कळा, उत्तम बंडू तुपे(भाग २४).

कळा, उत्तम बंडू तुपे..

“कुरकुरत एस्टी चालू झाली. मन गतिमान झालं. एस्टीच्या पुढं कवाना गेलेलं. एस्टी मागनं धुरोळ्यागत घोटाळायलाबी लागतेलं . लोचीचा भाऊ डोळ्यापुढं . त्याला काय सांगायचं ? काय बोलायचं ? मनालाच मनाचा मेळ घालत हुतो . आतबी मानसांचा नुसता कालवा . बारकी पोरंबी रडत आरडत हुती . थांबल तिथं आतलं प्रवासी काय बाय खायाला घेत हुते . कुणी उतरत हुतं ; कुणी चढत हुतं . चढणाऱ्याकडं डोळ्यात जीव घेऊन बघत हुतो . दुर्व्या आन् त्याचा मामा न्हायतर मंगल आन् शिरपत दिसावा ; किती बरं वाटलं . कुणाकडं डोळं ठिवून ; निरखून बघायलाबी मन धजत नव्हतं .

https://bit.ly/bspmycityshrigonda

गोकळी मेकळीतनं एस्टी निघाली . काळीज धरून कुणी पिळतंय वाटलं . देशमुखाची सई आवचित दिसली . बसायला जागा नव्हती म्हणताना उभी राहिली हुती . हादऱ्यानं तिची देही हादरत हुती . आतलं दोन – चार टगी ; तिच्या उराला नजर चिटकवून बघत हुती . एकामेकाला डिवचून सांगत हुती. सईची थानं लोण्याच्या गोळ्यागत लदलदत हुती . चाखलेलं फळ बघून वाटावं ; तसं वाटलं . मान वाकडी करून तिच्या मागंपुढं कुणी हाय का बघिटलं . कुणीच दिसलं न्हाय ; तवा तिला जवळ बोलिवली . “ सई ये ! बस हितं . ” “ तुमी . “ मी रातू की उभा . सईसगट बोललो ; तवा त्या टग्यांनी बाजूला नजर घिटली . “ संतू ! कुठं चाललासा ? ‘ “ दुर्व्याला भेटायला चाललोय . ” “ तू – गं ? ” “ मी चाललीय बारामतीला बापाकडं . ‘ ” मलाबी बारामतीत उतरायचंय . लोचीलाबी भेटायचंय . ‘ ‘ आता तिला भेटून काय करणार ? ” ” बायकू हाय ती माझी . ” ” व्हय ; पर खुळी झालीय . आसं कर आपून आसंच पळून जाव .

” सई ! गप की; लोक ऐकत्यांत; काय म्हणतेली ?” बारामतीत उतरलो . सईसंगट चालत हुतो . सई एकसारखी म्हणत हुती ‘ आपून पळून जावू . पुन्हिंदा संसार मांडू . तुझी बायकू खुळी हाय . ” आसलं काय बाय बोलत हुती . तिचं बोलनं टाळून चालत हुतो . “ बघ !; इचार कर ; संतू ! आसी यळ पुन्हा न्हाय. ” एवढं बोलून सई निघून गेली ; तवा एकटा पडलो . पायांतलं लोढनं काढलेल्या गुरागत दनाट निघालो . दिवस आजून तिसरा पराला हुता.पाण्यातनं चालल्यागत लोचीच्या भावाचा मुक्काम हुडकून काढायचा हुता . त्याचबी इचवागत बिहाड पोराबाळाला , दुर्व्याला आन् लोचीला बघायसाठी जीव उतावळा झाला हुता . खाकरत खोकरत हुती .

कळपातनं चुकलेल्या कोंबड्यागत माझी तन्हा झाली पाठीवर . जिकडं काम दिसंल तिकडं बि – हाड घेवून त्योबी पळत हुता . त्याच्या वाटवरचा धुरोळा खुंदलत निघालो हुतो . दिसंल त्याला इचरत हुतो . धुरोळा पार गुडघ्यापावतर उडत हुता . धुरोळ्यानं भरलेलं पाय घेवून वन वन बघत निघाल्यागत निघालो हुतो . बारामती गावाच्या बाहेर कोसभर आलो ; तवा कुठं लोचीच्या भावाच्या मुक्कामाचा तपास लागला.

उडून जावंसं वाटाया लागलं हुतं . पर चालून चालून पायाच्या खुट्या झाल्या हुत्या . घामानं सगळं अंग चिकाट झालं हुतं . भुतागत औतार घेवून , तावानं पाय उचलत हुतो . वस्ती – वाड्यावरची बेरकी कुत्री कावदारून अंगावर भुकत हुती . कुत्री अंगावर धावून आलेली बघून वाघ अंगावर आल्यागत वाटत हुतं . जिवाची तारांबळ बघून कुत्र्याचं धनी हासायचं . ” कारभारी ! तुमचं कुत्रं बोलवा की ! ” ” काय करतय रं ? ” ” चावल की ! ” ‘ न्हाय चावत ! ” ” काय नेम मुक्या जिराबाचा ? ” ” आरं , ती कुत्री काय खुळी न्हायती तुझ्यागत . चल , हूं पुढं. ” कुत्र्याचं धनी आसं बोललं की कुत्रं हूनशान भुकत पळाल्यागत पळत हुतो . वाटेवर चार उंडगी पोरं भेटली की- देवावर भंडार उधळल्यागत अंगावर धुरोळा उधळायची . थू ; तुझ्या आयला ; शिव्या देवून दगाड हाणायची .

‘आलं रं, येड आलं ‘ म्हणायची. हे सगळं सोसून मेहुण्याचा शोध घेत निघालो हुतो . घावंल त्या वाटेन पुढं पुढं पळत हुतो . भुतं मागं लागल्यागत अंधार मागं लागतेला . झाडा झुडपांच्या सावल्या ; डोंगरांच्या सावल्यांत कवाच मिसळल्या हुत्या. आत्ता सांज व्हतीय ; अंधार पडला की कुठं मुक्कामाला थांबायचं ? नसतो आलो तर बरं झालं आसतं ; वाटाय लागलं . आत्ता कुत्र्यापरास माणसाचं भ्या वाटाय लागलेलं . काय घ्या ; ‘ चोर, चोर ‘ म्हणून एकादयानं दणकं दिलं ; बांधून ठिवलं तर पावण्यांच्या गावात आब्रूचं खोबरं हुयाचं. म्हणताना जीव मुठीत धरून पळत हुतो . वाटंत भेटलेली कैक माणसं संशवान माझ्याकडं बघत हुती .

काय बाय ; मलाच बघून हुती . माणसांचं डोळं चुकवून पळत हुतो ; तरी माणसं डोळ्यापुढं येत हुंती . तिथं इचारपूस केली . तवा त्यांनी सांगितलं , दोन वस्त्या वाटेवर हुत्या ;’ भल्या माणसा ! त्या नावाचा माणूस कालच गेला . त्या तमुक वस्तीला आसंल बघ . ” ” किस्तं लांब हाय ? ‘ ” हाय की जवळच . त्या टेकाच्याखाली गेलं की तमुक वस्ती लागतीय . त्याच्यापुढं वावरं – दोन वावरं गेलं की न्हाव्यांची वस्ती हाय ; त्या वस्तीवरनं उजव्या बाजूची वाट धरून गेला तर कल्हाट्यांची वावर लागतेली . त्याच्या म्होरच हाय बघ शिंदयांची वस्ती . ” त्या वस्तीला आसंल कळल्यावर सईचा आठव झाला. तिच्याबर गेलो असतो तरी बेस झालं आसतं ; वाटायला लागलं. चारी बाजूनं रानं फाटल्यासारखी वाटाया लागली.

उभा हुतो ती वस्तीबी सोडून जावंसं वाटंना. तवा एकाला इचारलं – ” बाबा ! रातचं मुक्कामाला राहू देता का ? सकाळचं उठून जाईन मी. ” “ न्हाय रं बाबा ! महिन्यामागं एक टग्या आसाच आला. आमी त्याला मानसुकीनं मुक्कामाला ठिवलं तर मध्यान रातीला त्याचं साथीदार आलं नि वस्ती लुटली. ” मी त्यातला न्हाय ; खरं सांगतू . पायजी तर कुणच्याबी देवाची आन घेतो . ” “ चोराला कसला रं देव – धरम ! त्याचं काम साधलं मजी झालं. ” “ या वक्ताला न्हाय म्हणून नगा. परसंगानं आलोय या नव्या मुलखाला . एका संग बोलत हुतो . कासराभर अंतरावर दोघं – चौघं काय बोलत हुतं . त्यांनी येवून मला धरलं. ‘ आयला तुझ्या ; महिन्याआदी तूच आला हुतास. आसंच भिकाऱ्याचं सोंग घेऊन आला हुतास . “ आ – वं , मी न्हाय. मी माझ्या बायकूला – पोराला भेटाय आलूय . ‘ ” त्योबी आसंच ढोंग करत हुता . म्हणत हुता – “ माजी बायकू हिकडं पळवून आणलीय. ” खोटंनाटं सांगून माणसं भुलिवता ; माणसं आपुलकीनं वागत्यात त्याचा फायदा घेताय नि माणसं गप निजली की काळीज कातरून जाताय. वर आणखी साजूकपणानं बोलताय .

https://bit.ly/bspmycityshrigonda

पर आशानं आता आमी फसणार न्हाय . बरा घावला तावडीत . ” एकाचं बोलून व्हतंय – न्हाय व्हतय ; तवर दुसरा बोलत हुता . कुणी मला बोलू देत नव्हतं . तोंड बांधल्यागत झालं हुतं..

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading