नसे, पण तरीही आम्ही सीनिअर विद्यार्थ्यांच्या भीतीने लायब्ररीत वगैरे जाण्याचे टाळायचो. कारण ज्युनिअर विद्यार्थी दिसले, की सर्व सीनिअर मिळून त्यांची मजा घेत असत. त्यामुळे संध्याकाळी आम्ही थेट लालबागच्या होस्टेलवरच जात असू. दिवसभर शिकविलेल्या गोष्टींची उजळणी व दुसऱ्या दिवशीची थोडी पूर्वतयारी करेपर्यंत झोपायला रात्रीचे एक- दोन वाजत असत. सकाळी पुन्हा सर्वांची घाई. कारण त्या संपूर्ण मजल्यावर ८० मुलांसाठी फक्त दोनच टॉयलेट व बाथरूम होते. त्यामुळे सकाळी तिथे मोठी रांग लागलेली असायची. या सर्व गोष्टी लवकर आटोपून आम्ही सर्व मिळून कॉलेजसाठी निघायचो. रस्त्यातही वर्गात शिकविलेल्या टॉपिकवरच चर्चा करायचो. मला खूप चांगलं माहीत होतं, की मुंबईसारख्या शहरात स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, तर अधिकाधिक ज्ञान मिळविण्यावाचून पर्याय नाही. माझी इंग्रजीची उणीव मी माझ्या वाढत्या ज्ञानाने भरून काढू शकत होतो. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-45
सुरवातीला जेव्हा माझी एमबीबीएस’साठी निवड झाली. तेव्हा, वाटलं होतं की, आता आपल्याला आणखी अभ्यास करण्याची गरज नाही. मेडिकलला नंबर लागला म्हणजे आपण डॉक्टर झाली; आता आपलं करिअर सेट झालं. पण, मी कालपर्यंत केलेला अभ्यास ‘एमबीबीएस’च्या अभ्यासापुढे अतिशय क्षुल्लक होता, हे लक्षात येण्यास मला फार वेळ लागला नाही.
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
