दिनांक ८ ऑगस्ट २०२४, काष्टी, श्रीगोंदा:
दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास काष्टी ता. श्रीगोंदा येथील दांगटवस्तीवर घरफोडीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला.
दिनेश सुभाष दांगट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या कुटुंबासह घरात झोपले असताना किचनचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने त्यांचा भाऊ सचिन याने त्यांना जागे केले. त्यांनी पाहिले असता, एक अनोळखी चोरटा किचनमध्ये सामानाची उचकापाचक करताना दिसला. त्यांनी त्यास आव्हान दिले असता, चोरटा पळून गेला. त्यांचा पाठलाग करताना एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार रस्त्यावर उभी दिसली.
दांगटवस्तीवरील इतर रहिवाशांनी देखील या प्रकाराची दखल घेतली. मिठु राजाराम दांगट यांनी ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना कळविले. श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी आपली नावे अविनाश नानासाहेब मंडलीक (वय २७), सुजीत वसंत लाड (वय २३) आणि तुकाराम दिगांबर लाड (वय २३), सर्व राहणार पाटेगाव ता. कर्जत जि. अहमदनगर असल्याचे सांगितले.
पोलिसांनी या तीन संशयितांना स्विफ्ट कारसह पोलीस स्टेशनला आणले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी दिनेश दांगट यांनी या प्रकाराची तक्रार केली असून, चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे ३०३(२) व ६२ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्रोत:(फिर्याद)




