मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS), भाग ५३.

आईला’ आम्ही राजूकडे लक्ष देऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं सांगितलं’. शेवटी आईने होकार दिला व आम्ही सर्व पिंपळनेरला जायला निघालो. ५ सप्टेंबर २०११ चा तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. रात्री नऊच्या सुमारास आम्ही ऑटोरिक्षाने पिंपळनेरच्या जवळ पोहोचलो. पिंपळनेरला लागूनच पाझरा नदी वाहते. पण त्या दिवसात नदीला फार कमी पाणी असतं. नदीवर एक पूलही आहे. त्या पुलाजवळच स्थानिक रिक्षावाले उभे होते. त्यांनी आमच्या रिक्षावाल्याला अडवलं. ते तिथून कुठल्याही बाहेरच्या रिक्षाला गावात जाऊ देत नसत. त्यामुळे आमच्या रिक्षावाल्याने आम्हाला तिथेच उतरायला सांगितलं. गावात नेऊन सोडायचं आधीच ठरलं असल्यानं माझे मित्र संतापले. ते त्या रिक्षावाल्याशी भांडू लागले. गावात नेलं नाही, तर आम्ही तुला पैसे देणार नाही, असं माझ्या मित्रांनी रिक्षावाल्याला सांगितलं. गावातील रिक्षाचालकांच्या भीतीनं तो त्याच्या मुद्यावर ठाम होता. त्यामुळं वाद वाढतच गेला. शेवटी मीच माझ्या मित्रांना समजावलं. त्या रिक्षावाल्याची अडचण असेल म्हणूनच तो पुढे जाण्यास नकार देत असेल, असं मी त्यांना सांगितलं. यावर माझे मित्र नाराजीनेच का होईना, पण रिक्षातून उतरले व ठरविल्याप्रमाणे आम्ही त्याला पूर्ण पैसे दिले. यात बराच वेळ गेला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

पुढच्या क्षणांमध्ये काय घडणार आहे, याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. रिक्षातून उतरल्यानंतर आम्ही पुलापासून जेमतेम दहा बारा पावलं पुढे गेलो असेल, तोच चारही बाजूंनी एकच गोंधळ उडाला. आम्ही बघतो तर काय? जीवाच्या आकांताने पंधरा – वीस लोक आमच्याकडे धावत येताना दिसले. त्यातीलच एकजण धावता – धावता मोठ्याने ओरडला’ गॅस सिलिंडरचा टँकर नदीत पडला. पुलापासून लांब पळा. ‘त्याचं बोलणं पूर्ण होत नाही तोच कानठळ्या बसविणारा एक जबरदस्त मोठा विस्फोट झाला. नदीच्या पात्रातून आगीचा एक भयकारी लोळ निघून विजेच्या वेगाने आकाशाकडे झेपावला. सर्व आसमंत त्या आगीच्या प्रकाशात उजळून निघाले होते. त्या स्फोटाचा आवाका इतका मोठा की संपूर्ण पूल त्या आगीमध्ये झाकोळला गेला.

चारही बाजूंनी पळापळ चालली होती. हे सर्व काही कळण्याच्या आत अगदी काही क्षणांमध्येच घडले होते. आम्ही सर्वजण त्या भयंकर ज्वाळांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी पुलापासून दूर पळू लागलो. संकटातच खऱ्या मैत्रीची परीक्षा होते, असं म्हणतात, ते खरंच आहे. मला काहीही होऊ नये म्हणून माझे सर्व जीवलग मित्र माझ्या चारही बाजूंना कोंडाळे करून धावत होते. जे लोक पुलाच्या मध्यावर होते, काही क्षणांतच त्यांच्या शरीराची अक्षरश: राख झाली. आम्ही पुलापासून लांब असूनही आगीची प्रचंड धग जाणवत होती. ती एवढी होती, की आम्हाला आमचं संपूर्ण शरीर भाजून निघाल्यासारखं वाटत होतं. आगीच्या झळा मला बसू नये म्हणून माझ्या सभोवती कोंडाळे करून धावणाऱ्या माझ्या मित्रांची पाठ त्या आगीने सोलून निघाली होती. पुलाच्या जवळ असलेली सर्व वाहने व दुकाने त्या आगीच्या कचाट्यात सापडली होती. विध्वंसाचे इतके प्रचंड रौद्र रूप मी आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो. पुलापासून बऱ्याच अंतरावर आल्यानंतर धापा टाकत आम्ही थांबलो.

काय बोलावं ते कोणालाच समजत नव्हतं. त्या धक्क्यातून थोडं सावरलो तेव्हा आम्हाला कळलं की, आमच्या रिक्षापुढे गॅस – सिलिंडरचा एक टँकर सामोडे पिंपळनेर चौफुलीकडे जात होता. गावाजवळ आल्यावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले होते. ट्रक एका खांबाला आदळून त्या खांबाच्या ताराही तुटल्या होत्या. जत्रेमुळे गावात बाहेरून आलेल्या हजारों लोकांची गर्दी होती. टँकर गावात शिरल्यास प्रचंड मोठी प्राणहानी झाली असती, म्हणून ड्रायव्हरने हुशारी दाखवत संपूर्ण टँकरच पुलाचे कठडे तोडून नदीत उलटवला होता. आम्ही पाहिलेला तो विस्फोट एखाद्या हॉलीवूडच्या चित्रपटालाही लाजवेल एवढा प्रलयंकारी होता. जवळपास दहा किलोमीटरपर्यंतच्या गावातील अनेक लोकांनी आगीचे ते तांडव प्रत्यक्ष पाहिल्याचं नंतर सांगितलं. विस्फोट झाल्यावर वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे बातमी पोहचली. काही क्षणांतच गावागावांमध्ये अनेक अफवा पसरल्या. आमच्या घरीही तोपर्यंत अफवा पोहोचल्या होत्या. त्यामुळे घरी सगळेच खूप काळजीत होते. आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोहोचल्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आला.

मला बघताच आई धावत आली व मला काही झाले तर नाही ना म्हणून बघू लागली. पण जेव्हा घरच्यांना कळले, की माझ्या सर्व मित्रांनी मला काही होऊ नये म्हणून स्वत:च्या पाठी भाजून घेतल्या, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. लगेच त्या सर्वांवर उपचार केले गेले. लहानपणापासून मला जपत आलेल्या माझ्या मित्रांनी मला त्या स्फोटापासून कसं वाचवलं, ते मी सर्वांना अभिमाने सांगत होतो. तर ते म्हणत होते, की जर राजूने आम्हाला थांबवलं नसतं व आम्ही त्या रिक्षाने पुढे गेलो असतो, तर आम्हाला पळायलाही वेळ मिळाला नसता. खरं तर राजूनेच आमचे प्राण वाचविले. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-53

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी वाचली तेव्हा स्फोटामध्ये पाच – सहा जण जागेवरच ठार झाल्याचं कळलं. पुढे अनेक दिवस गावात त्या स्फोटाचीच चर्चा सुरू होती. आजही तो दिवस आणि ते क्षण आठवले की अंगावर शहारे उठतात. त्या दिवशी मृत्यू अगदी आमच्यापासून काही पावलांवरून गेला होता.”

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.!डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading