मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS), भाग ५४.

‘यूपीएससी’ची तयारी…

मुख्य परिक्षेच्या अभ्यासासाठी ९० दिवसांचा कालावधी अतिशय कमी असल्याची पूर्ण जाणीव मला होती. त्यामुळे मी मिळेल तेवढा वेळ अभ्यासाला देत होतो. पण याच काळात इंटर्नशिपच्या कामांचा व्यापही प्रचंड वाढला. त्यासाठी मला दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता. अशातच श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या आयोजनाची सूत्रं माझ्याकडे सोपविली गेली. त्यामुळे वर्गणी, सजावट, भोजन, आरती इत्यादी अनेक कामांच्या समन्वयाची मुख्य जबाबदारी माझ्याकडे होती. पण माझे मित्र मदतीला असल्याने मला त्याची फार चिंता वाटत नव्हती. मी कामांची विभागणी करून ती विश्वासाने त्यांच्यावर सोपविली. ते झपाटून कामाला लागले.

शेवटी जन्माष्टमीचा दिवस उजाडला. आम्हा मित्रांच्या उत्कृष्ट नियोजनाने सारं काही सुरळीत पार पडलं होतं. कॉलेजचे डीन, होस्टेलचे डीन, प्राध्यापकवृंद अशी बरीच मंडळी त्या कार्यक्रमाला आलेली होती. त्या सर्वांनीच कार्यक्रम खूप आवडला असल्याचं सांगितलं. योगायोग म्हणजे जन्माष्टमीचा कार्यक्रम सुरू असतांनाच यूपीएससीच्या पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर झाल्याचं मला कळलं. तेव्हा माझ्या एका मित्राने मोबाईलवरच इंटरनेट उघडून निकाल पाहिला. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण भगवंताने मला प्रसाद दिला. मी अपेक्षेप्रमाणे पूर्व परीक्षा पास झालो. मी पूर्व परीक्षा पास होण्यामध्ये C – SAT चा वाटा नक्कीच मोठा होता, हे मनोमन मला पटत होतं. एखादी गोष्ट पाठ करण्यापेक्षा ती समजून घेऊन अभ्यास करण्याच्या माझ्या सवयीमुळेच C – SAT विशेष अभ्यास न करता मी उत्तीर्ण झालो होतो.

या निकालानंतर सर्व मित्रांनी मला समजावलं की, “तू आता मुख्य परिक्षे | जीव लावून अभ्यास कर. वेळ खूपच कमी आहे. आमच्या मेडिकलच्या पदव्युत्तर प्रवेश परिक्षेला वेळ आहे. त्यामुळं तुझी इंटर्नशिपची कामे सध्या आम्ही वाटून घेतो. तू फक्त अभ्यास कर. कशाचीच चिंता करू नकोस. “मुख्य परिक्षेला २ विषय वैकल्पिक असतात. त्यापैकी साडेचार वर्षे मनापासून अभ्यासलेला ‘मेडिकल सायन्स’ हा एक विषय मी ऐच्छिक म्हणून निवडला. या विषयात उपविषयांची संख्याही तशी तुलनेने कमी होती. त्यामुळे हा विषय सोपा जाईल याची मला खात्री वाटत होती. आता माझ्यापुढे प्रश्न उभा होता तो दुसऱ्या वैकल्पिक विषयाच्या निवडीचा. माझ्यासाठी एकच अनुभवी व्यक्ती होती, ती म्हणजे चंद्रशेखर. मी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी स्वत:साठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (Political Science & International Relationship ) हा विषय निवडला असल्याचं मला सांगितलं. मग मी सुद्धा तोच ऐच्छिक विषय घेण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रामाणिक कारणं दोनच होती. एक म्हणजे मला चंद्रशेखर यांच्या त्या विषयातील अनुभवाचा फायदा होणार होता आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे संबंधित विषयांची पुस्तके उपलब्ध असल्याने त्यांच्या झेरॉक्स मी सहजतेने मिळवू शकणार होतो. आधी माझ्या ध्यानी – मनी नसतांना मी दुसऱ्या वैकल्पिक विषयाचा प्रश्न सोडवला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

पहिल्या दोन महिन्यांच्या अभ्यासासाठी राज्यशास्त्र तसेच सामान्य अध्ययन हे दोन विषय तासांमध्ये विभागले. दिवसातील १२-१४ तासांपैकी ते ८ तास ‘राज्यशास्त्र’ आणि उरलेल्या वेळेत ‘सामान्य अध्ययन’ असं वेळापत्रक मी ठरवलं. ‘राज्यशास्त्र’ हा विषय खूप व्यापक होता. त्यामुळे नेमके काय वाचावे, हा प्रश्न मला सतावू लागला. वेळेअभावी मी मोजकीच पुस्तके निवडली आणि उरलेल्या एका महिन्यात ‘मेडिकल सायन्स’चा अभ्यास पूर्ण करण्याचं ठरविलं. परीक्षा एक ते दीड महिना चालणार होती. त्यामुळे मेडिकल सायन्सला बऱ्यापैकी वेळ मिळणार होता. एमबीबीएस करताना न कंटाळता खूप वेळ अभ्यास करण्याचा मला सराव होता. मी माझ्या डोक्यात अनावश्यक गोष्टींना मूळीच थारा देत नसे. कालावधी खूप कमी आहे म्हणून मी कधीही खचलो नाही. आपल्याकडे असलेल्या वेळेचा पुरेपूर लाभ घेऊन प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, हे मी मनाशी ठरवलं होतं. आपण जेव्हा एखादी गोष्ट अगदी मनापासून करतो तेव्हा ती कितीही कठीण असली तरी सोपी होत जाते. अशाप्रकारे एकंदरीत ३ महिन्यांच्या अभ्यासाचं नियोजन मी तयार केलं. आणि स्वत : च्या संपूर्ण क्षमता अधिकाधिक ताणून अभ्यास केला.

मुख्य परिक्षेचे एकूण ९ पेपर होते. परीक्षा केंद्रावर पोहोचलो तेव्हा टक्कल पडलेले, वाचन करून करून जाड भिंगाचा चष्मा लागलेले बरेच विद्यार्थी पुस्तकात डोकं लपवून बसले होते. मी मात्र पुस्तकांशिवायच गेलो असल्याने वर्तमानपत्र वाचत बसण्याखेरीज पर्याय नव्हता. पण अभ्यासमा वातावरण पाहून मला चुकल्या – चुकल्यासारखं वाटू लागलं. इतक्यात आपण एवढं सैल व्हायला नको होतं, माझं मलाच वाटून गेलं. मी एका मित्राकडून पुस्तक मागून घेतलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत वाचत बसलो. सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर सुरू झाला. पहिली ते बारावीपर्यंत मन लावून केलेला अभ्यास मला या परिक्षेत कामी येत होता. या परिक्षेचा मला अनुभव नव्हता; पण चांगल्यात चांगलं लिहिण्याचा मी प्रयत्न करत होतो. काही प्रश्न तर मला संपूर्णपणे कळलेसुद्धा नव्हते. पण जशी जमतील तशी तर्कसंगत उत्तरे मी लिहीत होतो. कारण मला चंद्रशेखर यांनी बजावलं होतं, ‘पेपर जास्तीत जास्त पूर्ण भरूनच ये’. त्यामुळे मी पेपर लिहिण्याचा वेग वाढवला. शिवाय शेवटी – शेवटी दोन – तीन पुरवण्याही वापरल्या. एकंरीत सामान्य अध्ययनचा पेपर चांगला गेला. त्यातील गणित विषय तर मी आवडीने सोडविला. माझी गणित सोडविण्याची भूक १२ वी नंतर प्रथमच या परिक्षेत मी भागवली. ‘वाचलेलं आणि मिळवलेलं वाया जात नाही’, या वाक्याचा प्रत्यय मला सामान्य अध्ययनचा पेपर सोडवितांना आला.

दुसरा पेपर ‘भाषा आणि निबंधा’चा होता. खरं तर, भाषेचे गुण हे अंतिम गुणांत धरले जात नाहीत. फक्त किमान गुणांची पातळी तपासली जाते. निबंधाचे गुण मात्र ग्राह्य धरले जातात. त्यामुळे पत्रलेखन व निबंध बघूनच परिक्षेसाठी गेलो होतो, हा पेपरसुद्धा बरा गेला. राज्यशास्त्राचा पेपर जसजसा जवळ आला तसा मी अभ्यासाचा आणखी वेग वाढवला. अभ्यासक्रम खूप व्यापक असल्याने एकदाच वाचन झालं होतं. जे जे आठवलं, ते ते लिहित गेलो. काही वेळा तर प्रश्नातल्या शब्दांच्या आधारे उत्तरे लिहिली. राज्यशास्त्राचा पेपर खराब गेला. १५ दिवसांनी मेडिकल सायन्सचा पेपर होता. खरं तर त्या १५ दिवसांमध्येच मी मेडिकल सायन्सच्या पेपरचा खऱ्या अर्थाने अभ्यास केला. मी तो पेपर खूप चांगला सोडविला. अशाप्रकारे मुख्य परिक्षेचा अध्याय संपला. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-54

पुन्हा इंटर्नशिप नियमित सुरू झाली. इंटर्नशिप व्यवस्थित व वेळेवर पूर्ण न केल्यास पदवी प्रमाणपत्र मिळत नसे. नोव्हेंबर जवळ आला होता. मित्रमंडळीनी जोमाने पदव्युत्तर प्रवेश परिक्षेची तयारी सुरू केली होती. त्यांना जास्तीत जास्त वेळ अभ्यास करायला सांगून आता मी माझ्या कामांसोबतच माझ्या मित्रांचीही कामे करू लागलो. जानेवारीमध्ये कॉलेजच्या स्थापना दिनाला विविध पुरस्कारांचा वितरण…

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.!डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

Leave a Reply