कळा, उत्तम बंडू तुपे..
” व्हय , बाबा . गुळ घालीन तुझ्या तोंडात . ‘ ‘ आदी तुझी लेक शोधून काढ ; दिवस वंगाळ आलेत . ‘ ‘ बोलूस्तवर त्या पोरीनं पाणी उतरलं . पाण्याच्या वाफा निघत हुत्या . कडकडतं पाणी अंगावर घितलं . कप भरून चा घितला आन् निघालो. म्हाताऱ्याचं घर चार पावलं घालवत आलो . म्हातारा म्हनला- “ राग धरू नगस ” आमचा . ‘ न्हाय ; राग कसला धरू ? माझीच चूक झाली ; जातो . वळख ठिवा ; या कवा आमच्या गावाला आला तर . सगळ्याला इचरून निघालो . जाताना पोरगी जवळ आली . तिच्या पाठीवरणं हात फिरवला .

“ पोरी … ” पुढं बोलवत नव्हतं . हुंदक्यानं गळा दाटला हुता . निघालो . लांब वावारभर गेलो . माघ वळून बघिटलं . म्हाताऱ्याचं घर उभंच हुतं . सख्या आपताला घालवायला आल्यागत हात वर करून निरोप देत हुतं . वाटंवरची गावं ; गावांत शोध घेत हुतो . शेगा चाळल्यागत गाव ना गाव चाळत हुतो . सगळीच गाव वांझ निघत हुती . मंगलचा पत्ता कुठं लागत नव्हता . जीव नुसता तगमग , तगमग करत हुता . गाव हुडकत पळशीत उतरलो . लांबच्या नात्याचं घर हुतं त्या घरी गेलो . घरात माणसं हुती . दारातनं हाका मारल्या . एक दोघानं कासवागत मुंडकं काढून बघिटलं . खिन भरानं कोण हाय ? ‘ म्हणून आतनं इचारलं . “ मी संतू हाय . ” संतू व्हय ; ये . का आला ? ” ” मंगली घरातनं निघून गेलीय . ” कवा ? का बरंगेली ? काय झगडा झाला वाटतं घरात ? ” ” ” ” तसं काय न्हाय . ” ” ” आरं , मंग कुणी पळवून न्हेली आसंल ? ” कोण तरी बोललं . काळजाचा तुकडा तोड़न नेल्यागत वाटलं . मंगल कुणासंग पळून गेलेलं सांगायचा कमीपणा वाटायचा . त्या घरात थांबूसी वाटना .
कुणी तांब्याभर पाण्यालाबी इचरना . खाली बस ‘ म्हणालाबी त्यांची थोबाडं जड झाली हुती . लांबच्या नात्यातली हुती . त्या घरात थांबूसी वाटंना . वाटलं हुतं ; रातभर निदान मन तरी विरंगळंल . पर कसलं काय ; कोपऱ्यात खुडूक कोंबडीगत बसलेली म्हातारी बुड सरकत आली . “ संतू ! पोरगी कुणाबरं निघून गेली ? पोरगी जाऊस्तवर काय डोळ्यावर भात बांधला हुतास काय ? गरीब , दुबळा बघून न्हाय का लगीन करायचं ? “” . ” म्हातारी बोलत हुती . इचूच्या पेवात पडल्यागत वाटत हुतं . कसं चुकून ह्या दारात आलो ? बसली जागा उचलून टाकायला लागली . घोण घालून उठलो . बाहेर आलो . अंधार पडला हुता . पोटात कायबी नव्हतं . लांब तिकडं एक माणूस दिसला . त्याला इचारलं- “ पावणं ! ह्या गावात दुकान न्हाय ? ” ‘ न्हाय कशापाय ? चार दुकानं हायती .
आसंच पुढं जा ह्या बोळातनं . बोळाच्या तोंडाला दुकान हाय . अंधारातनं चाचपडत निघालो . दारात कुत्री भुकायची . तसाच पुढं गेलो . दुकान उघडंच हुतं . “ बटर हायती का दुकानदार ? ” ” हायती की ; किती पायजीती पोतंभर ? ” “ इतकी काय करायची ? ” “ मंग किती ? ” ” कसी दिली ? ” ” चार , रुपायाची चार . “ न्हाय समजलं . “ पंचीस पैशाला एक ; आत्ता समजलं का ? ” “ दया रुपयाची बटर . चार आण्याचा गूळ दया . ‘ ‘
कपाळाला धा आट्या पाडून दुकानदारानं गूळबटरं दिली . नव्यानं गावात दिसताय . ‘ ‘ व्हय ; रात झाली म्हणताना थांबलोय ; गावात चावडी हाय का तुमच्या ? ” ‘ व्हय ; हाय की. पर चावडीत ग्रामपंचायतीचं हापीस हाय. बंद झालं आसंल आता . दुकानदारासंग बोलत बोलत बटर – गूळ खात हुतो. बटरं खाऊन झाली तवा दुकानदाराला पाणी मागितलं ; तर गुरकला . “ आमच्या उपकारालाच आलाय तू . तुला पाणी दिलं पायजी . जा ; ग्रामपंचायतीच्या कुपनळावर पे जा . खेटरं खाल्ल्यागत तोंड करून उठलो. इचारत इचारत ग्रामपंचायतीच्या हापिसापुढं आलो. हापसून पाणी काढलं. पाणी खाली पडून वाहून जात हुतं . ग्रामपंचातीचा दिवा जळत हुता. इजचा दिवा . झगमगाट पडलेला . फुटक्या गाडग्याच्या बुडाचं भकल दिसलं .
तेच घिटलं ; चांगलं धुतलं . खंगळी करून त्यानं पाणी पेला. तवा कुठं जीव थंड झाला. हवा गार सुटली हुती. पाण्याखालच्या भुईगत खाली गारकरबंद. तरी भुईवर आंग टाकलं . चालून ताठून गेलो हुतो . उबदार निवारा आसता तर झोप लागली आसती. हिकडं तिकडं नजर फिरायला लागली. लांब धा पावलावर डबरं दिसलं . जावून बघतोय तर डबरं चघळानं भरलेलं . कुत्र्यागत चघाळ. इकडं तिकडं करून निजायपुरती सपय जागा केली . धोतराची खालवर घालून पडलो . खालन सावकाश उब लागत हुती . डबऱ्यात वारंबी येत नव्हतं . इचुकाट्यांचं भ्या तर कवाना मरून गेलं हुतं . डबऱ्यातल्या निवांत उबीत कवा झोप लागली . मध्यान रात झरल्यावर चार – पाच डुकरं आली . तवा कसणूसा कुबट , कुजका वास आला . वकायला आल्यागत वाटायला लागलं . उबदार डबरं नको नको वाटायला लागलं . उठलो तवा रात निवळली हुती . गारवा कडक झाला हुता . थंड ‘ मी ‘ म्हणून उठली हुती . लांब तिकडं शेकोटी पेटलेली दिसली . उठलो . लगालगा जावून शेकोटीजवळ शेकत बसलो . चारपाच जणं संशवानं बघायला लागली .
बसल्या बसल्या येकानं दुसणी दिली . ” कोण गाव पावणं ? नवं दिसताय ; कुणाकडं आलाय ? ” “ वाटसर हाय बाबा . रात झाली तवा मुक्काम केलाय . ” ‘ आसं व्हय ; कुठं झोपला हुता ? ” ” ग्रामपंचायतीच्या हापिसापुढं . ” थंड न्हाय वाजली व्हय ? ‘ “ तर ; म्हणताना तर शेकायला आलोय . ” ” शेक , चांगलं मागनं – पुढणं शेकुण घे . ” ” ह्या तुमच्या गावात एकादी नवी पोरगी आलीय काय ? ” ” एक का धा – पंधरा पोरी आल्यात ; गावातली उंडगी पोरं मार मज्या करत्यात . गावाचा नाश केलाय त्या रांडांनी . त्यात तुमचं कुणी हाय वाटतं ” ” ” वाटसर . अंगावर साप चढल्यागत हाललो . जीभ अटून बसल्यागत झालं . काय बोलावं काय सुचना . “ छा , छा . माझं कोण न्हाय त्यांत . “ मंग नसत्या चौकशा कशापाय करताय ; उठा हिथनं . तापू दया आमाला . थंड वाजतीय . उठलो . दोन पाऊलं मागं सरकून उभा राहिलो . ऊब लागत हुती . जाळ उठवून शेकोटी पेटत हुती . हिंगळागत शेकोटी डोळ्यांत उतरलेली . वाऱ्यानं फुलत चालतेला आतला आतला जाळ आवरत हुतो . आत आत जाळ झालेला . एकटाच जळत चाललो हुतो . बाहेरनं गारव्यांचं चपकारं बसत हुतं . तांबड्यालाल डोळ्यांत पहाट फुलत हुती . गावातली माणसं जातेली तसं हागनदारीला जावून बसलो . हागायला येत नव्हतं तरी हागायच्या निमतानं बसलो हुतो . येणारी जाणारी माणसं बघत हुतो . लांब तिकडं बापयांची हागणदारी . बायका माणसं गावकुसाआड बसत हुत्या . झुडपाच्या आडोशानं बघत हुतो . मंगल कुठं दिसत नव्हती .
दिवस उगवल्यावर गावातनं एक चक्कर टाकली. तसाच खाली सडकला आलो. टपरीत शिरून चा घिटला. बडळाच्या पाण्याचा वास ; तसाच कप तोंडाला लावला . तवर वरनं एस्टी आली . मनात आलं एस्टीत बसून पुढं जावं . पर सदली गावं – वाड्या – वस्त्या हुकायच्या . म्हणताना चालंतच निघालो . ह्या मुलखात काय पाटाचं पाणी नव्हतं कुठं ; तलावबी दिसत नव्हता . नदीला झिर पाडल्यागत हिरी दिसत हुत्या . तारा , तार खांब दिसत हुतं . चुकल्यागत कुठं तरी उसांचं थळं दिसायचं . जिकडं नजर टाकावी तिकडं जुंधळ्यांची रानं पिकून थिर झालेली . कुठं कुठं काढण्या लागलेल्या . एकादया मळ्यात गुन्हाळ दिसायचं . गुळाचा रस शिजलेला वास वळखीचा वाटायचा . न्याहरी वक्ताला एका मळ्यात गेलो . रसाचा चरक चालू हुता . गु – हाळाच्या मालकानंच इचारलं , “ रस पेताय काय ? ” ” व्हय ; पिऊ की . ‘ दोन – तीन तांबी रस घोटला . पोटाला आधार वाटला .

चार कोस रान तुडवायचं बळ पायांत आलं . उसाचा रस पेलो . चांगला काकहात उसाचा शेलका डांग मोडून घिटला . निघालो . नजर घारीगत फिरत हुती . वाड्या , वस्त्या , गाव बघत हुतो . मंगल कुठंच दिसत नव्हती . वाटलाच एका दुकानातनं चार आण्याचा बुका घिटला . चांगला कपाळभर बुका लावला . एका दारात जाऊन बसलो भजन म्हणत . चार घरी भजनं म्हणून चटणीभाकरी मिळवली . गावभर फिरलो . मंगल कुठं दिसंना . वारकरी झालो ; भिकारी होवून भीक मागितली ; पर मंगल काय दिसंना . पाय सुजून पिकल्या शेंदाडागत फुगलेलं . डोळंबी सुजलं हुतं . घरी जायलाबी मन धावत हुतं . आपून पुढं आलो ; मागं काय झालं आसंल ? चंदी सरली तर दुर्व्या एकटा काय करणार ? लोचीचं टक्कुर ठिकाण्यावर आसलं तर बरं ; न्हायतर ती आणखी कुठं फिरायची . सरळी घरी आली तर बरं ; न्हायतर दुर्व्याला मारायची . काय घ्या याड फिरलं तर ; एक करता शेक हुयाचं ; उपजली कन्या कुळाबाहेर गेली तर गेली . जीव वैतागून गेला . जिवाची नुसतीच तगमग . मंगल आता हाताला लागणार न्हाय . मंगलीच्या पायांत हातलं कष्ट सोडून फिरत हुतो . जगाच्या लाजखातीर पोट बांधून गाव हुडकत हुतो .
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
