कळा, उत्तम बंडू तुपे..
मालक बडबडत हुता . मी जी , जी ‘ करून नंदीबैलागत टकूर हालवत हुतो . खाली बघून चुलवान उकरत हुतो . नांगराच्या बैलागत तास धरून खांदणी चालली हुती . हुलवान उदसत हुतं. दगडामातीचा ढिगारा मोकळा हुनशान ढासळत हुता. धुरोळाबी उडत हुता. नाकातोंडातनं पोटात जात हुता. खाकरून थुकलो तर माती खावून थुकल्यागत थुका पडत हुता. मातीत राबता राबता मातीबी पोटात जात हुती . देहीचीच माती झालेली . मेल्यावर हुती ; पर जित्यापणी आपलीच माती डोळ्यांनं बघत हुतो . चुलवान ढासळून पडत हुतं . आपलं पोट आपल्या हातानं फाडून बघावं तसं बघत हुतो.पगाराचा दिवस हुता . हप्ताभर राबून आलेला पैका ; हातातल्या नोटांला डोळं फुटल्यागत धा वाटा बघत हुत्या . मंगलचं झंपर फाटून फर दिसत हुतं . तिला आसं उघडं ठेवूनबी बरं दिसत नव्हतं . लुगड्यालाबी फाळी पडलेल्या . कुठं दोऱ्यानं शिवलं हुतं ; तर कुठं गाठी मारून काया झाकण्यापुरतं केलं हुतं . तरणी – ताठी पोर , रोज लोकांच्या बांधाला जायाचं . तिला एकादं लुगडं तरी घियाला पाहिजेल . चार दिवसापासनं दुर्व्यानंबी वह्या पायजेत म्हणून मागं चिमट लावली हुती . त्याला चाराच्या जागी दोन तरी वह्या दयाया पायजेत . नाहीतर त्याचा अभ्यास खुटतो . ह्या सगळ्यांतनं पोटांचंबी बघायचं . माघच्या हपत्यात उधारीनं आणलेल्या दान्याचं पैसंबी दियाचं . तिघाचा रोजगार हातांत आला हुता . त्याला ह्या आस्या धा वाटा दिसत हुत्या . बाजाराचा दिवस ! मंगल , लोचनाला सुट्टी हुती . हातांतल्या नोटा लोचनाच्या हवाली करून त्यांतली एक सगळ्यांत बारकी नोट उचलून घेटली . हळूच लोचनाच्या तोंडाकडं नजर टाकली. तिचं तोंड उन्हाळ्यातल्या कवळ्या पिकागत दिसलं . ” लोचे , तू जा बाजाराला . ” तुमी काय वं करताय ?

” ” मला काम हाय . आता रोजगार बुडवून बाजाराला जायाचं मजी धा रुपयाला बुड . ” व्हय ! पर मंगलीला लुगडं घियाचंय . त्यातलं मला काय कळतंय ? ” ‘ ना कळायला काय मोती – पवळ्यांची खरेदी करायचीय ? का हिरे – माणक घ्यायाची ? तवा पारखून घिया लागतं ! ” ” ते खरं , पर धडूत ; कापडांतलं मला काय कळतंय ? ‘ “ आण की कसलं तरी काया झाकाय पुरतं . मंग पुढं जत्रच्या टायमाला एकादं चांगलं लुगडं घेऊ . दुर्व्याच्या वह्या मातर इसरू नगस . किलो – दोन किलो जुंधळं कमी कर ; पर त्याच्या वह्या इसरू नगस . ‘ म्हणताना तर म्हणती . तुमी गेला तर बरं पडतंय . ” ” जा , तुला वाटलं तसा बाजार कर . ‘ घरात इचार करत बसलो हुतो ; तवर जना दारात येवून उभी . तिचं पायलीभर हाब्रीड आणून खाल्लं हुतं . तिचंबी रुपयं दियाला पायजीत . तिच्या हातावर धाची एक नोट ठेवून तिला वाटला लावलं ; तवर आणखी दोघी उधारी मागाय आल्या . जना , सीता बऱ्या ; पर येवल्याची किष्णा , बया येताना तोंड घेऊन येती . किष्णानं जनाच्या हातातली नोट बघितली – तसं तोंड सोडलेलं- “ रांडा ; मेली घेताना गोड बोलत्यात ; देताना तर त्यांची आईबाप ; सगळी मरत्यात . कुठं गेली लोची ? लोऽचे- ” किष्णानं लिंबाखालनंच हाक मारली . दारात येऊन बघितलं तर किष्णा पाय आपटत येत हुती . शेजारीपाजारी दारात येऊन उभी . आता तमाशा हुणार ; बघायला बरं . किष्णा पार उंबऱ्यात आली . “ आणून खाता तवा कसं गोड वाटतं ; देताना काय व्हतं तुमासनी ? दे माझं रुपयं दे ; न्हायतर बाजाराला जावू देणार न्हाय . ” किष्णा बोलली ; तसं टकुरं झिटाललं . पायताणानं तोंड फोडून द्यावी हाकलून वाटलं .
” ” लोचे , तुला किती यळा सांगितलं . ह्या बयाचं कायबी आणू नगस . ‘ मंग तुझ्या बायकुला मी काय आवातनं घेवून बोलवाय आले हुते काय ; का माझं दानं किडं खात हुतं ; तवा बळं बळं तुमच्या पदरात बांधलं . ‘ ‘ न्हाय किष्णाबाय ; नडी – आडचणी सगळ्याला हायत्या . पर माणसानं वाईच तरी माणुसकी धरावी. ” ” संत्या , माझी माणुसकी तुला काय ठावं . दिलेलं का मागूच न्हाय व्हय आमी ? ‘ ” मागावं ; पर त्यालाबी काय हाय का न्हाय ? आलं की नुस्तं भुकत ” रहाता ; तुमासनी तरी हे पटतं ? हायतं तुमचं पैसं तर घ्या . आमी काय ठिवत न्हाय . किष्णाचं नि सीताचं रुपयं देण्यात मंगल आन् लोचनाच्या रोजगाराचं आलेलं रुपयं गेलं. हातांत माझ्या एकट्याचा रोजगार ; हाप्ताच्या बाजाराला काय पुरणार हाय . कितीबी वढावढ केली तरी ह्या महागायनं कायबी पुरी पडना झालंय. आत्ता माझ्या रोजगाराच्या पैशांत काय काय बाजार करायचा? पुढ्यात काटंबनं दिसायला लागलं. आत शिरावं तर काट लागायचं भ्या ; ना शिरावं तर पोटानं मरायची येळ . धरावं तर चावतंय ; सोडावं तर पळतंय – आसली गत झाली हुती . व्हय ; नग ; करता करता लोचना बाजाराला जायाला राजी झाली ; तवा पुढं बघून नारायण चव्हाणाच्या मळ्याकडं निघालो.
तिट्यावर आलो ; तर वामन मिसाळ भेटला . देणकऱ्यागत वाट आडवून उभा राहिला हुता . त्याला रामराम केला . “ संतू ! तुझी वाट बघत थांबलो बघ आत्ता पावतर . “ का ? ‘ “ आरं , रानमळ्यात हिरीची जय काढाय घिटलीय ; पर माणूस काय मिळंना झालंय . तवा म्हणलं तुला इचारावं . ” ” त्यात इचरायचं काय ? आपल्याला परवडायला पायजी . ‘ “ ना परवडायला काय व्हतय ; संतू ! वाटलं तर अंगावर कामं करा . तुझ्या हाताखाली बायको आन् पोरगी हाय . तू एकट्यानं खांदून दिलं तरी त्या दोघी माती नेहून टाकत्याल्या . ” आणखी कुणाला सांगितलंय ? ” “ दहीवडीच्या दोन बायका हायत्या . आणखी दोन गडी बघतो ; मजी सात आठ माणसं हुतेली .” ” जय किसती खोल खोदायची हाय ? ” ” काय ; दोन परूस खाली नियाची . “ मजी आठ – पंदरा दिसाचं काम हाय म्हण की वामन . ” का ? चांगलं महिना – दोन महिनं काम चालतंय बघ .“ न्हायतर हातांतलं काम सोडून पळायचं व्हयांचं .’ “ कुठं कामाला जातोस संतू ? “ नारायण चव्हाणाच्या मळ्यात . ” ‘ काय रोजगार देतो चव्हाण ? ‘ ‘ जगात धारा हाय त्या परमानच रोजगार देतोय चव्हाण . ” “कराय पायजी . ” “ संतू! रोजगारानं म्हणला तर मी धा रुपयं रोजगार गड्याला नि बायला आठ रुपयं देतो ; बघ इचार करून सांग . उद्याला शुकिरवार हाय . कामाला सुरवात ” व्हय . तुमचं ते झालं ; पर आठ दिस खायाचं काय ? ” “ तेवढी नड मी भागवतो . धर घे शंभर रुपयं हायतं . रोजगारातनं वळती करून दे मला . ” शंभराची नोट बघून भुल पडल्यागत झालं . काळीज सुपागत फुगलं .
नोट घेऊन तसाच डांबरी सडक धरून गोंदावल्यांच्या बाजाराला निघालो . वामन मिसाळ संगतीनं चालत हुता . बोलता बोलता विषय निघाला . तवा वामन मिसाळ बोलला – “ संतू , औंदा पोरीचं लगीन करतू का न्हाय ? ” वामन मिसाळ बोलला खरं ; काळीज कापल्यागत झालं . त्याचंबी काय चुकलं नव्हतं . न्हाती पोर ; बिगर लग्नाची पाळायची मजी साप पाळल्यागत वाटतं . कुणीतरी पोटात दणकं घातल्यागत हुतेलं तरी बोललो चांगला नवरदेव . ” ” संतू ! नवरा हुणारा काय फुकटात घावतू काय ? बघ तुझी हिंमत आसल तर आमच्या गावच्या लेंगऱ्याला पोरगी दे ; पोरगा कष्टाळू हाय बघ . ‘ व्हय ; ते खरं झालं . पर त्याची कुळी – ढाळी बघाय पायजी . लग्न काय तोंडानं हुत्यात काय ? हितं आपल्या दातावर मास न्हाय . न्हाय व्हय करण्यापेक्षा ह्यो तिडा घातला . पर वामन मिसाळ गावगुंड माणूस . फटकरण ” बघाकी एकादा “

” बोलून गेला ” ” ” ” संतू ! आता काळ बदललाय . कुणी जातपात , कुळी बघत बसत न्हाय . नवापोराला नवरी हुणारी पोरगी पटली की लग्न हुत्यात . ‘ “ वामन ! आसली लग्न बाडग्याची हुत्यात . ज्याला कुणी न्हाय त्याची हुत्यात . मी काय तसला न्हाय . ‘ कशाला बोलतो संतूं ! अंगात बळ न्हाय म्हणून गप बस की . ‘ वामन खरं बोलला . खरं बोललं की सगळ्याला राग येतो . मलाबी राग आला ; पर काय बोललो न्हाय . वामनचं शंभर रुपयं अंगावर घिटलं हुतं ; त्यानं मिंदेपणा आला हुता . मंगलचं लगीन करायचं मनात हुतं ; पर अंगात बळ नव्हतं . पोटा – पाण्यात सगळ्यांची कमाई जिरत हुती . उशीर गप का गुमाण पाय उचलत हुतो . बाजारची वाट सरत हुती . “ वामन ! लेकऱ्याला इचरून तर बघ . जमलं ; दैवानं उचल घेतली तर करून टाकू लगीन . “….
क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा कादंबरीतुन)
बहुजन समता पत्र वृत्तपत्रातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐
