दिनांक १६ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी प्रसाद काटे यांची निवड करण्यात आली असून, अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी नाना शिंदे यांची निवड झाली आहे. हा निर्णय काल, १५ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे आयोजित सभेत घेण्यात आला.
ही सभा संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य प्रदीप कणसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांची उपस्थिती होती.
या बैठकीत प्रदीप कणसे यांनी संघटनेचे नवे धोरण कार्यकर्त्यांसमोर मांडले. त्यांनी विदेशात नोकरीच्या संधी, उद्योग व्यवसाय, आणि रोजगार निर्मिती यावर विशेष जोर दिला. ते म्हणाले, “शिवाजी महाराजांनी तंजावर ते पेशावर असा विस्तृत स्वराज्याचा विस्तार केला होता. आज, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्याला ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा असे जागतिक स्तरावर कार्य करणे आवश्यक आहे.”
बैठकीत आगामी २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच, जिल्हा कार्यकारणी, अहिल्यानगर महानगर कार्यकारिणी, श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदाची निवड, कर्जत आणि पारनेर तालुका कार्यकारणी यांच्या निवडी देखील यावेळी घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला श्रीगोंदा, नगर, कर्जत, आणि पारनेर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)





