दिनांक १६ ऑगस्ट २०२४,काष्टी, श्रीगोंदा:
परिक्रमा शैक्षणिक संकुलात ७८ वा स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला, ज्यामध्ये युरोपीय पाहुण्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. या विशेष प्रसंगी इंटरनॅशनल आयुर्वेदा असोसिएशन आणि परिक्रमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांनी पाहुण्यांचे स्वागत करून केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फिना मऊरी (क्याटालोनिया), थॉमर फर्नडिस (स्पेन), अवरी येली डोमिंगेज (अंदोरा), आले हांद्रो ओला रियागा (अर्जेंटिना) यांच्यासह अन्य १० युरोपीय तज्ञ उपस्थित होते. या परिसंवादाचे संचालन इंटरनॅशनल आयुर्वेदा असोसिएशनचे संस्थापक डॉ. अतुल राक्षे यांनी केले.
परिक्रमा शैक्षणिक संकुलाने ग्लोबल विलेज फॉर सोशल वेल्फेअर या उद्दिष्टांसाठी आपली भूमिका बजावताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद आणि योगाचा प्रसार करण्यासाठी तज्ञांशी सखोल चर्चा केली. या बैठकीत डॉ. अतुल राक्षे यांनी आयुर्वेदाच्या जागतिक प्रसारातील संधींचे विवेचन केले. परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सिंह पाचपुते यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न कसे आहेत, याची माहिती दिली.
या प्रसंगी काष्टीसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या सुविधांची पाहणी करताना परदेशी पाहुणे देखील भारावून गेले. परिसंवादामध्ये प्रताप सिंह पाचपुते, प्रशासकीय अधिकारी अनिल पुंड, अकॅडमीक डायरेक्टर डॉ. संजीव कदम पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ, डॉ. रमेश शिंदे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजीवन महाडिक, विभाग प्रमुख मोहन धगाटे, प्राचार्य डॉ. सुवर्ना निर्मळ, प्राचार्य इथापे यांसह इतर प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
स्वातंत्र्य दिनाच्या या अनोख्या उत्सवामुळे परिक्रमा शैक्षणिक संकुलामध्ये जागतिक संवादाला चालना मिळाली असून, यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञानाची समृद्धी लाभेल.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)





