कळा, उत्तम बंडू तुपे(भाग १७).

कळा, उत्तम बंडू तुपे..

उसाच्या तोडी लागल्या हुत्या . कमाईचं दिवस . लोची घरात पडून हुती . दुर्व्यानं मला सोबत केलेली . खेळून खायाचं ; शाळा शिकायची सोडून दुर्व्या कष्ट उचलत हुता . उसाच्या मोळ्या वाहून टरकात भरत हुता . शाळा सोडून त्यानं कष्टाला जुपून घेटलं हुतं . मनाला चिमटीत धरून सगळं बघत हुतो . हात मोडल्यागत झालं हुतं . मन सारखं घराकडं धावायचं . लोची एकटीच घरात .

https://bit.ly/bspmycityshrigonda

वाळलेल्या गव्हाच्या दान्यागत तिची कात खर्बुजागत . लोची सुख मारून गेली हुती . तिच्याकडं बघून काळजाचं टुकडं हुत हुतं . दवा – दारू करून बी काय गुण दिसत नव्हता . घरात टुकड्या – पाण्याचं बघायला दुसरं कोण हुतं ? सात जलमाच्या दावेदारागत गाव नाकात काटकं घालत हुतं . कुणाच्या तोंडाला झाकणं घालायला येतंय ? मारणाराचं हात धरता येत्यात ; पर बोलणाराचं तोंड कुणी धरायचं ? सवं सांजला घराकडं येत हुतो . लोची ओढ्याच्या काठावर बाभळीच्या वाळलेल्या झाडाजवळ उभी हुती . खोडावरनं हात फिरवत हुती ; एकटी एकटी दिसत हुती ; तरी बोलत हुती- “ माझी मंगल ! माझी हारणी चल घरी ; कुठं गेली हुतीस गं माझ्या पाडसा ? त्या भाड्यानं तुला पळवलं व्हय . थांब , त्या रक्ताड्याचा मुडदाच पाडती . चल . ” लोची बोलता बोलता गप झाली ; बिथरून उभी राहिली . “ रांड , आमच्या तोंडाला कोळसा चोळून गेलीसा . चल चालती हो . ह्या दाराला येऊ नगंस .

‘ काय वळखायचं ते वळखलं . हुती – नव्हती तेवढी उभारी कोसळून पडली . जित्यापनी रंडवा झाल्यागत वाटायला लागलं . लोची नगीन नागवी उभी हुती . कुणाला तिचं अंग दिसलं नसल ; ते उघडं पडलं हुतं . पायांत खोडा घातल्यागत पुढं पुढं गेलो . “ लोचे ! हे काय करायला लागली ? ” ” कोण , कोण तू चांडाळा , माझ्या लेकीला फसवून नेलं ; कुठाय माझी मंगल मला दाव . दुर्व्या नुसता बघत हुता . त्याच्या पुढ्यात त्याची आई उभी हुती . ” काय झालंय माझ्या आईला ? आ – ई ; आऽयऽवं . ” आता कुणाला समजावायचं ? दुर्व्याला बघावं ; तर लोची पळून जाईल . लोचीचं तोंड चालूच हुतं . तिला हळूच चुचकारायचं मनानं घिटलं . पुढं जाऊन लोचीच्या हाताला धरलं . ” लोचे ! घरी चल . ” “ घर ! कुणाचं घर ? व्हय रं किरड्या ; माझ्या पोरीला घरात घातली ; आता मलाबी चल म्हणतो काय ? तुला काय लाजलज्जा हाय काय ? ” ” लोचे चल . मंगल घरी आलीय . ” “ मंगल घरी आलीय ? माझं पाडस आलं व्हय ? ” ” व्हय ; हे काय आताच आलीय . ” लोची भानावर आली .

तरातरा घराकडं निघाली . घरात येऊन दिवा लावला . बापय आसून बायगत चूल पेटवली . मन कशात लागत नव्हतं . नजर सारखी लोचीवर . लोचीनं धडप्याच्या चिंध्या केल्या आन् म्हनली- “ उदया माझ्या मंगलीचं लगीन हाय . मंडवळ्या – बासींग बांधायची हायंत . नवरा हुणारा कवा येणार ? ” ” येणार हाय . तू उगी बस बरं . ” ” मंगल कुठाय ? तिला लुगडं पायजी . नवी इरकल . ही ; ही नेसवा तिला . ‘ लोचीनं धडपं डोळ्यांपुढं धरलं हुतं . धडपं टाकून लोची पार माझ्याजवळ आली . पिठाचं गाडगं धरून आपटलं . पीठ भुईवर पसरलं . रागानं उठलो . लोचीला धरून हेबाळली . जळकं लाकूड फेकल्यागत फेकली . “ आयला तुझ्या ; गप बस की . ‘ लोची बिथरली . पिसाळल्या कुत्र्यागत अंगावर धावली . कुठली ताकद”” आली हुती कुणाला ठावं . लोचीनं गचूरं धरलं ; तवा दुर्व्या मोठ्यानं आरडला . शेजारी धावलं . त्यांनी तिच्या मिठीतनं सोडवून घिटलं . ” लेकीच्या लग्नाला हाळद आणलीय ; तर ह्यो चुलीत घालतो . ” लोची भानात बोलली . शेजाऱ्यांनी तिचा कल ओळखून तिचा कल धरला . ” संतू ! तुला कसं कळंना . हाळद जाळतूस ? लोच्या ! तुझ्या लेकीची हाळद हाय तर भरून ठेव . उदया हाळद हाय नव्हं मंगलची ? ” “ तर , तर . उदया हाळद ? नाय , नाय . मंगलला पळवून नेली ; तुमी पळवून नेली . तिची आब्रू घिटली . आता माझी घियाला आलाय . घ्या ; घ्या माझी अब्रू घ्या . ” ” लोचीनं लुगडं फेडलं . पसरली भुईवर ; टांगड्या फाकून पडली . किटलेल्या कापडागत मन फाटलं . नाइलाजानं उठलो .

मैतीवर घाटल्यागत तिच्या अंगावर लुगडं टाकलं . गेलेली आब्रू झाकत हुतो . तरी राहिलेली आब्रू जात हुती . डोळं फोडून घ्यावं वाटत हुतं . तरी उघड्या डोळ्यानं बघत हुतो . भवतीनं शेजारी बोलत हुतं – “ संतू ! तुझ्या घराला कुणी करणी केली आसंल ; हा चेटकी – पितऱ्याचा खेळ ; तुझ्या घराचा खेळ चाललाय . कुणी जाणता देवरुशी बघ . ” बाबानू ! कशाची चेटकं – पितर ? आपल्या करमाचा भोग भोगतुय . ” हुर्द कुपाटीत पडल्यागत झालेलं . जवळ तर दमडी नव्हती . कष्ट उचलायलाबी मन धजत नव्हतं . तसच मनाला मोडून पुढं जात हुतो . कष्टात मन घालत हुतो . जगायपुरती कमाई करून जगत हुतो . नारायण चव्हाणानं कोर्टात दावा लावलेला . त्यालाबी तोंड देत हुतो . कायदा पैक्याच्या बाजूनं झुकला हुता . पोरीचा तपास काय लागत नव्हता . फौजदारानं धारेवर धरलेलं . धाही दिशा फाटल्यागत झालेल्या . त्यात कायबी सुचत नव्हतं . ह्या उसाभरीत उसाच्या तोडी सरल्या . रानवडी जुंधळ्याच्या काढण्या मोडण्या लागल्या . काम लागलं तसं काढणी – मोढणी करत हुतो . कुणाची कणसं बडवून देत हुतो . दुर्व्याला कष्ट सोसत नव्हतं . तरी पोरगं कष्टाला टक्कर देत हुतं . दिवसभर राबून सांजला मढ्यागत पडत हुतं .

थंड मी म्हणतेली ! अंगावर नीट पांघरूनबी नव्हतं . कवा कवा वाळली वैरण पांघरून पडायचं ; तर कवा जाळ करून शेकत बसायचं . कशीबशी देहीत ऊब धरून ठिवायसाठी धडपड . दिवसालाबी लखवा भरल्यागत झालेलं . रानामाळांतनं फिरून लोची कवा मारुतीच्या देवळाम्होरं तर कवा भैरोबाच्या माळाला बसलेली दिसायची . घराला ती पारखी पारखी झाली हुती . घराची ओळख तिला राहिली नव्हती ; नि पाय आत , आत भुईत रुतल्यागत झालं हुतं .भानावर आसली की लोचीला घराचं ध्यान हुयाचं ; तवा कुठं ती घराची वाट धरून आलेली दिसायची . कवा कवा पयल्यागत वागायची . भाकरी , टुकडाबी करायची . तिला बघून घटकाभर मन फुलायचं . कवा कवा लोची मध्यान रातीला परागंधा हुयाची . तवा काळीज तुटून जायाचं . गेलेली लोची कवा तरी नारायण चव्हाणाच्या मळ्यात घावायची ; एकादया झुडपाखाली पडलेली . पाठणीचं वरखाडं निघालेलं दिसायचं .

” लोचे ! हे गं काय ? ” ” मास्यागत घाळसली की किरड्यानं . ‘ ” कुणी ? कोण हुता ? ” “ तू नव्हता ? व्हय , व्हय ; तू तर हुता . मोठा साळसुद रं बेन्या . ” हे आसलं ऐकून मन कापराच्या वडीगत हुयाचं . पयली लोची डोळ्यापुढं दिसायची . लोची नांदायला आली हुती त्या वक्ताला तिनं कैकाला येडं केलं हुतं . कैक तिच्या नादानं नादावलं हुतं . पर ह्या वाघणीनं कुणाचं चालू दिलं नव्हतं . कैक म्हणायची , ” संतू ! ही आग तुझं घर जाळून टाकील ; तुझ्याजवळ सोसार करणार न्हाय . ” त्या लोचीनं माझं घर उजळलं हुतं . दैवानं घात केला ; हे दिवस आलं . हे सगळं बघण्यापेक्षा मरण आलं तर बरं ; वाटत हुतं . भाजलेल्या गव्हागत लोचीची देही दिसत हुती . हे सगळं बघूनी गरगरत हुतं ; तरी बघत हुतो . फाटलेल्या मनाला संदत हुतो ; तरी आणखी फाळी पडत हुत्या . लोची अख्ख्या घराची आय हुती . जिवाभावाची सोबतीण हुती .

मायेची बहीण , युगायुगाची माऊली ; नि घडीची बायको हुती . तिच्या ठाई जडलेला जीव तुटत नव्हता . कसीबी आसली तरी लोची माझी हुती . लोक म्हणत ‘ संतू ! लोचीला पंढरपुरात सोडून ये . गांडगापुरात नेहून सोड ‘ ; पर जडलेला जीव तुटत नव्हता . लेकरागत तिनं माझं सगळं केलं हुतं . आता तिचं मलाबी कराय पायजी . तिचं चुकलं वाकलं पचवून तिला जपायला पायजी . लोची कसंबी आसली तरी ती आदूगर माझी माय माऊली हाय ; हे कसं इसरू ? लोचीनं माझ्या सोबतीत कस्ता काढल्या . आता पावतर धीर दिला . सगळ्या गोष्टी धिरानं करायला भाग पाडलं . दोन राती कुठं गेलो तर लोची घार हुयाची . तान्ह्या गायगत वाट बघत बसायची . लांब येताना दिसलो की दुर्व्या -मंगलला सांगायची – ‘ आला , माझा वाघ आला . तुमचा बा आला बघा . ‘ बारा वर्षाचं तप करून आल्यागत लोची बघायची . लई काळजी करायची . कुठं शिवच्या बाहेर कामाला निघालो की तिचं मागं ठुमणं- ‘ सांजचं लवकर या.रात करू नगसा . लोचीनं आता घर वर्जील्यागत झालंय . कुठं कुठं फिरती ; कुठं कुठं जाती ; काय कळत न्हाय . कवा , कवा तिचा रागबी येतो . मयाबी येतीया . कुणी दिला पालकुटागत झालीय ; उडून जायाचं भ्या वाटतंय . येडी का बागडी ! डोळ्याला टुकडा तर खात आसंल . वक्ताला नसंलबी . हरणीगत सडसडीत लोची . दिसली की बरं वाटतं . डोळ्याआड झाली की जीव कावराबावरा हुतो . गावबी आता हाळळतंय . कुणालाबी लोची दिसली तर गावातलं कुणीबी तिला गावात आणतं .

आया – बाया तिला बघत्यांत ; उघड – वाघडं झाकत्यांतबी . सकाळचं कामाला निघालो हुतो . लोची दारातल्या लिंबाखाली बसली हुती . धोंडी कारभारी गावातनं येत हुता . त्याला बघून अंगाला घाम फुटला . धरून वाकल्यागत मान कावळीच्या कवळ्या वेलागत वाकली . पाय जागच्या जागी थोपलं . धोंडी कारभारी जवळ आला . त्यानं पाठणीवर हात ठिवला . बापानं जवळ घिटल्यागत जवळ घिटलं . म्हातारा धोंडी . त्याच्या तोंडाकडं मान उचलून बघिटलं . खडकाला पाझर फुटल्यागत धोंडी कारभाऱ्याचं डोळं टिबकत हुतं . ” संतू ! हे आसं हुयाला नगं हुतं . तुझं घर बुडतंय ; आमाला काय बरं वाटतं म्हणतू ? आऽरं , आमीबी माणसं हाय . धोंडी कारभारी बोलत हुता . हुर्द फाडून त्यात ह्या म्हाताऱ्याला बसवावं वाटत हुतं . ” संतू ! मंगलचा तपास करायला पायजी . मंगल आली तर लोची सुधरंल . तिला माणसांत आणाय पायजी . ” ” कुठं तपास घियाचा कारभारी ? माझं तर मन उडून गेलंय . जवळ दमडी ” ” न्हाय . ” ” मी सांगतू नारायण चव्हाणाला ; त्यानं ऐकलं तर ठीक ; न्हायतर कोर्टाच्या वतीनं वारंट काढू . सरकार संपतला मातीतनं हुडकून आणल . ” “ कारभारी ! काय खरं न्हाय . चव्हाणानं माझ्यावर फिराद केलीय . दावा लावलाय त्यानं माझ्यावर . फौजदारानं मलाच दोशी ठरवलंय . लेकीची कमाय खाता – म्हणतू फौजदार . ” धोंडी कारभारी बोलत हुता ; दुर्व्या दूर राहून बघत हुता . एकटाच धावल्यागत उन्हात तापत हुता . बिगर आईबापाच्या गत एकटा ; एकटा दिसत हुता . त्याला बघून आतडं तुटत हुतं .

https://bit.ly/bspmycityshrigonda

“ दुर्व्या ! ये . ये कारभारी आल्यात . आपलं कारभारी गावाचं कारभारी हायतं . ‘ दुर्व्या उपऱ्यागत हळूहळू आला . त्याची नजर लोचीवर हुती . लोची भानावर हुती . तीबी उठली . दुर्व्याजवळ आली . त्याच्या तोंडावरून हात फिरवला . आमच्याकडं बघिटलं . तिचं डोळं गरीब दिसत हुतं . पापण्या लुकूलुकू हालत हुत्या . लोची हासत हुती . कारभाऱ्याला बघून तिनं पदर सावरला…

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading