कळा, उत्तम बंडू तुपे.(भाग ३).

कळा, उत्तम बंडू तुपे..

मालकानं हाक मारली . “ जी … आलो , ” म्हणून उसाचं दार मोडलं . बुजरा खोंड उधळल्यागत तकाट मालकाकडं पळालो. मालकाच्या पुढ्यात कुत्र्यागत धापा टाकत उभा राहिलो. मालकानं संशय आल्यागत माझ्यावरनं नजर फिरवली . एकदा माझ्याकडं ; एकदा पाण्याच्या दंडाकडं डोळं फिरवलं . “ संतू ! सगळी रानं बैजवार भिजली ; का काय राहिलंय ?

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

” ” आता मकला पाणी पाजायचं तेवढं बाकी हाय . “ मंग रातभर काय केलं ? एकादा डुलका हाणला आसलं . ” ” छा , छा भुईला टेकलासुद्धा न्हाय बघा . “ आरं , मंग पाण्याची भरणं कसी झाली न्हायती . ‘ ” मालक , रानंच वाळली , भसा – सा रानात पाणी मुरतंय . ” ” बरं , बरं तेवढी मका भिजवून घे. आन् गु – हाळघराभवतीची सगळी घाण काढ ; पळकाट्या बैजवार कडपं घालून ठेव . मी जरा वडुजाला जावून येतो . रोजगारणी आल्यावर खत वावरांत टाकाया सांग . ‘ एक म्हणता धा कामं सांगून मालक निघून गेला . कासराभर दिवस वर आल्यावर उन्हं चटकायला लागली . तंवर मकला पाणी पाजून मोकळा झालो . मन घराकडं धावाया लागलं. न्याहरीची येळ टळून गेली तरी न्याहरीचा पत्त्या नव्हता ; का च्याय सुदिक भेटली नव्हती . आजपावतर कुणाला आपली कदर नव्हतीच . सगळीच राबवून घेत हुती . का ? आमीबी बिनशिंगाचं बैल हुतो. रोजगारी माणसांत नि बैलांत काय फरक नसतो वाटतो !

रातीला जाग्रण झालं तर कुणी म्हणतंय का घटकाभर डोळं झाकुण पड बाबा . कवा कवळ्या दुपारीला गावाकडनं भाकरी आली . तवा कुठं अन्नाला मिळालो . कसलं खाणं ते . गुरानं इगर केल्यागत वचा – वचा खायचं . हात वाळला न्हाय तंवर कष्टाला जुपून घियाचं . रोजगाऱ्याचा जलम घेऊन आलो हुतो नव्हं ! पोटात भर पडल्यावर अंग सुस्तावल्यागत झालं. रोजगारणी खताच्या ढिगावर लावल्या. मी आपला गुन्हाळघराभवती पसरून पडलेलं उसाचं वाळलं वाढं , चिपाडं गोळा करायला लागलो . दोन – तीन ढीग गोळा केल्यावर डोळं पेंगायला लागलं . आता हिथंच पडलो तरी निवांत झोप लागली आसती . आसली गत झालेली .

एकादी झोप काढावी तर उरावर कामांचा दडपा . मधव्या , धाकल्या मालकांची फेरी आली तर चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागतेल्या . झोप डोळ्यांवरनं हुळहुळायला लागली . पर झोपायला काय मन हुत नव्हतं . तरी डोळ्यावरची झोप हाटत नव्हती . झोपेनं हातापायांचा पार गळाटा झाला हुता . कामाला उरक म्हणलं तरी कामं उरकत नव्हती . डोळ्यांत मिरच्या घातल्यागत झालेल . उन्हं तापाया लागली तसा कट निघाना झाला . तिथंच हिवराचं झुडूप हुतं . अंग दडवायपुरती सावली पडली हुती . दोन कवळं पळकाट्या जुलमानं कडप्यावर टाकल्यावर हिवराच्या झुडपाबुडी आंग टाकलं . कवाना डोळा लागला . धाकल्या मालकानं लाथा घाटल्यागत , हालवून जागं केलं ; तवा उन्हें निवली हुती . ” संतू ! माणूस का भूत रं तू ? खुशाल उन्हात पसरलाय ते . ‘ “ रातभर जागलो हुतो नव्हं . ” “ आरं , मंग आमाला काय उपकार केला काय ; रोजगार घेणार न्हाय काय कामाचा ; कवा झोपला हुता ? ‘ धाकला मालक बोलला . तोंड पायताणानं फोडल्यागत वाटलं . तसंच उठलो नि कष्टाला मिठी घातली . पोटासाठी सगळं सोसून रोजगाऱ्यानं गप का गुमानं जगायचं आसतं ! काय घडलंच न्हाय आसं माणून वागावं लागतं ;

तवा दिवस जात्यात . वक्ताला , पोरंठोरं नव्हं तर मालकांचं कुत्रं भुकलं तरी . गुमानं एकावं लागतं . हाताला घावल तसा पळकाट्याला कवळा घालत हुतो . कवळ्यांत मावंल तेवढ्या पळकाट्या धरून कडपं घालत हुतो . तवा दिवस मावळत हुता. गुराळ घराची सावली लांब झाली हुती . लांबनं आलेली म्हसाडीच्या डोंगराची दांडगी सावली . सावल्या सावल्यांत कवाच मिसळल्या हुत्या ; तरी कष्ट उचलत हुतो . टिपणाचं काम आजून झालं नव्हतं . हात , पाय सारखं हालवत हुतो . एकाला धा कामं फुटत हुती . त्यांत देहीचं भान इसरून गेलो हुतो . राखेचा डोंगरासारखा ढीग डोळ्यांत ठेवून पुढ्यातली कामं उरकत हुतो . वाळलेल्या उसाच्या वाढ्याचा पयला कवळा उचलला . तसं भुजला कचकचून काय तरी टोचल्यागत झालं .

अंगातल्या सगळ्याच शिरा एका जागी गोळा करून धरल्यागत सगळं अंग अकसलं . काय टोचलं ? का सापानं फोडलं ? पर उसाच्या पाल्यांत साप रहात न्हाय . पाल्यानं अंग कापायचं भ्या सापालाबी आसतं . बारीक नजरनं वाढं इदरून बघायला लागलो . तर खुरप्याच्या मुढीगत इंचू , आड रानातल्या खोंडागत नांगी वर करून माझ्याकडंच येत हुता . हूं म्हणून बचकत धोंडा उचलून इंचू मारला . त्याचा रेंदा फणकारा मारलेल्या जागी भुजवर नेमका लावला . तवर भुजपासनं हातच नसल्यागत झालं . हातात कळा उठल्या .

” बाबा , तुझा काय अन्यव केला तवा ढसालास ? ” हाजार देवांची नावं एका दमात घितली . भैरोबा , काळभैरवनाथाचं नाव घेऊन माती हाताला चोळली तरी इंचू उतरना . आता ह्या वक्ताला इंचू उतरणारा उताऱ्या कुठं बघायचा ? पार ” ” गडबडून गेलो. तंवर कुशाबा मिसाळ गावाकडं जाताना दिसला. त्याला कळूनी म्हणताना – गप का गुमान ; माझ्याकडंच चालून कुशाबा आला . “ संतू ! आता पुरं कर की ; चल घराकडं . ” ज्याचं कोडं , तेच पुढं – आसली गत झाली . कुशाबा सरळ पुढ्यातच येऊन बसला . “ काढ , तंबाखू काढ . लई तलाप झालीय . ” इंचू चढवणाराला कसं कळतं देव जानं . कुशाबानं फट म्हण इचारलं , “ काय इंचू बिंचून दणका हाणलाय वाटतं . ‘ ‘ छा ; छा ; इंचू चावायला म्या काय शंभर पापं केल्यात काय ? ” मनाच्या वरनं बोलत हुतो . आतनं कळा हुर्द तोडत हुत्या . त्यात कुशाबा , इंचू चढवण्यात पटाईत . गावाला त्याची खोड ठावं . रागानंच खिशातला बटवा काढून कुशाबाला दिला . त्यानं विडाभर तंबाखू घेऊन माझ्याकडं निरखून बगितलं . त्याच्या डोळ्यांचं भ्या वाटलं . ह्या बेन्याला इंचू चढवायचं मतिर येत्यात ; उतरायचं येत न्हायतं . इंचू उतरायचं मतिर शिकला आसता तर काय ह्याचा बाप मेला आसता काय ? ” बस आता हितंच . ” कुशाबानं बटवा खाली टाकला नि निघून गेला . कुशाबा उठला तशा कळा चढ झाल्या. ठो – ठो बोंब मारावी वाटायला लागलं . तसाच उठलो . घराकडं धावत सुटलो . सारी रात जिवाला चैन नव्हती ; का घराला सुख नव्हतं . माझ्या संगतीनं आख्खं घरबी रडत हुतं . लोची खुशाबाला न्हाय तसल्या शिव्या देत हुती .

मंगलबी खुशाबाच्या नावानं बोटं मोडत हुती . मध्यान रातीला तात्या बामनाला लोची घेऊन आली . तात्यानं कसली मुळी का काय दगडावर उगळून लावली ; तवा जीव गार पडल्यागत झालं . तरी नांगी मारलेली जागा फणफणत हुती . कळा उठवत हुती . जिवाला चैन पडत नव्हता ; तरी उजाडायची वाट बघत हुतो . मळ्यात गेलो ; तर मळ्यातली सर्वीच कामं खोळंबून माझीच वाट बघत हुती . आता कोणचं काम हाती धरावं ह्या इचारात हुतो . सगळीच कामं हातघाईवर आली हुती. कामं टाळून टंगळमंगळ करायचं म्हंजी आपल्या हातानं आपल्याच पायावर धोंडा पाडून घिटल्यागत हुयाचं .

मालक्न आणखी एकाला दोघं गडी आणून ठिवायचा ; नि महिन्याची कामं आठ रोजांत सरायची . मनात कायबी ठरवलं नव्हतं . दोन रोजा मागंच मालकानं किरचलच्या लाटा निकळून ठिवायला सांगितल्या हुत्या . ऊस पिळून किरचलच्या लाटा कसणूशा घाण झाल्या हुत्या . वासबी कसणूका ; आंबूस विटून गेलेल्या कडणागत येत हुता. तांब खावून बसल्यागत किरचलच्या लाटी . खालची ; रस थारोळ्यात सोडणारी पणाळ तर वकटीवस दिसत हुती . आंबूस वासानं टकूर उठलं . वाटलं हिथंन पळून जावं . पोटात पाय गुतलेल ; काय पळून जाता येतंय . बसलो पन्यानं नट बोलट फिरवत .

” लांबनंच किरचलच्या लाटी काढून बाजूला हुतोय तवर मालक आलाच. साप अंगावर चढल्यागत माझ्या नावानं आरडला . वर पापणी करून वस्तीकडं नजर टाकली ; तर हिरव्यागार पाचूच्या गोणी बांधून आणल्यागत कांदयाचं तरवं उन्हात चमकत हुतं . हातातलं पानं टाकून दनाट पळालो . तर नारायण मोठ्यानं आरडला. ” हिकडं कुठं तोंड घेऊन निघालाय हिरीचा पंप चालू कर . ” माझ्यावर गुरकून मालकानं रोजगारणी बायकांकडं नजर टाकली . बसलेल्या रोजगारणी चिखलात बसलेल्या म्हशी उठल्यागत उठल्या . मीबी हिरीकडं पळालो . पंप चालू केला . तंवर कांद्याचं तरवं घेवून रोजगारणी वावरात गेल्या . मलाबी तिकडं जाणं भाग हुतं . कांद्यांची लावण दमाखाली चालली हुती . चिखल , पाण्यात शिरून रोजगारणी कांद्याचं तरवं चिखलात रवत हुत्या . तंवर नारायणच्या टकूरीतला किडा हालला . ” संतू ! तुझं हिथं काय काम न्हाय . पाण्याची दारं कुणीबी बाय माणूस मोडतंय . तू तुझ्या कामावर जा बरं . किरचल निखळून टाकला की तेवढं चुलवान मोडून टाक . “ चुलवान का मोडताय ? ” “ संत्या ! आता हिथं ऊस गाळत बसायला सवडी कुणाला हायत्या . “ मंग ऊस कशानं गाळणार ? का दगडाने ठेचून ; पिळून रस काढणार व्हय पुढं ? गूळ करायचा म्हणलं की चुलवान पायजी.

” “ आता ऊस गाळून गूळ करायचं बंद . ऊस साखर कारखान्याला घालायचा . साखर कारखान्यांचं नाव निघालं तसं पोटात तिडका उठल्या . गु – हाळ लागलं की रोजगाऱ्या बाया – बापयांची चंगळ . दिवसातनं चार – चार वक्ताला रस प्या . काहिली आदणाला आल्या की साई खा. गूळ खा. अन्नाची भूक ह्यावर भागत हुती . तेबी आता बंद झालं. सांजला जाताना डबा – दोन डबं उसाची मळी घरी नेहून गूळ केला तर घरी सणावाराला वापराय घावत हुता . तेबी पुढं बंद हुणार हुतं.

आता मळणीच्या पातीला जोडलेल्या बैलागत तोंडाला मुस्क घातल्यागत तोंड बंद करून कष्ट करत राह्याचं . मळ्यात तरी खायाजोगं काय हाय ? जे हाय ते काय खायाला येतय काय ? गेलं ते दिवस . शाळू , मुंधळ्यांचा हुरडा . गव्हाच्या लोंब्याचा हुरडा . झाला की राखणीला बसलेला रोजगारी सुगिलाचं घरी जात हुता . म्या तर गुळभेंडीचा हुरडा खोबऱ्यागत खुराकाला खाल्ल्यासारखा खाल्ला . तंवा बारका हुतो . तांबडं फुटायच्या आत मळ्यात जावून माळ्यावर उभा राहिलो की मंग पाखरं जागी हुयाची . हुरड्याला आलेल्या शाळू – जुंधळ्याच्या पिकांवर भिरच्या भिरं उतरायचं ; गोफणीनं धोंडं हाणून ; नि आरडून जीव कंटाळायचा . पाखरंबी धिटाय करून कणसांवर बसायची . पाखरं बसली रं बसली की कालवा करून त्यासनी हुसकायचं . न्याहरी वक्तापावतर पाखरंबी आण मीबी कंटाळून जायाचो . माळ्यावरनं खाली उतरायचो . हुरड्यांची कणसंबी निवडून काढल्यागत उभ्या पिकातनं निवडून काढायची. निवांत मनानं अंब्याबुडी ; न्हायतर बांधावर आगटी पेटवून हुरडा भाजायचा . एका खिशात हुरडा फुकून भरायचा . दुसऱ्या खिशात खोबरं ; कवा कवा गुळबी आसायचा . गुळभेंडीचा हुरडा तोंडात टाकला. दाताला दात लावूसतवर तोंडात साखरंगत विरघळून जायाचा.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

पेढा व बर्फी खाल्ल्यागत वाटायचं . मन रानात भुलून जायाचं . भाकरीची सय व्हत नव्हतीच ; गेलं – ते दिवसबी गेलं . त्याच्या मागनं शाळू जुंधळ्याची पिकंबी गेली . आता आलंय हाब्रीड ; सगळं हाब्रीड . आजून काय दिवस गेलं की माणसंबी हाब्रीड निपजतेली ; काय सांगावं ! काळ बदलत चाललाय . मालकानं हाक मारली तवां झोपेतनं जागा झाल्यागत हाललो . हातात टिकाव घेऊन उभा राहिलो . तंवर मालक माझ्याजवळ आला . “ संतू , आजून बसलाय ? काय करत हुतास ? ” ” तंबाखू खात हुतो . ” ह्या तलपा कशाला करता ? दया की सोडून . रोजगाऱ्याला ह्या तलपा का परवडत्यांत . मालकांचं डोळं कावळ्यागत झालं. मालकाच्या कामाचा बुडापा झालेला. तलपच्या निमतानं मला इसवटा घावतू हे त्याच्या धेनात कवाच येवून गेलं . तरी उघड बोलत नव्हता . ” संतू , ही तंबाखू – पानाची तलाप लई वंगाळ हाय . तलाप करताना बरं वाटतंय . पर पुढं निसतरावं लागतंय . ‘ ” का ? काय व्हतय मालक ? ” ” आरं , आजून अडाणीच का ?

अंगाला कसर लागतीय ; किड्याची जाळी व्हतीय देहीत . कानसर का काय रोग व्हतूय . सा महिन्यांत माणूस दगावतंय ” ” बघ . ” ‘ आखी दुनिया खाती की तंबाखू – पानं . ‘ “ दुनिया मरणार हाय ; आटप लवकर . चुलवान खांदून काङ ; माती हवारी करून रानात टाक . दगडांचा किळगा रचून ठेव . दगड पुढं कामाला येत्यालं . ‘…

क्रमशः
स्रोत:(उत्तम बंडू तुपे यांच्या कळा या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading