कळा,उत्तम बंडू तुपे..
” लोचना ! काय झालंय गं हे ? ” ” कारभारी ! काय झालं न्हाय ; पर लोक मला येडी म्हणत्यात . ” ” लोकं येडी हायती . “ लोकांचं काय ? तुमाला मी कशी दिसती ? ” ” शाणी दिसती बघ ; चल येती का माझ्या वस्तीला ? ” ” माझी मंगल हाय तिथं ? ” ” हाय ; तुझी मंगल हाय माझ्या मळ्यात ; कामाला ठेवलीय . ‘ ” खोटं बोलताय ; तिला कुणी पळवून नेलीय . ‘ “ नेली तर नेवदे . आपला दुर्व्या हाय ; तुझा लेक हाय नव्हं दुर्व्या ? ” ” कोण दुर्व्या ? दुर्व्या माझा नव्हं बया ; आसंल कुणाचा . ” चल ; येती नव्हं ? ” ” येती ; चला . बोलता बोलता लोची चालायला लागली . बघता बघता लांब गेली .

धोंडी कारभाऱ्याच्या मळ्याची वाट धरून निघाली . ‘ आय गेली . ” दुर्व्यानं हंबरडा फोडला . धोंडी कारभाऱ्यानं दुर्व्याला जवळ घिटलं . ” संतू ! मंगली आली तर लोचनाबी बरी सुधरल . पोरीचा तपास घे . मी रुपयं देतो . ” “ पुन्हा कशानं फेडू तुमचं रुपयं ? ‘ ” आरं , मी मागणार न्हाय ; तुझ्या ध्यानाला आलं तर कवाबी दे ; न्हायतर नग देऊ ; पर ह्यो पखरडा बघवत न्हाय . ‘ “ कारभारी ! मंगलचा तपास ह्या दुनियेत कुठं लागायचा ? कुठं बघायचं ? कवा आपला मुलूख सोडून गेलो न्हाय . बाहेरची माहिती न्हाय . पुढं गेलो तर माघ दुर्व्या – लोचीला कोण बघायचं ? ” “ हाय ; आमी हाय . त्यांचा घोर करू नगंस . ” कारभारी जाणारा एका वाटनं गेला ; तर बघनाराच्या पुढं धा वाटा .
आली तर इल बापडी . तिला आमची माया रायली न्हाय . तिच्या पायात घर बुडलं . आता काय ? आली सारखी ; न्हाय आली सारखी . “ संतू ! आसं कसं ? निदान लोचीसाठी तरी … ” कारभारी ! काय करू मी ? मला कायबी सुचना झालंय . लोचीचं हालआपीष्टा बघवत न्हायत्या . “धोंडी कारभाऱ्यासंगट बोलत हुतो . आत सुरुंग पेटला हुता . काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या हुत्या . आतनं पार जळून करपून गेलो हुतो . राखखालच्या कोळशावानी जगत हुतो . भूक – तान हारपून गेली हुती . मंगलीला जल्म देवून पाप केल्यागत वाटत हुतं . झाली त्या वक्ताला मेली आसती तर चार राती रडून गप तरी बसता आलं आसतं . कुणाचा ठेपूर राह्यला नसता . जित्यापनी मरण बघायची यळं आली हुती ; ते बघत हुतो . आपली मयत आपल्या हातानं जाळत व्हळत फिरत हुतो .
लोची लांब लांब गेली हुती . आखं गाव भुतागत दिसत हुतं . धोंडी कारभारी हातांत रुपयं घेऊन उभा हुता . नोटाला धार आल्यागत दिसत हुतं . नोटा डोळ्यांत भरून डोळ्याची बुभळं पोडत्यात वाटलं . माणसाची जात गोड बोलून काळीज खाती ; हे ठावं हुतं . आता धोंडी कारभारी रुपयं देतोय ते वसूल करायचीबी त्याच्या अंगात खुबी हाय . पुढ्यात सूळ उभा केल्यागत धोंडी कारभाऱ्याच्या हातातल्या नोटा दिसत हुत्या . मन आतनं पोखरून गेलं हुतं . ” कारभारी ! मला नड लागंल तवा मागीन . आता मला नगं . उसाची सुगी लागलीय ; काम करतोय मी . ” उसाच्या तोडी लागलेल्या . ऊस तोडीनं जीव अंबून जात हुता . उसाच्या मोळ्या वाहून दुर्व्या मरून पडल्यागत निजत हुता . दुर्व्या निजला की दारात बसायचो . ह्या वाटनं लोची येईल ; पयल्यागत हाक मारंल त्या वाटनं मंगल येईल ; गळ्यात पडून रडंल ; वाटायचं . कुठं गावात कुत्रं भुंकलं तरी मनाला उभारी वाटायची . लांब कुठं कुणाची पाऊलं वाजली तरी खिनभर तिकडं नजर जायाची . खोप्यात बसून उडून गेलेल्या पिलाची वाट बघत बसलेल्या पाखरागत वाट बघत हुतो . डोळ्याला झोपबी येत नव्हती . एक डोळा दुर्व्यावर ठेवून रात काढत हुतो . कवा मध्यांन रात टळल्यावर लोची लिंबखाली दिसली . तिची बडबड चालूच हुती . तिला बघून उर हालका झाला . नेणत्या बाळानं आयला मिठी मारावी ; तसा पळाला . लोचीला मिठी मारली . “ लोचा ! माझे हरणे ! चल , चल . गार वारं सुटलंय .
कुठं फिरंत हुती ? ” “ मी फिरायला काय मोकळी हाय व्हय . “ लोचा ! लुगडं कुठं टाकलं ? ” ‘ मंगल नेसलीय ; तिचं लगीन हाय . ” ‘ बरं केलं . ” घरात ” ” लोचीला धरून घरात नेलं . धोतराचा धडका ; धडपा नेसवला . पाण्याचा तांब्या भरून दिला . भाजी – भाकरी हुती ती पुढ्यात मांडली . भुक्या पोटी तिनंबी चार घास पोटात घातलं ; तवा कुठं माझं पोट भरल्यागत झालं . वाढलेली सगळी भाकरी खावून लोची मागं सरली ; तवा कोंबड्यानं बांग दिली . तसाच उठलो . बाहेर आलो . दार बंद करून बाहेरनं कडी घातली . तडा तडा पाय उचलून गावदरीच्या वाळल्या झाडाजवळ आलो . लोचीनं त्या झाडाला लुगडं गुंडाळलं हुतं . तरवाडांची फुलंबी दिसत हुती . झाडाचं लुगडं काढून घिटलं . तकाट घराकडं पळालो . घराचं दार उघडलं . बघतोय तर लोची दुर्व्याजवळ निजली हुती . तिला तसंच निजू दिलं . जळणाची काटकं चुलीत घालून चूल पेटवली . भाकरी थापस्तवर दिवस उगला ; तवा लोची उठली . ” माझं लुगडं कुठाय ? ” “ ते बघ पडलंय ; लुगडं धुयाला पायजी लोचे . ‘ ” मंग धुते की . ‘ ” आंघोळी करती का ? ” “ आंघुळी व्हय . हा हा करते . माझा उपास हाय ; वार करतीय मी देवाचं . ‘ धडाधडा जाळ घातला . घमेलंभर पाणी तापवलं . भानावर हाय तवर अंघोळी घालायची ; चटक्यानं पाणी तापवलं . दारात मांडलं ; लोचीला न्हाणीत घातली .

खसाखसा चोळून – घासून अंगाचा मळ काढला . घरातलं धडकं लुगडं ; ठेवणीचं कवा तरी सणासुदीला घालायचं तेचं नेसवलं . ठेवणीला ठेवून आता कोण नेसणार नव्हतं . लोचीबी चापून चोपून लुगडं नेसली ; तवा निसवलेल्या केवड्याच्या कणसागत दिसली . तिला बघून मन येडं झालं . ही कायम आसी पयल्यागत दिसावी ; वाटायला लागलं . त्या दिवसी अख्खा दिवस लोची भानावर हुती . पयल्यागत माणसाबर बोलली . केसाला न्हाणव लावून केस इचरली . भांग पाडून कुंकूबी लावलं . कामाला जावून आलो तरी लोची घरात हुती . मनात देवाला धन्य माणून हात जोडलं . घराला तेवढंच घरपण आल्यागत दिसत हुतं . शेजारच्या आया – बाया येऊन बोलत हुत्या . त्या दिवसी लोचीला कुणी बघिटलं आसतं ; तर कुणाला ती येडी वाटली नसती . सांजचा सगळा सैपाक तिनंच केला हुता . कमासनं आल्या आल्या आंघोळ केली . वल्या पडट्रणीनं गावातल्या सगळ्या देवाला पाणी घाटलं . उदकाड्या लावल्यां . गोळ्यामेळ्यानं भाकरी खाऊन दारात बसलो हुतो . लांडगा बकऱ्याच्या वासावर आल्यागत नारायण चव्हाण दारात आला . त्याला बघून टक्कूर पेटलं…
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
