कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग १४).

कळा, उत्तम बंडू तुपे..

” सांज झाली हुती . रानवारं भिरभिरत हुतं . वाऱ्याच्या थंडगार झुळका अंगाला झोंबत हुत्या ; तरी अंगला घाम फुटला हुता . शिवच्या अल्याड नागजी भेटला . वाईच धीर आल्यागत झालं . त्याच्याजवळ वाईच थांबलो . तंबखू खाल्ली . “ नागू ! आमुश कवा हाय रं ? ” “ उदया . का ? ” ‘ काय न्हाय ; आसंच इचारलं . ” “ आरं , ही कु – हाड – टिकाव घेवून ह्या यळला कुठं निघालंय ? ‘

https://bit.ly/bspmycityshrigonda

” दहीवडीला . शेवटून आण चाललोय . हिरीची कामं हायती ; मुळ्या तोडायच्यात . ” “ आरं , मंग आमुश का इचारली ? मला फसवू नगस ; तू जा ; पर जिवाला जप . लेकराबाळाचा धनी हाय तू संतू . ‘ ” नागू ! त्यांच्यासाठी तर हे पाप करतोय . ” “ जा , काम पत्ते हुणार . तसी काय येळ आली तर हाक मार . मी हाय हिथं . उठलो . तावानं शिवला आलो . हिंगणाच्या झाडाजवळ गेलो . देवाकडं तोंड करून हात जोडलं ; येताळाचं नाव घिटलं . एका घावात हिंगणाचं झाड तोडलं . तोडलेलं झाड हातांत घिटलं .

कुन्हाड – टिकाव उचलला . माघ बघायचं नव्हतं . पुढं तोंड करून निघालो . बामनाच्या शेताच्या बांधावर आलो . पांढरी धोट रुईची दोन झाडं . रुई बाईचं रूप घेती ; ऐकलं हुतं . काळीज उरात धडपडलं . धडा करून टिकाव उचलला . डोळं सावध ठेवून दोन घाव टाकलं . तिसरा घाव टाकणार ; फुऽस करून हातभर उभा राहिला . चटक्यानं माघं सरलो . पडलेली कुन्हाड उचलली ; जिवावर उदार झालो हुतो . भीती मरून गेली . ह्या दोन तळाता येवडी फणा काढून डुलत हुता . देवाचं , आपल्या येताळाचं नाव घिटलं .

फणा बघून तडाखा दिला . फणा पडला तसा चेचला . मंग सावकाश रुईचं झाड खांदून काढलं . मारलेला नाग हिंगणाच्या झाडावर टाकला ; रुईचं झाड त्याच्यावर टाकून ओढत निघालो . जीव काय थिर नव्हता . एका विघ्नातनं वाचलो हुतो . मनात एक एक उभं रहात हुतं ; तरी पुढं बघून चाललो हुतो . अंगातली सगळी कापडं बगलंत मारली हुती . काळमीट काळोख पडलं हुतं . पायाखालची वाट दिकून नीट दिसत नव्हती . कैक वक्ताला या वाटनं गेलो हुतो . आज मातर वाट नई असल्यागत वाटत हुती .

वाटवर बसलेल्या चिमण्या माझ्याच चाहुली उडून जात हुत्या . चिमण्या उडाल्या की धपका घातल्यागत हुर्द गप हुयाचं . धरून उभं केल्यागत जागच्या जागी उभा राह्याचो ; उसावर आलेली कोल्ही ; पुढ्यांतनं पळायची . हाजार विघ्नं हाजार रूप घेवून मागं लागल्यागत वाटलं हुतं . हितं खविस हाय .कुत्रं , मांजर , ससा ह्याच्या रूपानं पुढं उभा रहातो ; आडवा येतो . माणसाला भूल पाडून घेवून जातो . तिथली हाडळ वाटंवर येवून बसती . ह्या आसल्या भुताच्या गोष्टी ऐकलेल्या . त्या जागी आलं की काळजाचं पाणी हुयाचं . मरण घेवून चाललो हुतो .

काय हुतंय ; कुठं जातोय ; काय कळत नव्हतं . वाटंवरची झाडं दिसत नव्हती ; भवतीची पिकं काळोखानं गिळल्यागत झालेली . कुठल्या व्हलमानं जायाचं ? हिंगण , रुईची झाडं वढत फिरत हुतो . एका जागी उभा राह्यलो . येताळाचं सुमराण केलं . तंबाखू काढून खाल्ली . तवा लांब लांब दिवा दिसला . दिव्याची दिशा धरून निघालो . सणगारांच्या हिरीवर आलो तवा ध्यानात आलं ; आपली वाट चुकवली . दिसतोय दिवा तो नारायणाच्या वस्तीवरचा हाय . जिवात जीव आला . जोरानं पाय उचलून निघालो . तवा कुठं जेवण यळ टळल्यावर नारायणाच्या वस्तीला आलो . नारायण आन् पोतराज वाट बघत बसलं हुतं . ” उघडाच हुतो . जिता – जागता भूत झालो हुतो . मला आलेलं बघून पोतराज उठला . हातातला कोंबडा तोडून टाकला . दोन लिंबं कापून टाकली . मंतरलेलं पाणी पियाला दिलं . पोतराज मोठ्यानं आरडला . कासरं – दोन कासरं पळत गेला . “ ह्याट , ह्याट , हाकाल ; जा . करत पळाला हुता . तवा वाटलं – खरंच आपल्या मागनं विघ्नाचा मेळा येत आसंल . त्यानंच आपल्याला भूल पाडून फिरवलं आसंल . आपली वाट चुकवली आसंल .

पोतराजानं विघ्नं घालवली हे बरं केलं . कु – हाड – टिकाव खाली टाकलं . हातातली झाडं सोडून वाईच तुटाक बसलो . सगळीकडं थिर नजर ठेवून बघितलं . आपून आपल्या ठिकाणाला पोच झालो का आणखी कुठं ? काय नेम ह्या भुतांचा ? तीच ह्या माणसाचं रूप घेवून आली आसली तर- माणसांनी आतापावतर फसवलंय ; आता भुतंबी फसवायची . कावराबावरा हुनशानं बघत हुतो . नारायण मालक पुढे येवून बसला . “ ये संतू ; संऽतू ! आरं , भानावर आलाय नव्ह ? ” ” मला काय झालंय ? तवा मी चांगला सुधीत हाय ; आता घरी जावं का नगं ह्याचा इचार करतुया मी . ‘ आता घरी जावून तरी झोपनारच की . “ तर काय करणार हाय ; भुका लागलेल्या . ” “ आरं , मंग भाकरी खावून हिथंच पड की . ” ” नगं . घरी वाट बघत असतेली . मी हितं सुखात झोप घीन ; पर घराची झोप उडली आसंल . ‘

” आरं , मंग आसाच जातू व्हय ? कापडं तरी घाल की ! आजून तसाच उघडा ” बसलाय ते . ‘ ” कापडं घालता घालता पुढं नजर टाकली . तोडून टाकलेला कोंबडा आणून पोतराज सोलत बसला हुता . कोंबड्याची काळी – खर्डी पाखं उपसून टाकत हुता . त्याचं हात चलाखीनं हालत हुतं . कोंबडा सोलता सोलता एक डोळा माझ्यावर हुता . ” संतू ! आता कोंबडा जेवून जा . ” तुझा कोंबडा कवा शिजायचा आता ? ” “ हे बघ झालं . त्याला किसता उशीर लागतो ? ” बोलूस्तवर पोतराजानं कोंबडा सोलून नीट केला . जाळ करून , जाळावर धरूनव्हळून बरक्या पखांची लव जाळली . खरपूस वास आला . तवा भूक आणखी भडकली . पोतराजानं कु – हाडीनंच कोंबडा शिंदला ; चिरला . तीन दगडांची चूल आडोशाला मांडून कोंबडा शिजायला टाकला . कोंबड्याचं कडान कडत हुतं . मटनाचा खमंग वास सुटला हुता . पोतराज कडणाखाली जाळ घालत हुता . जाळाचा धडाका . घटकंत कडान झालं . बसलो जेवायला . रबरबीत कोंबड्याचं मटान ; कोंबडाच दांडगा हुता . तिघांची बेजमी झाली . पोटभर मटान खावून उठलो . हातात कुन्हाड घेतली . झपाट्यानं घराची वाट धरून निघालो . वाटनं एकटाच चाललो हुतो . आपल्याच अंगावरनं तोडून टाकलेला कोंबडा आपूनच खाल्ला हुता . भुतं हुती कुठं ? भुतं , विघ्नं आसती तर त्यांनी कोंबडा खाऊ दिला नसता . कसली भुतं नं खेतं ? आपल्या मनाचं भूत मनालाच खातं . हाय काय दुसरं ? दारात पाय टाकला तर घर जागंच हुतं . लोचीनं टुकडा उतरून टाकल्यावर घरात गेलो . ” लोचे , रुपयं दोनशे कमावलं बघ . ” “ पेटली तसली कमाय ! आपल्या हातानं जिवाला फास लावून घियाला कुणी सांगिटलं हुतं ? ” ” काय हुतंय गं जिवाला ? ह्यो आत्मा कुणासाठी कामी लागला तर काय वावगं हुणार न्हाय . ” तुमी गेला . पोरासनी सगळं कळलं तर पोरं रडायला लागली . ‘ “ लोचे ! तुझं कुंकू खरं बळकट हाय बघ ; म्हणताणा वाचलू . ” काय झालं वं ? ” ” काय झालं न्हाय मला .

https://bit.ly/bspmycityshrigonda

पांढरी रुई खांदायला लागलो . ह्या पोटरीगत “” अस्सल नाग हातभर उभा राह्यला . म्हणलं आसंबी मरायचं आन् तसंबी . तुंब्याकडनं उलटी कु – हाड धरून फणीवर दिला दणका. ” त्यानं फोडलं आसतं तर काय बघितलं आसतं आमी ? आसली जोखमीची कामं कशाला करायची ? ” “ आता पडू देती का ? ” “ पडा ; उदया आणखी कामाला जायाचंय . ‘ अंथुरणावर पडलो हुतो . मंगल डोळं पुसत हुती . दुर्व्या हुंदकं देत हुता . घर उचंबळून आलं हुतं . बायकू आन् पोरं ; जीव चिरून जिवाला जोडावीती वाटलं..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply