मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS),भाग ५०.

मी एक स्वप्न पाहिलं !

२०१२ च्या डिसेंबरमध्ये माझं मेडिकलचं शेवटचं वर्ष संपलं. त्यानंतर मला दोन महिन्यांची सुटी होती. सुटीच्या कालावधीत माझ्या अनेक वर्गमित्रांनी पोस्ट ग्रॅज्युएशन एन्ट्रन्स एक्झामच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेस लावले होते. मात्र, अशा कोचिंग क्लासेसची फी ५० ते ६० हजारांच्या आसपास असल्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन एन्ट्रन्स एक्झामचा विचार मला तरी करता येणार नव्हता. तो खर्च माझ्या आवाक्याबाहेरच होता. कारण पहिल्या वर्षापासूनच माझी ‘एमबीबीएस’च्या पुस्तकांची गरज आमच्या कॉलेज लायब्ररीवर भागत असे. मात्र, एन्ट्रन्स एक्झामच्या तयारीसाठी मला बाहेरून किमान २०-३० हजार रुपयांची पुस्तके विकत घ्यावी लागली असती. शिवाय परीक्षा फी आणखी वेगळीच. प्रवेश परिक्षेच्या तयारीचा खर्च मला अजिबात परवडण्यासारखा नव्हता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

माझ्या आत्तापर्यंतच्या शिक्षणासाठी आईने दोन – तीन लाख रुपये कर्ज काढलं होतं. त्यामुळं तिला आणखी कर्ज घ्यायला लावण्याचा मी विचारही करू शकत नव्हतो. शेवटी इंटर्नशिप करून लवकरात लवकर नोकरीला लागणे व घरच्यांचा ताण हलका करणे एवढं एकच उद्दिष्ट मी माझ्यापुढे ठेवू शकत होतो. मात्र गंमत अशी की, ‘एमबीबीएस’चा निकाल लागल्याशिवाय इंटर्नशिप करता येत नसे. त्यामुळं आपण आता काय करावे? हा एक मोठाच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. निकाल लागेपर्यंत वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय दिसत नसल्याने मी अखेर सामोड्याला घरी परतलो.

मी सामोड्याला असलो, की आईला घरकामात मदत करत असे. शिवाय मित्रांसोबत भटकणे, ताईच्या घरी जाणे हा दिनक्रमही ठरलेला असायचा. शेवटी फेब्रुवारीअखेरीस ‘एमबीबीएस’चा निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे उत्तम गुणांनी मी वैद्यकीय परीक्षा पास झालो. आईच्या कष्टाचं, भाऊच्या त्यागाचं आणि माझ्या प्रयत्नांचं अखेर चीज झालं. घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला, कारण आता त्यांचा ‘राजू कायमचा डॉक्टर झाला होता. कोणतीही शक्यता नसलेल्या अतिशय मागास वातावरणात वाढलेला, वडिलांचं छत्र जन्माआधीच हरवलेला, झोपडीतील एक मुलगा डॉक्टर झाला. माझ्या आईने मला दिलेलं व शिक्षकांनी माझ्या मनात रुजवलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले होते.

माझा निकाल ऐकून दोंडाईचाहून मंडाले मावशी व काका पहिल्यांदाच सामोड्याला घरी आले. मावशींनी आईजवळ माझं खूप – खूप कौतुक केलं. त्यांना मनापासून झालेला आनंद पाहून मला खूप समाधान वाटलं. मी दरवर्षी निकाल लागल्यावर मंडाले मावशींना फोन करीत असे. भिल्ल समाजातील एक मुलगा प्रतिकूल परिस्थितीशी लढून यश मिळवतोय, याचं मावशींना खूप कौतुक होतं. त्यांना माझा अतिशय अभिमान वाटे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचंच माझ्यावर प्रेम होतं. माझ्याही मनात त्यांच्याविषयी खूप आदर होता. मावशी व काकांच्या येण्याने मला जितका आनंद झाला तितकाच तो आईलाही झाला. मावशी परत गेल्यावर आई मला म्हणाली “मनी आख्खी हयातीमा आपना घर पहिला डावच शाहू समाजनी बाई उनी “. एका वरच्या समजल्या जाणाऱ्या समाजातील बाई आपल्या घरी आली, याचं तिला विलक्षण कौतुक होतं.

ती अन्य भिल्ल समाजातील स्त्रियांजवळ मावशीविषयी भरभरून बोलत असे “दोंडाईचानी ती बहीण मना राजूनी दुसरी मायच शे. त्यासना घर बठ्ठा जण त्याले खूपजीव लावतंस आणि भलतंच कौतिक करतंस. “लोक आपल्या लेकाचं कौतुक करतात यातच तिला समाधान होतं. मी यश मिळवतोय म्हणजे नक्की काय करतोय, हे मात्र आईला फारसं कळत नव्हतं. त्यामुळे पूर्वी मी माझ्या यशाचा आनंद भगवंतासोबत साजरा करत असे. मंडाले मावशींसोबत संपर्क आल्यानंतर मला माझ्या जीवनात प्रोत्साहन देणारं आणि मनापासून कौतुक करणारं हक्काचं आपलं माणूस मिळालं. डॉ. मंडाले काका चारचौघांत माझं उदाहरण मुलांना देत. अशा छोट्या – छोट्या प्रसंगांनी आमच्यातील प्रेमभाव आणखी दृढ झाले.

मी डॉक्टर झाल्याचा आनंद घेऊनच मुंबईला परतलो. वैद्यकीय शिक्षणाचा प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी एक वर्ष सक्तीने काम करण्याचा नियम असतो. त्यालाच इंटर्नशिप असं म्हणतात. त्याशिवाय ‘एमबीबीएसची पदवीच मिळत नाही. माझी इंटर्नशिप केईएम हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. याच काळात माझ्या वर्गमित्रांमध्ये स्पर्धापरिक्षांबाबत चर्चा चालत असे. मी ‘यूपीएससी’च्या परिक्षेची तयारी करावी, म्हणून माझ्या मित्रांनी मला प्रोत्साहन द्यायला सुरवात केली. खरं तर मी १२ वी ची परीक्षा पास झाल्यानंतर प्राचार्य देवरे सरांनी मला स्पर्धा परिक्षेचं स्वप्न दिलं होतं. मला मात्र मनातून धास्ती वाटू लागली, की यामुळे मेडिकलचा सगळा अभ्यास वाया जाणार. त्यापेक्षा मेडिकलचाच आणखी थोडा अभ्यास केला, तर आपल्याला कदाचित शासकीय कोट्यातून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळू शकेल. ‘यूपीएससी’च्या नादात जर पदही मिळालं नाही, तर ‘तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं’ असा व्यावहारिक विचार मनात यायचा. ‘यूपीएससीच्या तयारीसाठी किमान दोन – तीन वर्ष लागतात, असं मी ऐकून होतो. काही जणांना तर चार – पाच वर्षे घालवूनसुद्धा अपयशाची नामुष्की टाळता येत नाही. कारण ‘यूपीएससी’ ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षा मानली जाते. आणि दुर्दैवाने याव्यतिरिक्त मला या परिक्षेबद्दल काहीच माहीत नव्हतं. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-50

मार्चचे एक – दोन आठवडे उलटले असतील. एका सीनिअर विद्यार्थ्याचं पदव्युत्तर प्रवेश परिक्षेचं जाडजुडं पुस्तक वाचत मी लायब्ररीत बसलो होतो. पण त्यात माझं मनच लागत नव्हतं. डोक्यात विचारांचं चक्र वेगाने फिरत होतं. मी खूपच अस्वस्थ झालो. तसाच उठून गिरगाव चौपाटीवर आलो. लाटा उंच उसळत होत्या. तो अथांग सागरही अगदी माझ्यासारखाच अस्वस्थ भासत होता. गुंतागुंतीच्या त्या विचित्र मनःस्थितीत मी ‘इस्कॉन’च्या श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात गेलो. मुंबईत असताना मी नेहमीच या मंदिरात येत असे. श्रीकृष्ण भगवान आणि इस्कॉनचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि आयुष्यावर खूप आहे. ‘इस्कॉनच्या हरे कृष्णा चळवळीशी जोडला जाणे, हा माझ्या आयुष्यातील फार मोठा बदल होता. मला तिथे माझे आध्यात्मिक गुरू भेटले. इथे तुमचा श्रद्धा व अंधश्रद्धा यातला भेद दूर होऊन तुम्ही स्वत:च्या अधिक जवळ जाता. ही चळवळ तुम्हाला विशिष्ट वेशभूषा वगैरे करायला सांगत नाही किंवा तुम्हाला तुमचा धर्मही बदलायला लावत नाही. इथे सांगितलं जातं, की तुमच्या जाणिवा या कोणत्याही धर्मापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. खरं तर ‘हरे कृष्ण भाव…

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.!या डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

Leave a Reply