दिनांक २८ जुन २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील मुंगसगाव येथे एका तरुणाच्या लग्नात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवसांपूर्वी एका मंदिरात साध्या पद्धतीने या तरुणाचे लग्न झाले होते. नवरी आणि नवरदेव यांच्या कुटुंबांनी या लग्नाची वकीलामार्फत नोटरी करून घेण्याचे ठरवले होते.
आज दुपारी, नवविवाहित तरुणी, तिची आई, नवरदेव आणि त्यांचे कुटुंब श्रीगोंद्यात आले. नोटरी करण्यासाठी मुलाचे वडील आणि मुलगा वकीलाच्या कार्यालयात गेले असता, नवरी आणि तिची आई “आम्ही जरा जाऊन येतो” असे सांगून बाहेर पडल्या. काही वेळानंतर त्या दोघी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात जाऊन बसल्या.
संशय आल्यामुळे मुलाची आई गाडीजवळ गेली असता गाडी सुरु झाली आणि नवरी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. मुलाच्या आईने प्रसंगावधान राखून तिच्या केसाला धरून गाडीबाहेर ओढले. यावेळी गाडीत बसलेल्या मुलीच्या आईने आपल्या बॅगेतून मिरची पावडर काढून मुलाच्या आईच्या डोळ्यात टाकली. आरडाओरडा झाल्यामुळे जमलेल्या लोकांनी गाडीतील दोन जणांना पकडले, तर एकजण पळून गेला.
साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाल्याने मुलाच्या घरच्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलाच्या आईने प्रसंगावधान राखल्यामुळे नवरीचा पळून जाण्याचा डाव फसला. मुलीच्या आईला दोन लाख पन्नास हजार रुपये देण्यात आले होते.
पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला नेले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मुलीकडे वेगवेगळ्या नावाचे दहा आधारकार्ड सापडले असून ती यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचा संशय आहे. याआधी तिचे पाच ते सहा लग्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)




