कळा, उत्तम बंडू तुपे (भाग १९).

कळा, उत्तम बंडू तुपे..

” उठलो . चव्हाणाला धरून उचलला टक्कूऱ्यावर अतराळी धरून गाडीच्या चाकागत गरागरा फिरून दिला सोडून . दोन – चार कोलांट्या खावून नारायण चव्हाण उठत हुता तवर कणाकण लाथा घाटल्या . ” आयला तुझ्या ; लोकांच्या बायका का तुझ्या मळ्यातली भाजी वाटली काय रांडच्या ? येडं – मुकं तरी बघत जा ; लई खपवून घिटलंय . ” नारायण चव्हाण उठला . माशागत तळमळला . ” संत्या ! नाक गेलं ; आता शेंबडाला जपत बस . जाता जाता बोलून पळाला . त्याच्या मागं धावलो तवर शेजाऱ्यांनी धरलं . ” संतू ! येडा हू नगस . ती मोठी माणसं हायती . त्यांच्यासंग तेडं होऊन आपला निभाव लागणार न्हाय . ‘ “ सोडा . मीबी आता जिवावर उदार हाय . पर त्याचा जीव घेतो .

https://bit.ly/bspmycityshrigonda

” लांब उभी राहून सुबी हे सगळं बघत हुती . मला बघून घरात पळाली ; तवा अंगातलं रगत उसळलं . “ मोकळ्या बायका बघतूय रांडचा ; आमच्या बायका पोरी काय त्याला हुरडा वाटलाय काय ; तवा कशाबी चोळून घेतोय . ” शेजाऱ्यांनी आणून घरात घाटलं . लोची घरात बसून घराचं आडवं आढं न्याहळत हुती . दिवा जळत हुता . दिव्याचा सगळाच उजेड लोचीच्या अंगावर पडला हुता . लोची लई गोड दिसत हुती . झोप आली म्हणताना लांब अंथरूण टाकून पडलो हुतो . अंथरलेली पोत्यांची पट्टी थिटी पडत हुती . डोबळं पडलेल्या वाकळतनं थंड आत शिरून बोचकारं काढत हुती . मनात आलं ; लोचीच्या उबला जावून पडावं . पर पुन्हा ती बिथरायचं भ्या . तसाच खुडामुढा करून पडलो .

माझ्या आधी कवा लोची उठली हुती . पयल्यागत सगळं करून बसली हुती . दुर्व्याबी उठला . चेकाळला हुता . घर उठल्यागत उभं दिसत हुतं . आढ्याखाली लोची उभी हुती . हप्ता भरला हुता . हातांत पैसा आला हुता . मनात आलं ; मंगल आली तर खरंच लोची सुधरल . कसीबी आसली तरी मंगलला आपून जलम दिलाय . तिला हुडकूण आणायला पायजी . पोटचा जार हाय आपल्या .नांदायला गेलेल्या लेकीला माहेरपणाला आणायला निघाल्यागत निघालो हुतो . मंगलीला हिथं तिथं ; ह्या गावी , त्या गावी बघिटल्याच्या आवया येत हुत्या . त्या त्या गावाच्या वाटा डोळ्यापुढं दिसत हुत्या . कालच आवय आली हुती . लोची पळशीला हाय ; कुणी म्हणत हुतं म्हस्वडात हाय . तर खताळाच्या आजीनं वरकुठ्यात मंगलीला बघिटलंय आसं कानांवर येत हुतं . ही सगळी गावं पायाखालनं गेली हुती . ह्यातल्या एका तरी गावात मंगल घावणार आसं खिनभर मनाला भरोसा वाटला .

सरळ खाली तोंड करून पळशीला जायाचं ठरवलं हुतं . दिवस उगवायला निघालो हुतो . भेटलं ते माणूस इचरंत हुतं – “ संतू ! कुठं कामाला निघालाय व्हयरं ? ” ” ” न्हाय . ” मंग कुठं निघालाय ? लोची आता भानावर हाय नव्ह ; संभाळ तिला . कुठं सोडू नगस . आसंच उली उली सुधरंल बघ . वाईच तिच्या मनात मन घालावं . मंगलीचा इसर पडंल आसं वागावं . ” “ त्या पायीतर निघालोय . मंगल कुठं घावंल तिथनं घेवून येणार हाय . आता गेलीया तर जाव दे तिला . आणून काय पुजणार व्हय ? आरं , न्हेली त्या संपत्यानं त्याच उपकार माणून उग राहा . तुझ्यान तरी मंगलीचं लगीन काय झालं नसतं .

“लोकं हे आसं बोलायला लागली की हुई फोडल्यागत वाटायचं ; तसंच खाली मुंडी घालून पुढची वाट धरली . नजरंची पाखरं झालेली . मानगुटं खिळ्यावर ठिवल्यागत गरागरा फिरत हुतं . ह्या वाटला मंगल दिसावी ; वाटायचं . चालत हुतो . भोवतीची शिवारं हिणवल्यागत बघत हुती . ह्या शिवारी मंगल लावणीला आली हुती . त्या शिवारात भांगलायला येत हुती . त्या तिकडं कांदा लावला ; तिनं मका टोकणला . नजर फिरंल तिकडं पाऊल खुणागत मंगल दिसत हुती . धुरोळ्यांतल्या पाऊलखुणा वाऱ्यानं बुजून टाकल्यागत नजरआड होत हुती . मृगजळामागनं हारणं धावल्यागत धावत हुतो . चालण्याच्या नादात ओळखीची राणंबी मागं रेटल्यागत सरली हुती . नवं मुखों ; नवी राणं . दिवसबी मावळतीला गेला हुता . लांब वावराच्या अंतरावर एक पोरगी वाळल्या लाकडाला झटं घेत हुती . हुबेहुब मंगलसारखी ; नाक – नक्षातबी काय फरक नव्हता . अंगवाठाबी मंगलसारखा . मंगल हाताला लागल्याचं सुख खिनभर वाटलं . पळत गेलो .

लेकीवरची माया उधान झालेली . “ माझे लेकी ” म्हणून मिठी मारली . “ चल , तुझी आय तुझ्यासाठी येडी झालीय . बघ तिनं तुझ्यासाठी काय अवस्ता करून घेटलीय . ” बोलत हुतो . ती पोरगी मोठ्यानं आरडंत हुती – “ वाचवा ; वाचवा ” म्हणत हुती . भुई फाडून वर उगवल्यागत दोन तरणी पोरं धावली . आल्या आल्या त्यांनी तडाखं हाणायला सुरवात केली . खपला गहू झोडल्यागत झोडलं . “ नका ; मला मारू नका . माझ्या लेकिगत दिसली . माझी लेक उगळी – निगळी असीच हाय ; चुकलीय माझी लेक ; तिला हुडकत फिरतोय . ” आरडत हुतो . पाय धरत हुतो . माझं कुणी एकूण घेत नव्हतं . तडातड तडाखं बसत हुतं . ती पोरगीबी पायताण घेऊन हाणत हुती . “ भाड्यानं आवचित येवून मिठी मारली . वर आणखी लेक ‘ म्हणतो . काय लाजलज्जा हाय का ह्याला ? चांगला म्हातारा गाढव दिसतोय . ” ‘ आयची आन ; माझी लेक तुझ्यासारखी हाय . ” ‘ कुठं आसंल तिकडं बघ जा ; खड्याळीच्या आपली लेक म्हणून दुसऱ्याच्या बायकासनी मिठ्या मारतूस ? आमासनी बनवाबनवी करतो व्हय , बेन्या . शिव्यासंगट मार बसत हुता .

बाजूच्या वावरातनं एक म्हातारा काठी टेकवत येत हुता . पळत जावून त्याचं पाय धरलं . चावऱ्या कुत्र्यागत मारेकरी मागनं धावलं . त्याला म्हाताऱ्यानं दापलं .” ” ‘ गपारं ; मारू नगसा . त्याचं काय म्हणनं हाय ते ऐकूया आदी . म्हाताऱ्यानं धरून उठवलं. काठीच्या अधारानं म्हाताराबी खाली बसला . म्हाताऱ्याला सगळी हकिकत सांगितली ; तवा म्हातारा हळहळ करायला लागला . त्यानं त्या सगळ्याला शिव्या घातल्या . “ बेन्या हो ; माणसाची वाईच पारख करायला शिका . आरं ; रानात गेलेल्या गाया आपल्या वासरासाठी धावत येत्यात . तसंच माणसाचंबी हाय . मायेनं माणूस येडं व्हतंय . माया लई वंगाळ हाय . या पावण्याला बकुळी त्याच्या लेकीसारखी दिसली . आसं हुतं कवा कवा . ‘ व्हय ; पर ह्यानं लांबनं हाका माराय पायजी ? का एकदम मिठी घालायची ? बकुळी भेदरली की . आमीबी त्याला मारलं नसतं . ‘ चूक झाली माझी . मला वाटलं ; हाका मारल्या तर पळंल ; म्हणताना म्या मिठी मारली. दिवस बुडणार हुता . त्या म्हाताऱ्यानं हाताला धरलं . घरी नेलं . गेल्या गेल्या चहा करायला लावला . चहा पेल्यावर निघालो . “ पावण्या , आता रातचं कुठं जातो ? आणखी पुढं कायतरी घडायला नगं . रात झालीय आता हितंचं वस्ती कर ; सकाळचं जा . बघ घावली तुझी लेक तर . न्हायतर आपल्या बायको – पोरांत जा . सांजची भाकरी खावून तिथंच वस्तीला पडलो . सगळं अंग दुखत हुतं . अंगाचा खुळखुळा केला हुता . झोप येत नव्हती . म्हाताऱ्यानं चूल पेटवायला सांगितली .

https://bit.ly/bspmycityshrigonda

चुलीवर तवा मांडून धडप्याच्या बोळ्यानं तीच पोरगी शेकत हुती . अंगावर वळ उठलेलं . “ मामाजी पाठण हिरवी – काळी झालीय . लई मारलंय त्यांनी . ” म्हाताऱ्यानं घर भवतीनं बसलं हुतं . मारणारी पोरं चुऽक , चुऽक ‘ करत हुती . हळद कडवून लावत हुती . म्हाताऱ्याचं तोंड उघडलं हुतं . पोरं गप कान पाडून अपराधी मनानं ऐकत हुती . सगळं अंग शेकून काढलं तवा बरं वाटायला लागलं . “ निजा आता ; बास झालं . ” मागं फिरून बघितलं तर तीच पोरगी डोळ्याला पदर लावून बसली हुती . त्याच पोरांच्या डोळ्यांत ढग दाटलं हुतं . अंगातल्या कळाबी हे बघून जिरल्या हुत्या . पांघारला घोंगड दिलं हुतं . थंडी वाजत नव्हती ; तरी झोप येत नव्हती . कवा उशिरानं डोळा लागला . टिटवीगत जागा झालो ; तवा तांबडं फुटलं हुतं . उठलो ; म्हाताऱ्याला ‘ जातो ‘ ‘ थांब उजडू दे ; आंघोळ कर ; आंग दुखत आसंल , लई मारलंय बेन्यांनी तुला . त्याचा राग धरू नगस , भडक टक्कूऱ्याची हायती . तुझी लेक घावली तर ये हिकडणं . म्हणून इचारलं…

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading