दिनांक १३ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता दिवाळी सणात फटाके वाजवू नयेत, फटाके वाजविल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुफ्फुसावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोरोना रुग्ण व सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. फटाके वाजविल्या मुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होईल, त्यामुळे फटाके न वाजवताच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा. असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या सामाजिक संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख व पत्रकार जितेंद्र आढाव यांनी कोरेगव्हाण येथे बोलतांना केले.

ग्रामिण भागातील सर्व नागरिकांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देऊन, सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही आढाव यांनी केले आहे. यावेळी पुढे बोलतांना आढाव म्हणाले की, कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही कोरेगव्हाण, निंबवी, पिंपळगाव पिसा, ढवळगाव, देवदैठण, कोंडेगव्हाण, एरंडोली, सारोळा सोमवंशी, चांभुर्डि, विसापूर, मुंगुसगाव, सुरेगाव आदी परिसरात कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
सध्या दिवाळी उत्सवामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, सर्व दुकानदारांनी देखील खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मास्क लावल्या शिवाय दुकानात प्रवेश देऊ नये आणि आपल्या दुकानातील कामगारांना देखील मास्क वापरणे बाबत सक्ती करण्यात यावी. नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही. तर, पोलीस व ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक करवाई होऊ शकेल.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन कोरोनावर मात करण्याच्या द्रुष्टीने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील दिलेल्या नियमांचे पालन केल्यास विसापूर, पिंपळगाव पिसा, कोरेगव्हाण, निंबवी, सारोळा सोमवंशी, देवदैठण व चांभुर्डि परिसर कोरोना मुक्त होण्यास मदत होईल. या करिता नागरिकांनी बाजारपेठेत व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व गर्दी असलेल्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन आढाव यांनी केले आहे.
स्रोत:(आढाव यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
