दिनांक १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेली बातमी आज पुन्हां प्रसिद्ध करण्यात येत आहे…
दिनांक १२ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
दिनांक २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान शासनाच्या “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील १०५ गावांपर्यंत न्यायाधीश, वकील सह विधि स्वयंसेवक या यंत्रणेच्या माध्यमांतून दोन फेऱ्या पूर्ण केल्या असून तिसऱ्या फेरीनंतर दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, श्रीगोंदा येथे सकाळी १०:३०वा. या भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येनार आहे.
या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.व्ही.घुगे, न्यायमूर्ती एस.जी. मेहेर येणार असून, (जिल्हाधिकारी) डॉक्टर राजेंद्र भोसले, (जिल्हा पोलीस अधीक्षक) मनोज पाटील, (जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी) राजेंद्र क्षिरसागर सह तालुका व जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख न्यायाधीश एस.व्ही.येरलागड्डा व मा. रेवती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

कृषी सह उद्योग क्षेत्रात झालेली तंत्रज्ञानाची प्रगती व शासकीय कार्यालयातील विविध योजनांची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने जागेवरच निर्णय घेण्याची प्रक्रिया या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा मानस आहे. या ठिकाणीच अर्ज दाखल करून, त्यांच्या अडचणींचा निपटारा करत, त्या योजनेचा लाभ लगेच मिळवून देण्याच्या हेतुने नमूद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये पंचायत समितीच्या सर्व विभागांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत, तहसील कार्यालय, कृषी खाते, वन खाते, पोलीस यंत्रणेचाही स्टॉल येथे लावण्यात येणार असून, बदल व सुधारणा झालेल्या सूचनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने राहुरी कृषी विद्यापीठ व बारामती कृषी संशोधन केंद्राचे स्टॉल येथे लावण्यात येणार आहेत. एसटी महा मंडळामार्फत ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे स्मार्ट कार्डही या यठिकाणी स्टॉल मार्फत देण्यात येणार आहे. महिला आणि बालकल्याणच्या माध्यमांतून कोरोना आपत्तीत आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या पाल्यांना शासनामार्फत देण्यात येणारी मदत याठिकाणी देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना देण्यात येणारे गॅस कनेक्शन, घरकुल संदर्भात माहिती आणि त्याचे फॉर्म भरून देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना वैद्यकीय सल्ल्याने तपासणी करून, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
याच बरोबर श्रीगोंदा न्यायालयाचाही एक स्टॉल याठिकाणी ठेवण्यात येणार असून, त्या माध्यमांतून दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय, महिला यांना विधी साक्षर करण्याबाबत माहिती येथे मिळणार आहे.

याचबरोबर प्लास्टिकच्या बॉटल पासून इंधन बनवण्याची प्रात्यक्षिक यावेळी पहावयास मिळेल. तहसीलच्या माध्यमांतून देण्यात येणाऱ्या सातबाराच्या नोंदी संगणकीय पद्धतीने तात्काळ देण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल, रेशन कार्ड संदर्भातील प्रश्न मिटवले जातील.

तालुक्यातील विविध प्रशासकीय यंत्रणा अधिकाऱ्यांच्या मार्फत सुमारे तीस स्टॉल नमूद मेळाव्यासाठी निश्चित झाले असून, एकाच छताखाली सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख साहेब व ad सदाशिव कापसे (अध्यक्ष वकील संघ, श्रीगोंदा) यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. Information and benefits of various government schemes in Shrigonda under one roof.
या एक दिवसीय शिबिरासाठी बहुसंख्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, तरुणांनी सहभागी घेऊन लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा न्यायाधीश शेख यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
